माहिती-तंत्रज्ञानात स्पर्धात्मकतेत टिकणे हे, काँगो किंवा अमेझॉन नद्यांकाठच्या जंगलातील धोके ओळखत पुढे जाण्यासारखे. ते न जमल्याने नोकिया अखेर कागदी इतिहासात जमा झाली.
माणसांचे काय किंवा कंपन्यांचे काय.. त्या थांबल्या की संपतातच. त्यांनी काळाची पावले ओळखण्याची, स्थित्यंतरे जाणून घेण्याची क्षमता गमावली की त्यांची वाटचाल इतिहासाच्या पानांकडे सुरू होण्यास वेळ लागत नाही. नोकियाचेही तेच झाले. तसे नसते, तर नोकियाने भ्रमणध्वनी संचांचा व्यवसाय मायक्रोसॉफ्टला ७२० कोटी डॉलरना- म्हणजे फार तर ४८ अब्ज रुपयांना विकल्याची बातमी आली नसती. एकविसावे शतक सुरू होता होता नोकिया ही २५०० कोटी डॉलरची- म्हणजे त्या वेळच्या विनिमयदरांनुसार किमान १२५० अब्ज डॉलरची कंपनी होती. तिचे जितके अवमूल्यन झाले, तितके रुपयाचेही झालेले नाही. नोकियाचे असे का झाले याच्या कारणांची यादी करण्याचे काम आता व्यवस्थापनतज्ज्ञांनी आरंभलेले आहेच. शिवाय, अशा यादीखोर तज्ज्ञांपैकी काही जण जरा निराळी भूमिका घेताहेत. ते म्हणताहेत, की मायक्रोसॉफ्टला स्वत:हून फोनबाजारात उतरता आले नाही आणि नावाजलेली फोन कंपनी विकत घ्यावी लागली, हेच मुळी त्या कंपनीचे आणि बिल गेट्सनंतर तिची धुरा सांभाळणाऱ्या स्टीव्ह बामर यांचे अपयश. पण एकेका कंपनीतील व्यवस्थापकीय अपयशांच्या अशा यादय़ा करण्यापेक्षा, माहिती-तंत्रज्ञानाची मूलभूत साधने बनवणाऱ्या जागतिक कंपन्यांचे नेहमीच असे का होते, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.
नोकियाचे अपयश चव्हाटय़ावर आले, परंतु मोबाइल फोनमध्ये मोठे नाव असलेल्या मोटोरोला आणि एरिक्सन या कंपन्या, किंवा संगणक बनवणारी आणि लेनोव्होमार्फत स्मार्टफोन बाजारात प्रवेश करू इच्छिणारी हय़ूलेट पॅकार्ड, एके काळी संगणकाचा प्रतिशब्द असलेली आयबीएम, तिला धक्का देणारी अ‍ॅपल.. या सर्वानाच कधी ना कधी पराजयाची धूळ चाखावी लागली आहे. बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट विंडोज ९५ ही प्रणाली खुली करून अ‍ॅपलला जी जोरदार टक्कर दिली, त्यानंतर या कंपन्यांतील महाभारत सुरू झाले. याला जय नावाचा- किंवा पराजय नावाचा इतिहास म्हणा किंवा अवमानांचा प्रवास, परंतु अ‍ॅपलने काळाच्या पुढे पुन्हा जायचे ठरवून लहान आकाराच्या आयपॉडवर तरुण पिढीला झुलवण्यापासून एक नवी सुरुवात केली, आयपॉडमध्येही व्हिडीओपर्यंत मजल मारली आणि त्याहीपुढे २००८ साली ‘आयफोन’ आणून भ्रमणध्वनीची व्याप्ती वाढवली. अवघ्या पाच वर्षांत आयफोनची सहावी पिढी अ‍ॅपलने जन्माला घातली, त्याच वेळी लॅपटॉप-नोटपॅड आदींच्या पुढे जाणारा ‘आयपॅड’ २०१० सालच्या एप्रिलमध्ये बाजारात आणून स्पर्धकांना आणखी दौडविले. मूळच्या दक्षिण कोरियाई सॅमसंगचा आशियाई आणि युरोपीय बाजारांत बोलबाला झाला, तो यानंतर. म्हणजे सॅमसंगने स्पर्धा केली ती नोकियाशी नव्हेच, तर अ‍ॅपलशी. या काळात नोकिया काय करीत होते? २००५ सालीच म्हणे नोकियाकडे, आयफोनसारख्या फोनचे आणि अगदी आयपॅडसारख्या संगणकाचेही डिझाइन तयार होते. त्यांनी म्हणे तसे नमुनेही प्रायोगिक तत्त्वावर बनवून पाहिले.. आयफोनच्या तीन वर्षे आधीच! नोकियाने स्वत:च्या क्षमता ओळखल्याच कशा नाहीत, याचा हा धडधडीत पुरावा होता. १९९५ ते साधारण २००५ पर्यंत काळाच्या पुढे असलेली नोकिया ही कंपनी, स्पर्धकांची तमा न बाळगता जगाच्या भ्रमणध्वनी-वापराच्या सवयी पालटू शकली असती. ते झाले नाही. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये बदल करण्यातही नोकियाने आळसच केला आणि त्याच चलनप्रणालींवर चालणारे, पण एकमेकांपेक्षा निराळे दिसणारे आणि कमी-अधिक क्षमतेचे, प्रत्येक खिशाला परवडतील अशा किमतींचे फोन नोकिया बाजारात आणत राहिली. मोजून १७ प्रकार आणि १२५ फोन नोकियाचे, निम्नमध्यमवर्गीय भारतीयांपासून ते स्वत:च्या मालकीची बेटे असणाऱ्या धनाढय़ांपर्यंत सर्वाहाती नोकियाच. परंतु या नोकियाधारकांनी पुढला फोन घेतला तो मात्र सॅमसंग, मायक्रोमॅक्स अशा कंपन्यांचा. यशाची एकच कल्पना धरून राहिले, की जी फसगत होते तीच नोकियाची झाली. एकारलेपणामुळेच ब्लॅकबेरीलाही कडू फळे चाखावी लागली आणि अखेर चलनप्रणालीमध्ये सुधारणा आणि फोनच्या दर्शनी रूपातही बदल करण्याचे पाऊल हल्लीच उचलावे लागले. नोकिया, ब्लॅकबेरी यांनी काबीज केलेल्या बाजारात आयफोनने मुसंडी मारली, ती फक्त चलनप्रणाली वा फक्त रूपाच्या बळावर नव्हे. आयटय़ून्सचे वारू आधी चौखूर उधळू देऊन मग आयफोनच्या यशावर अ‍ॅपलने मांड ठोकली. आयफोनच्या प्रत्येक पिढीत ज्या सुधारणा झाल्या, त्यातही अ‍ॅपलच्या वा अन्य उत्पादनांशी हा फोन किती निगडित असू शकतो, याचा मोठा वाटा होता.
मानवी पिढय़ांपेक्षा कंपन्यांतील बडय़ा अधिकाऱ्यांचे सेवाकाळ कमी वर्षांचे, आणि या कॉपरेरेट कारकिर्दीच्या पिढय़ांपेक्षाही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्पादनांच्या पिढय़ा झरझर बदलणाऱ्या. या बदलत्या पिढय़ांचे मूळपुरुषच जिथे कंपन्यांचे प्रमुख होते, तिथे ते असेपर्यंत सारे काही आलबेल होते. हय़ूलेट-पॅकार्ड वा नोकियासारख्या कंपन्यांची कूळकथा जुनी, त्यामुळे माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादनांच्या विभागाचा प्रमुख बदलला की कंपनीची दिशाही बदलणार, हे स्वाभाविक होते. एचपीमध्ये हे दिशाबदल आणि घूमजाव गेल्या दहा वर्षांत मोजून दहा जणांनी केले. कुणी लेनोव्हो विकत घेते, कुणी म्हणते टॅबलेट नकोच, कुणी म्हणते हवा, अशा दशदिशांत तारू दिशाहीन झाल्याचेच जगाला दिसले. एचपीची स्थापना आणि भारताला मिळालेले राजकीय स्वातंत्र्य यांचे वर्ष एकच, हा निव्वळ एक योगायोग.
फिनलंडमधील ‘नोकियान्विर्ता’ या नदीकाठच्या जंगलातील झाडे वापरून कागद-कारखाना काढू, असे फ्रेडरिक इडस्टॅम नावाच्या फिनिश यंत्रज्ञाने १८६५ साली ठरवले. नोकियान्विर्ताकाठची झाडे तिच्याच प्रवाहातून वाहून नेली जाणार होती, तिच्याच पाण्याने या झाडांवर प्रक्रिया होणार होती आणि त्यातून तयार झालेला कागदही याच नदीतून शहरांपर्यंत जाणार होता. ही नोकिया कंपनी पुढे रबर उत्पादन करू लागली, रबरावर न थांबता रबरी आवरणाच्या विजेच्या तारा- केबलसुद्धा बनवू लागली आणि विजेची उपकरणेच तयार करण्याच्या व्यवसायात बस्तान बसवून पुढे तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादनही करू लागली. नोकियाचे चित्रवाणी संच फिनलंडच्या घरोघरी पोहोचले, तोवर नोकियाचा कागद इतिहासजमा होऊन विस्मृतीत गेला होता. रबर वा वीज-उपकरणे यांना बरे दिवस नसल्याचे ओळखून नोकियाने त्याही व्यवसायांतून अंग काढून घेतले. संगणकांचे पडदेही बनवले, पण पुढे ‘प्रत्येकाहाती नोकियाच’ हे यशाचे धोरण ठेवले. ते इतके कसोशीने पाळले की, आयफोनसारखा बहुमोली- पण बहुगुणी फोन आणण्याची संधी गमावली ती गमावलीच. बरे, नंतर तरी सॅमसंगनीतीने स्वस्तात नवे तंत्रज्ञान द्यावे, तेही नाही.  
आमच्याकडे गुणवत्ता होतीच आणि कुणाच्या स्पर्धेत आम्ही नव्हतोच, असे आत्मिक समाधान मिळवणाऱ्यांचा हा प्रांत नव्हे. माहिती-तंत्रज्ञानात स्पर्धात्मकतेत टिकणे हे, काँगो किंवा अमेझॉन नद्यांकाठच्या जंगलातील सरपटणारे, उडणारे, जखडणारे किंवा लचका तोडणारे धोके ओळखत पुढे जात राहण्यासारखे. नोकियान्विर्ताचे जंगल तुलनेने फारच शांत.. तिथले एक झाड उंच वाढले, त्याने डिजिटल आकाश चुंबिले आणि अखेर कागदी इतिहासात ते जमा झाले, इतकेच म्हणायचे.

chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन
trees Thane-Belapur industrial city
हरित पट्ट्याच्या मुळावर एमआयडीसी, २०० झाडांची कत्तल होणार, पर्यावरणवादी संस्थेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार