*  लेखक  राज्यशास्त्राचे प्राध्यापक व परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक आहेत.
अमेरिकेची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सध्या तरी हस्तक्षेपवादी अशीच आहे. पडत्या आर्थिक काळात ही प्रतिमा सुधारण्याचे काम अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापुढे आहे. त्यासाठी अमेरिकेच्या ज्ञात धोरणांपेक्षा निराळा दृष्टिकोन असलेले, त्यामुळेच वादग्रस्तही ठरलेले चक हॅगेल यांची नियुक्ती संरक्षणमंत्री पदावर करण्याची शिफारस ओबामांनी केली आहे. आगामी ‘हॅगेलपर्वा’त अमेरिकेच्या इराण, अफगाणिस्तान, सीरिया आणि चीनविषयीच्या धोरणावर प्रामुख्याने परिणाम होतील..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सध्या आपला राष्ट्रीय सुरक्षा संघ निवडण्याच्या प्रयत्नात आहेत. अध्यक्षपदासाठी पुनर्नियुक्ती झाल्यानंतर परराष्ट्र आणि संरक्षण क्षेत्रातील उगवत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ओबामा नवीन राष्ट्रीय सुरक्षा संघ बनवत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाचा भाग म्हणून काही दिवसांपूर्वी ओबामा यांनी अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून चक हॅगेल यांच्या, तर अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखपदी जॉन ब्रेनन यांच्या नावाची घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण निर्धारित करण्यात अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे योगदान महत्त्वाचे आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणावर संरक्षण मंत्र्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा जबरदस्त प्रभाव पडतो. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रीपदासाठी हॅगेल यांचे नाव घोषित करून ओबामा यांनी सर्वाना आश्चर्याचा धक्काच दिलेला नाही, तर एका नवीन वादाला जन्म दिला आहे.
हॅगेल हे अमेरिकेत एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या संरक्षण क्षेत्रातील करिअरची सुरुवात १९६०च्या दशकातील व्हिएतनाम युद्धात सहभागी होऊन केली. या युद्धात ते जखमीही झाले. १९९७ साली ते अमेरिकेच्या सिनेटवर नेब्रास्कामधून रिपब्लिकन पक्षातर्फे निवडून आले. त्यांनी आपले हे पद २००९ पर्यंत टिकवले. त्यांची सिनेटर म्हणून कारकीर्द अतिशय वादग्रस्त ठरली. इराक आणि इस्रायलच्या प्रश्नावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना मोठय़ा टीकेचा सामना करावा लागला. हॅगेल यांनी अमेरिकेच्या इराकमधील लष्करी हस्तक्षेपावर, तेथील सद्दाम हुसेनची राजवट उलथून पाडण्याच्या धोरणावर तीव्र आक्षेप घेतला. अमेरिकेच्या या हस्तक्षेपी धोरणामुळे अमेरिकेने पश्चिम आशियात अनेक शत्रू निर्माण केले, असे हॅगेल यांचे मत होते. २००८ मध्ये हॅगेल यांनी ‘अमेरिका अवर नेक्स्ट चॅप्टर’ हा ग्रंथ लिहून अमेरिकेच्या अफगाणिस्तान आणि इराकमधील फसलेल्या धोरणाचा सविस्तर परामर्श घेतला. अफगाणिस्तानमधील लष्करी मोहीम चालू असतानाच इराकमध्ये लष्करी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नव्हती अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. इस्रायलच्या बाबतीत त्यांच्या परखड मतांनी अमेरिकेतील ज्यू लॉबीला चांगलेच नाराज केले. अमेरिकेचे इस्रायलबरोबर जरी घनिष्ठ संबंध असले तरी अमेरिकेने आपल्या इतर राष्ट्रांबरोबरच्या विशेषत: पश्चिम आशियातील राष्ट्रांबरोबरच्या संबंधाचा बळी देऊन इस्रायलशी मैत्री टिकवायला नको. त्याचबरोबर त्यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील शांतता बोलण्यांच्या अपयशासाठी इस्रायललाच जबाबदार धरले. हॅगेल यांची इराणविषयीच्या धोरणासंबंधीची भूमिकादेखील वादग्रस्त ठरली. त्यांच्या मते अमेरिकेने इराकमध्ये जी चूक केली, त्याचीच पुनरावृत्ती इराणमध्ये होत आहे. इराकप्रमाणेच इराणमधील राजवट बदलण्याचे अमेरिकेचे जे प्रयत्न चालू आहेत ते निर्थक आहेत. इराणविरुद्धच्या आर्थिक बहिष्काराच्या अमेरिकेच्या धोरणाला त्यांनी विरोध केला. अमेरिकेने इतर राष्ट्रांमध्ये लष्करी हस्तक्षेप करून आपल्या सैनिकांचा बळी देऊ नये अशी हॅगेल यांची भूमिका आहे. व्हिएतनाम युद्धात हजारो अमेरिकन सैनिक मारले गेल्यानंतर परराष्ट्राच्या भूमीवर अमेरिकन सैन्य पाठवण्याविषयी नकारात्मक भूमिका त्यांनी घेतली. २००९ मध्ये ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हॅगेल यांनी लष्करी हस्तक्षेपाला आणि अमेरिकन सैन्य परराष्ट्रात पाठवण्याच्या धोरणाला कडाडून विरोध केला. हॅगेल यांच्या या सर्व वादग्रस्त भूमिकांमुळे आणि वक्तव्यांमुळे डेमॉक्रॅट आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांकडून संरक्षण मंत्री म्हणून त्यांची नेमणूक करण्याच्या ओबामा यांच्या निर्णयाला विरोध होत आहे.
मुख्य प्रश्न आहे तो ओबामा यांनी अशा वादग्रस्त व्यक्तिमत्त्वाची संरक्षण मंत्र्यासारख्या शक्तिशाली पदावर नियुक्ती का केली? ओबामा यांचा या निवडीमागचा उद्देश जाणून घ्यायचा असेल तर प्रथम ओबामा यांची अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाविषयीची नवी भूमिका समजावून घ्यावी लागेल. ओबामा यांना आपल्या दुसऱ्या कालखंडात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाला नवीन दिशा द्यायची आहे. यासाठी त्यांनी उदारमतवादी आणि वास्तववादी विचारसरणींचे मिश्रण असणारे एक नवीन धोरण अंगीकारले आहे. त्यांच्या उदारमतवादी विचारसरणीला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी हॅगेलसारख्या व्यक्तीची, तर वास्तववादी विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी जॉन ब्रेनन यांची निवड केली, हे उघड आहे.
ब्रेनन हे गेली चार वर्षे ओबामा यांच्या दहशतवादविरोधी गटाचे नेतृत्व करीत आहेत. हवाई हल्ल्याद्वारे दहशतवाद्यांचा नायनाट करण्याच्या धोरणाचे शिल्पकार म्हणून ब्रेनन यांच्याकडे पाहिले जाते.
हॅगेल यांच्या संरक्षण मंत्रीपदी निवडीचा अमेरिकेच्या इराण, अफगाणिस्तान, सीरिया आणि चीनविषयीच्या धोरणावर प्रामुख्याने परिणाम होणार आहे. हॅगेल यांच्या निवडीमुळे अमेरिकेच्या इराणविषयीच्या आक्रमक धोरणाला वेसण लागणार आहे. अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री लिओन पॅनेटा यांनी इराणविषयी अतिशय आक्रमक भूमिका स्वीकारत आक्रमणाची धमकी दिली होती. हॅगेल यांचा भर इराणवरील आक्रमणापेक्षा चर्चेच्या माध्यमातून इराणचा प्रश्न सोडवण्यावर असेल. इराक आणि अफगाणिस्तानमधील कटू अनुभवानंतर ओबामा यांचीदेखील हीच इच्छा आहे. सीरियाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेपाच्या धोरणाला हॅगेल यांच्या निवडीमुळे लगाम लागणार आहे. लीबियामधील लष्करी हस्तक्षेपाचे धोरण फसल्यानंतर हॅगेल सीरियाच्या बाबतीत याची पुनरावृत्ती करतील असे वाटत नाही. हॅगेल यांचा भर लष्करी माध्यमापेक्षा चर्चेच्या माध्यमावर अधिक आहे. त्यांच्या निवडीमुळे अफगाणिस्तानमधून आपले सैन्य काढून घेण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना आणि योजनेला गती प्राप्त होईल.
अमेरिकेने २००९ पासून आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्धच्या आपल्या धोरणात बदल घडवून आणला आहे. येमेन, सोमालिया आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा सामना अमेरिका हवाई हल्ल्याद्वारे करीत आहे. यासाठी मनुष्यरहित लढाऊ विमानांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो आहे. या हवाई हल्ल्यामुळे अमेरिकन सैनिकांची जीवित हानी टळते आहे. हॅगेल यांची जीवित हानी टाळण्याचीच भूमिका असल्यामुळे त्यांच्या कारकीर्दीतही हवाई हल्ल्यांच्या या धोरणात सातत्य राहील असे वाटते.
हॅगेल यांच्या कारकीर्दीत अमेरिकेच्या चीनविषयक धोरणातही निश्चित बदल होईल. सध्या अमेरिकेने चीनविषयक आक्रमक धोरण स्वीकारले आहे. अमेरिकेने आपला मोर्चा उत्तरपूर्व आशियाकडे वळविला असून तेथील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपवादी धोरणांना लगाम घालण्याचा प्रयत्न करत आहे. या क्षेत्रात अमेरिकेने आपली लष्करी कुमक वाढविली असून लष्करी कवायती सुरू केल्या आहेत. हॅगेल यांची चीनविषयक भूमिका ही उदार आहे. ते चीनला अमेरिकेचा शत्रू मानत नाहीत. त्यांच्या मते चीन हा अमेरिकेचा शत्रू नाही तर स्पर्धक आहे. चीनचा सामना लष्करी माध्यमातून नाही, तर सकारात्मक आर्थिक भागीदारीतून करावा अशी त्यांची मागणी आहे. परिणामी, हॅगेल यांच्या कारकीर्दीत अमेरिकेची चीन विरोधाची धार बोथट होईल असे वाटते. अर्थात यामुळे हॅगेल यांना अमेरिकन संरक्षण मंत्रालयातील चीनला शत्रू मानणाऱ्या फार मोठय़ा वर्गाचा विरोध सहन करावा लागेल.
ओबामा यांना आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कालखंडात अमेरिकेची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारावयाची आहे. अमेरिका आपल्या आक्रमक आणि हस्तक्षेपवादी धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायात विश्वासार्हता गमावीत आहे. यावर उपाय म्हणून ओबामा यांना अमेरिकेची एक उदार प्रतिमा जगापुढे आणायची आहे. हॅगेल यांची निवड याच उद्दिष्टासाठी करण्यात आली आहे. ही निवड ओबामांना त्यांच्या प्रयत्नात उपकारक ठरेल, असे वाटते.

* शुक्रवारच्या अंकातील ‘गल्लत- गफलत- गहजब’ या राजीव साने यांच्या सदरात, ‘एफडीआय आणि क्रोनी कॅपिटॅलिझम’ यांवरल्या चर्चेचा मागोवा.