जोवर संकुचित गोष्टीत माणूस अडकून असतो आणि त्यालाच सर्वस्व मानून ते टिकवण्यासाठी धडपडत असतो तोवर तो व्यापक होणार कसा? थोडय़ाच्या खोडय़ात अडकलेला जेव्हा त्या थोडय़ाचा त्याग करतो तेव्हा सर्व काही त्याचंच होतं, असं हृदयेंद्रनं पुन्हा ठामपणे सांगितलं. कर्मेद्र मात्र उसळून म्हणाला..
कर्मेद्र – जेव्हा मी आहे तेही गमावून बसेन ना तेव्हा सर्व जग मला वाऱ्यालाही उभं राहू देणार नाही.. एक माणूस होता. त्याला वाटायचं की आपण उंदीर आहोत. तो रस्त्यावर जायलाही घाबरायचा. मानसोपचार तज्ज्ञानं अनेकवार धीर दिला. एक दिवस असं वाटलं की आता, आपण उंदीर नाही, माणूस आहोत, हे त्याला पटलं आहे. तो समाधानानं दवाखान्याबाहेर पडला आणि काही सेकंदात धावत आत आला. डॉक्टर म्हणाले, ‘‘काय झालं?’’ तो म्हणाला, ‘‘बाहेर मांजर आहे.’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘अरे पण तू तर उंदीर नाहीस, माणूस आहेस!’’ तो म्हणाला, ‘‘हे मला माहीत आहे, पण मांजराला थोडंच माहित्ये?’’ तसं मी भले सर्वकाही मिळवण्यासाठी आहे त्याचाही त्याग करायला तयार होईनही, पण जगाला थोडंच माहित्ये? सर्व मिळण्याची गोष्ट सोडंच, जग थोडंसुद्धा मला परत मिळू देणार नाही!
हृदयेंद्र – कर्मू, आपण या विषयावर मागेही बोललो आहोत, हे मिळवणं-सोडणं हे मनातलं आहे. बाहेरून काहीच सोडायचं नाही, मनातून सोडायचं आहे. तू भले श्रीमंत आहेस, आणखी श्रीमंत हो, काय बिघडलं? पण मनानं त्यात अडकू नकोस. तुझ्याकडे दहा रुपये आहेत की दहा कोटी, यानं काय फरक पडतो? जीव दहा रुपयांत अडकला काय किंवा दहा कोटीत अडकला काय, बंधनाची पकड दोन्हीकडे तेवढीच आहे ना?
कर्मेद्र – मित्रहो, तुमच्या विचारपतंगांना मी कापू शकत नाही.. असो! आता मी कधी सिगारेट ओढली तर लक्षात ठेवा, मी बाहेरून ती सोडलेली नाही, मनानं सोडून दिली आहे! (हृदयेंद्र हसत त्याला रट्टय़ा मारतो, तो चुकवत हसत..) मी माझ्या व्यसनात अडकलेलो नाही, तुम्ही माझं व्यसन सोडवण्यात अडकू नका!!
ज्ञानेंद्र – नाही नाही.. आम्ही अडवणार नाही. पुढे आपल्या या सत्संगचर्चा रुग्णालयातही होऊ शकतील की!
कर्मेद्र – द्या द्या शाप द्या!!
तोच सखारामनं हाक मारली. सर्वजण टेबलाशी गेले. आमरसानं जेवणाची गोडी वाढली होती. तृप्त मनानं चौघं जेवू लागले..
हृदयेंद्र – (स्मितमुद्रेनं..) रामकृष्ण म्हणत, पंगत बसेपर्यंत किती कलकल.. पण एकदा जेवणावळ सुरू झाली की सगळ्यांची बोलती बंद! तसं ज्ञान होईपर्यंत सगळा गोंधळ आहे. ज्ञान झालं की बोलणंच संपलं!!
कर्मेद्र – तुमच्या चर्चेत मला तितकासा रस नाही, पण काय आहे तीन विद्वान चर्चेला बसले की मूळ चर्चा कुठून सुरू झाली तेच आठवेनासं होतं त्यांना.. म्हणून एक अडाणी लागतोच! तर लोकहो तुम्ही काहीतरी मौनावर बडबड करणार होतात..
हृदयेंद्र – मी विसरलेलो नाही, पण मौनावर नव्हे आपली चर्चा ‘अवघा तो शकुन। हृदयी देवाचं चिंतन’ या अभंगावर सुरू आहे आणि ‘हृदयी देवाचं चिंतन’ व्हायचं, तर आधी ‘मी’ आणि ‘माझे’चं चिंतन थांबलं पाहिजे. त्यासाठीच मौनाभ्यास आहे..
कर्मेद्र – मग तुमच्या चर्चेचा पतंग मुक्तीवरही आला..
हृदयेंद्र – हो, जोवर खरी मौनावस्था साधत नाही तोवर मुक्तीही नाही!
कर्मेद्र – म्हणजे सगळंच एकूण त्रांगडं आहे तर!
हृदयेंद्र – उलट त्रिगुणांच्या त्रांगडय़ातून बाहेर पडणं आहे!
कर्मेद्र – आता आणखी गुंता वाढतोय बरं का! मी काय म्हणतो, तो बाहेरचा गुंता जाऊ दे.. या चर्चेच्या गुंत्यातून तरी सुटा पटकन्! व्हा तात्काळ मुक्त..
योगेंद्र – मुक्ती काही एवढी सोपी नाही.. सलोकता, समीपता, सरूपता या तीन मुक्ती साधल्यानंतर अखेरीस सायुज्यता मुक्ती आहे..
कर्मेद्र – घ्या! म्हणजे ती मुक्तीही बिचारी एकटी नाही!
हृदयेंद्र – (हसत) हो, पण हे मुक्त होण्याचे टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर मौनावस्थेचा संबंध आहे..
ज्ञानेंद्र – ते कसं काय?
कर्मेद्र – आता चर्चा थोडी थांबवा आणि आधी या आमरसाच्या समीपतेचा लाभ घ्या..
चैतन्य प्रेम