केरळच्या थिस्सूर जिल्हय़ात १५ फेब्रुवारी १९२१ रोजी जन्मलेल्या कोट्टरपट्ट चट्ट कुट्टन ऊर्फ के. सी. कुट्टन यांचा पेशा हॉटेलातील द्वारपालाचा; पण ते जगप्रसिद्ध आहेत. त्यांचे निधन १८ नोव्हेंबरला झाल्याची बातमी जगभरात पसरली, हळहळ व्यक्त झाली, त्याहीआधी ‘लोनली प्लॅनेट’च्या नियतकालिकासह अनेक पर्यटन-मासिकांनी कुट्टन यांच्या व्यक्तिमत्त्वाची दखल घेतली होती..
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ, जपानचे सम्राट हिरोहितो, लॉर्ड माऊंटबॅटन, महात्मा गांधी, पंडित नेहरू, लेखक आर्थर सी. क्लार्क, रिचर्ड निक्सन, युरी गागारिन.. या साऱ्या प्रख्यात व्यक्ती श्रीलंकेच्या राजधानीत, कोलंबोमध्ये ज्या ‘हॉटेल गाले फेस’मध्ये उतरल्या होत्या, त्या साऱ्यांचे स्वागत खास भारतीय नमस्काराने करण्याचे काम द्वारपाल कुट्टन यांनीच तर केले होते! ज्यांचे स्वागत झाले ती व्यक्तिमत्त्वे मोठी, म्हणून स्वागत करणाराही मोठा काय, हा मुद्दा मग आपसूक गैरलागू ठरला.. एवढय़ा साऱ्यांचे स्वागत एकानेच केले, हे अगदी साहजिकपणे जगाच्या- किमान पर्यटनप्रेमींच्या तरी- कौतुकास पात्र ठरले आणि मग के. सी. कुट्टन हेही व्यक्तिमत्त्व साजरे झाले.. अगदी एखाद्या ‘सेलेब्रिटी’सारखी त्यांची ओळख करून देणारे लिखाण जगभर झाले. ‘हॉटेल गाले फेस’च्या संकेतस्थळावर या विश्रांतिधामाचा १८६४ सालापासूनचा इतिहास सांगणाऱ्या विभागातील अखेरचा परिच्छेद – ‘९० वर्षांचे के. सी. कुट्टन हे आमच्याकडे अर्धशतकभर सेवा देत आहेत.. त्यांनी आजवर.. यांचे स्वागत केले आहे’ असा असल्याने खुद्द कुट्टन हेच इतिहासाचा भाग बनले होते.
वयाच्या १७ व्या वर्षी- १९३८ साली केरळहून श्रीलंकेत आलेले कुट्टन १९४४ पासून या हॉटेलात रूमबॉयचे काम करीत होते. पुढे ते वेटर झाले आणि मग द्वारपाल. त्यांच्या अक्कडबाज मिशा, डोईवर नव्वदीतही टिकलेले केस यापेक्षाही त्यांचा वेश अधिक वैशिष्टय़पूर्ण ठरला : अनेक मेडल, बिल्ले, झेंडे आदी टाचलेला पांढरा कोट आणि खाली पायघोळ पांढरी लुंगी! पाहुणेमंडळींची उरलेली पितळी बटणे आपल्या कोटावर लावण्याची सुरुवात कुट्टन यांनी कधी काळी केली होती; पण पुढे पाहुण्यांनीच आठवण म्हणून त्यांना बिल्ले देणे सुरू केले. त्या सौहार्दाने भरून गेलेल्या छातीचा कोट, पाहुणा किती छोटा वा मोठा हे न पाहता सहज आपल्यासह छायाचित्रे काढू देत असे.. असेच एक छायाचित्र उर्सुला अ‍ॅण्डेस या ‘बॉण्ड गर्ल’ अभिनेत्रीसोबतचे..  
कुट्टन यांची नव्वदी याच हॉटेलात २०११ मध्ये साजरी झाली होती. निव्र्यसनीपणा आणि योग्य खाणे हे दीर्घायुष्याचे रहस्य ते सांगत.. पण एक आणखीही रहस्य होते : आपल्या कामात आनंद मानण्याची वृत्ती! याच कारणासाठी मृत्यूनंतरही कुट्टन यांची आठवण येत राहील.