25 September 2020

News Flash

बोलंदाजांचा अतिआत्मविश्वास!

घरच्या खेळपट्टीवर प्रत्येक क्रिकेट संघ दादा असतो असे म्हणतात, पण भारतीय संघाच्या बाबतीत मात्र सध्या ते खरे ठरताना दिसत नाही. मनाजोगी खेळपट्टी मिळाली, संघ प्रतिस्पध्र्यापेक्षा

| December 19, 2012 03:53 am

घरच्या खेळपट्टीवर प्रत्येक क्रिकेट संघ दादा असतो असे म्हणतात, पण भारतीय संघाच्या बाबतीत मात्र सध्या ते खरे ठरताना दिसत नाही. मनाजोगी खेळपट्टी मिळाली, संघ प्रतिस्पध्र्यापेक्षा कागदावर बलवान, अनुभवी, पण तरीही पदरी पडला तो मानहानीकारक पराभव. सारे काही आपल्या बाजूने असताना भारतीय संघ मालिका जिंकला नाही याचे कारण अतिआत्मविश्वास आणि बदल न करण्याची वृत्ती, असे उत्तर देता येऊ शकते. इंग्लंडचा संघ भारतात येण्यापूर्वी प्रत्येकाने ‘इंग्लंडचे वस्त्रहरण करणार’ आदी तारे तोडले होते. ‘बोलंदाजी’त सारेच खेळाडू मश्गूल असल्याने प्रत्यक्षात सरावासाठी त्यांनी मेहनत घेतलीच नाही. याउलट, इंग्लंडच्या संघाने भारतात येण्यापूर्वी दुबईत कसून सराव केला. सराव सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघात त्यांना एकाही फिरकीपटूचा सामना करायला मिळाला नाही, तरीही ते डगमगले नाहीत. फिरकीला पहिल्या दिवसापासून अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर ते खेळले आणि जिंकलेही. कारण आपण जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर विजय साध्य करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. त्यांनी वातावरण आणि खेळपट्टीनुसार खेळामध्ये बदल केला, पण दुसरीकडे भारतीय संघाची मनोवृत्ती खेळात बदल करण्याची नक्कीच नव्हती. आपण कुणी तरी महान आहोत आणि आपल्या घरात कुणीच आपल्याला पराभूत करू शकत नाही, या अतिआत्मविश्वासानेच भारतीय संघाचा घात केला. अनुभवाच्या पूर्वपुण्याईवर काही जणांनी भारतीय संघात आपले स्थान पक्के केले असले, तरी या पराभवातून निवड समितीने काही तरी बोध घ्यायला हवा, असेच चित्र आहे. संघातील गटबाजी आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या वृत्तीचा फटका या वेळी नक्कीच संघाला बसला. आपल्या शिरावर असलेला कर्णधारपदाचा मुकुट कोणीही हिरावू शकत नाही, या आविर्भावात भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या मालिकेत वावरताना पाहायला मिळाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अभय आपल्याला आहे हे धोनीला चांगलेच माहीत आहे. एक वेळ निवड समिती सदस्य बदलेल, पण मी कर्णधारपदावरून नाही, हे माहीत असल्यानेच धोनी निर्धास्त आहे. त्याने फिरकी खेळपट्टीची मागणी केली, ती मान्यही झाली. पण फिरकीसाठी अनुकूल क्षेत्ररक्षण लावलेच नाही. पहिला सामना जिंकल्यावर धोनीला मालिका विजयाचा भास झाला आणि त्यामध्येच तो रमला. त्यानंतर वानखेडेच्या फिरकीला पोषक खेळपट्टीवर त्याने हरभजन सिंगला अनपेक्षितपणे संघात घेतले, पण त्याला जास्त गोलंदाजी दिलीच नाही. दुसरा सामना गमावल्यावर मालिकेत दोन्ही संघांची १-१ अशी बरोबरी झाली. तरीही धोनी निर्धास्त होता.. आपला ‘मिडास टच’ काही तरी नक्कीच जादू करील, असे त्याला वाटत असावे. कोलकात्यातील खेळपट्टी धोनीच्या आग्रहानुसार बनवण्यात आलेली नसली तरी ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांना मदत करणारी होती. पण भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी पुन्हा एकदा बोथट दिसली, यामध्ये काही बदल करायला हवा किंवा नवीन डावपेच आखायला हवेत, असे धोनीला याहीवेळी वाटले नाही. जामठय़ाच्या संथ खेळपट्टीवर तो चार फिरकीपटूंसह का उतरला, हेदेखील अनाकलनीय असेच होते. लाजिरवाण्या पराभवाचे खापर फलंदाज आणि वेगवान गोलंदाजांवर फोडून धोनी मोकळा झाला आहे. पराभवाचे शल्य त्याच्या चेहऱ्यावर कुठेच नव्हते. बीसीसीआयने कडक पावले वेळीच उचलली नाहीत, तर हे असेच अविरत चालू राहील आणि भारतीय संघ आपला क्रिकेट जगतातील मान गमावून बसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 3:53 am

Web Title: overconfidence of speaker
टॅग Sports
Next Stories
1 अन्वयार्थ : भूसंपदेचा क्षय
2 अन्वयार्थ : हितसंबंधीयांची बाबूशाही
3 खासगी शाळांना कायद्याची चौकट
Just Now!
X