पुरस्कार (पु.) १ पुढे नेणे, २ पुढाकार, ३ प्रशंसा, सत्कार (सं).. आपण शब्दांचे अर्थ नीट समजून घेत नाही आणि त्यामुळे अनेक घोळ होत असतात. पद्म पुरस्कारांवरून सध्या सुरू असलेला वाद हा त्यातलाच प्रकार आहे. पुरस्कार या शब्दाचा शब्दकोशातील एक अर्थ पुढे नेणे असा असेल, तर पद्म पुरस्कारांबाबत वादाचे काही कारणच उरत नाही. तथापि अधिकार, पारदर्शकता अशा शब्दांचा सध्या जो अतिवापर सुरू आहे त्यामुळे असे वाद घडत आहेत. यास खरा कारणीभूत आहे तो माहिती अधिकार कायदा. तो नसता, तर हा वाद उद्भवलाच नसता. आरटीआय हा नुसता नॉन्सेन्स वटहुकूम असता, तरी त्याचे टराटरा फाडणे वगरे काही करता आले असते. परंतु तो कायदाच असल्याने त्यास गंधाक्षता वाहण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही आणि तसेही या कायद्याने करायचे ते नुकसान केलेलेच आहे. आता पुढील २६ जानेवारीस जेव्हा पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर होतील, तेव्हा सर्व देशवासीयांच्या मनात हीच शंका असेल, की या विजेत्यांस कोणी कोणी बरे ‘पुढे नेले’ असेल? खरे तर सर्व आजी व भावी पद्म पुरस्कार विजेत्यांबद्दल आमच्या मनी नितांत आदर आहे. आपापल्या कार्य-कर्तृत्वामुळेच त्यांत अर्थातच रा. रा. सफ अली खाँसाहेब यांचाही समावेश आहे- या पुरस्कारापर्यंत पोचले आहेत, असे आम्ही मानतो. तरीही आम्हांस असे वाटते, की पुरस्कार आणि कार्यकर्तृत्व यांचा संबंध असलाच पाहिजे, हा काही मूठभरांनी निर्माण केलेला भ्रम आहे. तो निखंदून काढण्याचा प्रयत्न आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सातत्याने करीतच असतो. आदर्श शिक्षक, कृषिरत्न आदी सरकारी पुरस्कारांत हल्ली कार्यकर्तृत्वास वगरे फारसे मोजले जात नाही, हे लोकशाहीस धरूनच आहे. परंतु साहित्य परिषदा, सामाजिक संस्था व प्रतिष्ठाने, पत्रकारांचे संघ यांनीही या कामी दिलेले योगदान स्पृहणीय असेच आहे. यामुळे समाजामध्ये विविध पुरस्कार विजेत्यांची एक फौजच्या फौज निर्माण झालेली प्रत्यही दिसते आहे. आज समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक, बौद्धिक स्तराचा आलेख जो उंचावलेला दिसतो तो यामुळेच, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. तसे न करता काही नतद्रष्ट उगाचच पुरस्कारांतील शिफारशींच्या िशगरांना दोष देतात, हे अयोग्य आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी उषा मंगेशकर यांचे किंवा अमरसिंग यांनी सुश्री जयाप्रदा यांचे नाव सुचवले, तर त्यात कसली घराणेशाही? एरवी आपण सगळ्या गोष्टींची सुरुवात घरापासून करावी असे म्हणतो. मग तो न्याय पुरस्कारांना लावायला नको? लतादीदींना आपला भाऊ पंतप्रधान व्हावा असे वाटले, तर ते योग्य आणि बहिणीस पद्म मिळावे असे वाटले, तर ते अयोग्य हा कुठला न्याय? डॉ. शिलिन शुक्ला यांच्यासारख्यांनी तर पद्म पुरस्कारासाठी स्वत:चीच शिफारस केली होती. या धाडसाला सलाम करणे सोडून त्यावर टीका केली जाते हे सामाजिक पोटदुखीचेच लक्षण आहे. वादाची ही चिखलफेक बंद करायची असेल, तर यापुढे पद्म पुरस्कारांचे रीतसर लिलाव झाले पाहिजेत. हवे तर त्याकरिता पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांचे नामकरण पद्म टूजी, पद्म थ्रीजी, पद्म फोरजी असे करावे. याने पुरस्कारांसाठीची सगळीच हांजी हांजी तरी बंद होईल.