‘खुनाभोवतीचे छानसे वातावरण वाचायचे असेल, तर अ‍ॅगाथा ख्रिस्ती वाचा’ अशा शब्दांत पी डी जेम्सबाईंनी मराठीभाषक इंग्रजी वाचकांना अधिक परिचित असलेल्या ख्रिस्तीबाईंचे कौतुक केले आहे, की ख्रिस्ती यांचे लिखाण रंजनवादीच होते अशी टीका केली आहे, हे रहस्यच आहे. एक मात्र खरे, की रहस्यकथा लिहिणाऱ्या या दोघी ब्रिटिश लेखिकांचा मगदूर निरनिराळा होता. ख्रिस्ती यांचा जीवनकाळ १८९० ते १९७६, तर जेम्स त्यांच्यानंतरच्या.. १९२० साली जन्मून २८ नोव्हेंबर २०१४ रोजी मरण पावलेल्या. आदल्या पिढीच्या साहित्यिकांबद्दल नंतरच्यांचा जो विद्रोही तुच्छतावाद असतो, तो जेम्स यांना ख्रिस्ती यांच्याबद्दल होता, असे मानण्यास जागा आहे. एकंदर १९ रहस्यमय कादंबऱ्या लिहिणाऱ्या जेम्स यांचा ‘टॉकिंग अबाऊट डिटेक्टिव्ह फिक्शन’ हा त्यांचा व्याख्यानसंग्रह २००९ साली पुस्तकरूपाने आला, त्यातही त्यांची अ‍ॅगाथा-अढी चोखंदळांना दिसली होती. अमेरिकन रहस्य-कादंबरीकारांचे जेम्स यांनी या पुस्तकात केलेले कौतुकही असेच ‘रहस्यपूर्ण’ आहे! ‘अमेरिकी रहस्य-कादंबरीकारांनी जी भाषा, रचनाशैली आणि कथनामध्ये चमकदार विधाने पेरण्याची जी रीत रुळवली, तिचा प्रभाव अमेरिकी साहित्यावर एरवीही दिसू लागला आहे,’ असे त्या म्हणतात. हे कौतुक की टीका, असा प्रश्न पडणाऱ्या या विधानांतून एक गोष्ट मात्र झळाळते, ती म्हणजे जेम्सबाईंचे ओतप्रोत ब्रिटिश असणे!
 जेम्स यांना २००७ मध्ये उमराज्ञीपद (बॅरोनेस ऑफ हॉलंड पार्क) मिळाल्याने हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या त्या सदस्य झाल्या. पहिल्या महायुद्धानंतरचे बालपण व दुसऱ्या महायुद्धानंतरचा संसार यांतून अनेक चटके सोसल्यावर वयाच्या ४२ व्या वर्षी, १९६२ साली ‘कव्हर हर फेस’ ही त्यांची पहिली रहस्य कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यातील अ‍ॅडम डाल्ग्लिश हा तपासनायक (पेशाने स्कॉटलंड यार्डचा डिटेक्टिव्ह) पुढील १४ कादंबऱ्यांत टिकला, तर कॉर्डेलिया ग्रे ही तपासनायिका (प्रायव्हेट डिटेक्टिव्ह) अन्य दोनच कादंबऱ्यांत चमकली. २०२१ नंतरच्या काळात घडणारी ‘चिल्ड्रन ऑफ मेन’ (प्रकाशनकाळ १९९२) आणि १८०३ साली घडणारी ‘डेथ कम्स टु पिम्बर्ली’ (२०११) लिहून त्यांनी, ‘साहित्याची समकालीन प्रश्नांशी सांधेजोड अयोग्य’ हे स्वत:चे मत बुरसटलेले कसे नाही, हेही दाखवून दिले.
लेखनतंत्राची ताकद, लेखनक्रियेविषयी चिंतन हे गुण असणाऱ्या जेम्स रहस्यकथांतच का रमल्या याचे एक कारण त्यांच्या नोकऱ्यांत आहे. तरुणपणी सरकारी रुग्णालयात समुपदेशक आणि पुढे पोलिसी गुन्हेवैद्यक खात्यात अधिकारी म्हणून त्यांनी जग पाहिले.. मग असे काही लिहिले की, जगभरातून चार विद्यापीठांच्या सन्माननीय डी.लिट्. मिळाल्या, पन्नाशीनंतरचे आयुष्य साहित्याने बहरले!