‘अजितदादांच्या दबावामुळे श्रीकर परदेशींची बदली’ ही बातमी (८ फेब्रुवारी) वाचली. िपपरी चिंचवड महापालिकेचे कर्तव्यनिष्ठ आयुक्त ‘अखेर’ राजकीय दबावाचे बळी ठरले. यात परदेशी साहेबांचे चुकलेच! त्यांनी कर्तव्यनिष्ठता दाखवून, पारदर्शक कार्यपद्धती स्वीकारली, पण उपमुख्यमंत्री अजितदादांच्या व त्यांच्या पक्षातील नगरसेवकांच्या विरोधात जाऊन काय मिळविले? तर याचे उत्तर आहे राज्यकर्त्यांकडून बदली व सर्वसामान्य जनतेकडून फक्त निष्ठावान, जबाबदार, प्रामाणिक अधिकारी अशी विशेषणे!
 परदेशी साहेब, तुमचे चुकलेच. तुम्ही सर्वच बाबतीत नियमांचा आग्रह धरला. न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे पाडली. सत्तारूढ राष्ट्रवादीच्या नेत्यांची दुकानदारी अडचणीत आणली, पशांच्या उधळपट्टीला चाप लावला.  एवढे कमी की काय म्हणून सामान्य जनतेसाठी शहराचा विकास केला. सारथी हेल्पलाइनसारखे हिताचे अनेक निर्णय घेतले. इतका कोणी निष्ठावान, कर्तव्यदक्ष अधिकारी असतो का जनतेच्या हिताचा विचार करणारा? परंतु, तुम्ही त्याला अपवाद ठरलात. तुमचे हेच चुकले की, तुम्ही सामान्य जनतेचा विचार केला. हे करताना तुम्हाला, तुमच्यावर भारतीय प्रशासन सेवेने सोपविलेल्या जबाबदारीचे भान होते. परंतु या राजकीय नेत्यांना थोडेच भान असते त्यांच्या जबाबदारीचे? त्यांना तर भ्रष्टाचार, ‘दादा’गिरी,  नियम धाब्यावर बसविण्यासाठी, जनतेला वेठीस धरण्यासाठीच नेता व्हायचे असते.  हे तुम्हाला माहीत असूनही तुम्ही त्यांच्या विरोधात जाणे योग्य नव्हतेच!
अपर्णा बडे, पुणे

‘सॉफ्ट स्टेट’चं हे लक्षण..
मत्रीतली नतिकता आपणच पाळायची का? आणि त्यावर अनिरुद्ध ढगे यांचे ‘सॉफ्ट पॉवर’ वाढवणारे राजकारण ही पत्रे वाचली. वाचकांच्या माहितीत थोडी अधिक भर घालावीशी वाटते. कलाकारांना, कार्यकर्त्यांना, पत्रकारांना आमंत्रित करणे हा कूटनीतीचा भाग असतो. दोन भागांमध्ये याची विभागणी होते. पहिला संपूर्ण भाग म्हणजे धोरणकर्त्यांनी एकमेकांच्या देशांना भेटी देणे. दुसऱ्या भागात त्या त्या देशांतले प्रभावी परंतु बिगरराजकीय घटक सामील होतात. ढोबळमानाने यात पत्रकार, कलाकार, खेळाडू, विद्यार्थी यांचा भरणा होतो. यातही शास्त्रशुद्धरीत्या उतरता क्रम लावायचा झाल्यास बिगरराजकीय संस्था, उद्योजक, सामान्य नागरिक आणि पुढे शैक्षणिक देवाणघेवाण सुरूहोते. या सर्व खटाटोपाचे प्रयोजन म्हणजे आपल्या प्रतिस्पर्धी देशावर याचा प्रभाव पाडणे.
 ढगे यांनी वापरलेला ‘सॉफ्ट पॉवर’ हा शब्द येथे लागू होतो. ही म्हणजे अशी ताकद, की जी आपल्याला ‘लक्षात यायच्या आत व्यापून टाकते.’ मला याचा अनुभव भूतानच्या दौऱ्यात आला. श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांमध्ये भारताव्यतिरिक्त त्या त्या प्रांतातल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची स्थिती अक्षरश: शून्य आहे. पाकिस्तानात नुकताच एका वाहिनीला प्रमाणापेक्षा अधिक  कार्यक्रम दाखवल्याने जबर दंड ठोठावला गेला आहे आणि त्या वाहिन्यांची मजबुरी ही की, वाहिन्या जगवायला हे सगळे करावे लागते. समग्र भारतीय उपखंडाची स्थिती अशी आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. या देशांना ‘भारतवर्ष’ या संकल्पनेचीही धास्ती आहे आणि वर भारताच्या भावी महासत्तापद  मिरवण्याची भीती वेगळीच. तरीही ‘नतिकता आपणच का पाळायची?’ हा भारतीयांचा प्रश्न दुर्लक्षून चालणार नाही. याचं कारण म्हणजे अजूनही आपण आपला समुद्रकिनारा नीट सांभाळू शकत नाही. पोलिसांनी मेहनत करून अतिरेकी पकडला आणि त्याला कोर्टाने फाशी सुनावली गेली, की वर आपण त्याच्या धर्म, प्रांताचा विचार करत बसणार. हे नक्कीच ‘सॉफ्ट पॉवर’चे लक्षण नाही. उलट जे राष्ट्र धड आपलं राष्ट्रहित जपू शकत नाही अशा ‘सॉफ्ट स्टेट’चं हे लक्षण आहे.
सौरभ गणपत्ये

भारतीय वाद-परंपरेचे पुनरुज्जीवन असा काही मुद्दाच नव्हता..
‘लोकशाहीसाठी वाद.. सुसंवाद’ (लोकसत्ता, ६ फेब्रुवारी) या लेखातील ‘‘वादाचा नकारात्मक अर्थ मागे पडून वाद म्हणजे संवाद असा सकारात्मक अर्थ प्रस्थापित होणे गरजेचे आहे’’ हे डॉ. श्रीनिवास हेमाडे यांचे मत मान्य होण्यासारखे आहे. मात्र या लेखात खंडन-मंडन पद्धतीवर आधारित वादविवाद परंपरेचे ‘आधुनिक तात्त्विक पुनरुज्जीवन’ दिवंगत तत्त्वज्ञ मे. पुं. रेगे यांनी ‘पंडित-फिलॉसफर’ प्रकल्पाद्वारा केले व हा प्रकल्प ‘संवाद’ या नावाने प्रसिद्ध झाला अशा अर्थाचे विधान हेमाडे यांनी केले आहे. हा प्रकल्प ‘संवाद’ या नावाने प्रसिद्ध झाला हे खरे आहे, पण या विधानातील ‘‘तिचे (भारतीय वादविवाद परंपरेचे) आधुनिक तात्त्विक पुनरुज्जीवन रेग्यांनी केले’’ या दाव्यामुळे प्रा. मे. पुं. रेग्यांवर नकळत अन्याय होण्याची शक्यता आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञान म्हणजे जणू पूर्वपक्ष व भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे जणू उत्तरपक्ष असे चित्र रंगवून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचे खंडन व भारतीय तत्त्वज्ञानाचे मंडन करणे हा ‘पंडित-फिलॉसफर’ प्रकल्पाचा उद्देश असावा की काय, असा गरसमज डॉ. हेमाडे यांच्या विधानावरून होण्याची शक्यता आहे.
  ‘पंडित-फिलॉसफर’ प्रकल्पाची मूळ कल्पना जयपूरचे प्रख्यात तत्त्वज्ञ प्रा. दयाकृष्ण यांची होती. जयपूरचे प्रा. रामचंद्र द्विवेदी व  प्रा. मुकुंद लाठ, तिरुपतीचे डॉ. प्रल्हादाचार्य इ.च्या साहाय्याने त्यांनी हा प्रकल्प मे. पुं. रेग्यांच्या नेतृत्वाखाली पुणे, वाई, तिरुपती, जयपूर, वाराणसी, मुंबई, चेन्नई इत्यादी ठिकाणी राबविला. पारंपरिक पद्धतीने केवळ संस्कृतमधून भारतीय दर्शनांचाच अभ्यास केलेले विद्यार्थी व प्राध्यापक जसे आहेत तसेच विद्यापीठात इंग्रजीतूनच केवळ पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचाच अभ्यास केलेलेही आहेत, अशांसाठी हा उपक्रम असे.  भारतीय व पाश्चात्त्य अशा दोन सर्वस्वी भिन्न अशा तत्त्वज्ञानाच्या परंपरांच्या अभ्यासकांमध्ये काही महत्त्वाच्या प्रश्नांवर संवाद व्हावा,  पाश्चात्त्य तत्त्वज्ञान म्हणजे खुलेपणा व मानवी बुद्धीचा (रीझन) श्रेष्ठ आविष्कार, तर केवळ भारतीय तत्त्वज्ञान हेच सर्वश्रेष्ठ असे परस्परविरोधी वसाहतवादी पूर्वग्रह टाळले जावेत. सर्वात मुख्य म्हणजे प्राचीन भारतीय दर्शनांचा अभ्यास करणारे शास्त्री-पंडित हे केवळ सूत्रांचा अर्थ सांगणारे ‘ट्रान्सलेटर्स’ नसून पाश्चात्त्य तत्त्वज्ञांच्या बरोबरीने ‘इक्वल फूटिंग’वर गहन तत्त्वचर्चा करू शकणारे तत्त्वज्ञ आहेत, हे आधुनिकांनी मान्य करावे, तर आपल्या परंपरेत महत्त्वाचे मानलेले तात्त्विक प्रश्न पाश्चिमात्य परंपरेतही आहेत काय व त्यांची उकल त्यांनी कशी केली आहे याचा विचार शास्त्री-पंडितांनी करावा, हे या उपक्रमामागील मुख्य सूत्र होते. त्यानुसार भारतीय व पाश्चात्त्य या दोन्ही परंपरांतील एखाद्या विशिष्ट ग्रंथाच्या संदर्भात तत्त्वज्ञानातील एखाद्या विशिष्ट प्रश्नाची संवादरूपी चर्चा होत असे. यात पूर्वपक्ष-उत्तरपक्ष किंवा खंडन-मंडन असा हेतू नसे. त्यामुळे भारतीय वाद-परंपरेचे पुनरुज्जीवन असा काही मुद्दाच नव्हता. हा उपक्रम प्रत्यक्षात कितपत यशस्वी झाला याबद्दल दुमत आहे, पण केवळ भारतीय दार्शनिक परंपरा जाणणाऱ्या शास्त्री-पंडितांना तसेच केवळ पाश्चात्त्य तत्त्वज्ञाचीच ओळख असणाऱ्या आधुनिकांना अशा उपक्रमामुळेच तत्त्वचिंतनाला आवश्यक असणाऱ्या खुलेपणाचे महत्त्व पटायला मदत होते हे निश्चित. हेच या प्रयोगाचे सूत्र होते.
– प्रा. शरद देशपांडे, टागोर फेलो,
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी, शिमला

बसेसचे डिझाइन बदला
काही दिवसांपूर्वी राज्यात दोन बसेसना आगी लागून काही प्रवासी मृत्युमुखी पडले. ज्या वेळी देशात वोल्वो बसेस आल्या त्याची नक्कल करण्याची स्पर्धा खासगी बसेसमध्ये लागली. त्यांनीही आपल्या बसेसची उंची जरूर त्या सुरक्षेशिवाय वाढविण्यास सुरुवात केली. सामान्य एस.टी. बसची उंची व त्यातील आपत्कालीन दरवाजाची उंची व देशी वोल्वो बसेसच्या आपत्कालीन दरवाजाची उंची यात काही फुटांचा फरक आहे. ज्यामुळे जरी त्यातून बाहेर उडी मारली तरी दुखापत व्हायची शक्यता नाकारता येत नाही. कुठल्याही बसच्या मागे शिडी नाही, कारण सामान खालच्या डिकीत ठेवले जाते. त्यामुळे घाबरून सुमारे सहा फुटांवरून उडी मारावी लागेल, जी धोकादायक आहे. यासाठी आरटीओने या बसेसच्या डिझाइनमध्ये बदल करण्याची खासगी बसचालकांना सक्ती करावी.   
-कुमार करकरे, पुणे