कन्नड नवकथाकार व कादंबरीकार म्हणून यू. आर. अनंतमूर्तीइतक्याच आदराने ज्यांचे नाव घेतले जाते, ते यशवंत विठोबा चित्तल शनिवारी त्यांच्या कर्मभूमीत- मुंबईत वयाच्या ८५व्या वर्षी निवर्तले. मुंबईचा बहुढंगीपणा चित्तल यांच्या लिखाणात अजरामर झाला आहे. ‘मुंबईबद्दल सलमान रश्दी किंवा सुकेतू मेहता या इंग्रजी लेखकांइतक्याच ताकदीने लिहिणारा हा लेखक आहे,’ असे ‘बुकर’ विजेते लेखक अरविंद अडिगा यांनी (इंग्रजीत, ‘शिकारी’ या त्यांच्या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाच्या परीक्षणात) म्हटले होते, तर कन्नड ‘नव्यकथे’ प्रवाहातील लेखकांपैकी समाजनिष्ठ, परंपरेकडे परतण्यापेक्षा वर्तमानाचे भान असलेली भूमिका घेणारे प्रागतिक लेखक अशी त्यांची ख्याती होती. या भूमिकेमागे मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचे संस्कार होते. 

हेच यशवंत चित्तल मुंबईच्या रसायनतंत्र संस्थेतून (यूडीसीटी) १९५५ मध्ये सुवर्णपदकासह पदव्युत्तर पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाले, पुढे अमेरिकेच्या स्टीव्हन्स रसायनतंत्र संस्थेतही शिकले आणि बॅकेलाइट हायलॅम या मोठय़ा कंपनीत उच्चपदे भूषवून पुढे तिचे कार्यकारी संचालक (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर) झाले.. यूडीसीटीने सुवर्णमहोत्सवी वर्षांत त्यांना अभ्यागत प्राध्यापक म्हणून बोलावले आणि लंडनच्या ‘प्लास्टिक्स अँड रबर इन्स्टिटय़ूट’ या जागतिक विद्वत्संस्थेने त्यांना सभासदत्व बहाल केले. लौकिक यशाची ही बाजू भक्कम असूनही, माणूस आणि समाज यांच्या नात्याचा शोध घेणारे लिखाण ते सतत करत राहिले.. ‘मी माझा समाज अधिक समजून घेता यावा यासाठी लिहितो.. तसे केल्याखेरीज मला या समाजावर प्रेम करता येणार नाही, मग या जगण्यावर प्रेम करा असे लोकांना सांगता येणार नाही.. समजून घेणे महत्त्वाचे’ अशी लेखकीय भूमिका ते मांडत. ‘ज्ञानपीठ’ने त्यांना हुलकावणी दिली खरी; पण साहित्य अकादमी पुरस्कार (१९८३), त्याच वर्षी कन्नडचे खांडेकर मानले जाणाऱ्या मस्तिव्यंकटेश अय्यंगार यांच्या नावाचा पुरस्कार, कन्नड साहित्य अकादमीचे ग्रंथपुरस्कार (शिकारी – १९७९, कथेयदळु हुडिगी – १९८० आणि पुरुषोत्तम- १९९०) आणि २००८ मध्ये प्रतिष्ठित ‘पम्पा प्रशस्ति’ पुरस्कार त्यांना लाभले.
यशाच्या या कमानीमागे, आजच्या काळातील मानवी दु:खांचा वेध घेणारी लेखणी होती.. ते दु:ख व्यावसायिक स्पर्धेतून विनाकारण ठपका ठेवला गेलेल्या एखाद्या व्यवस्थापकाचे असो, की सारस्वत ब्राह्मण संस्थेच्या शिष्यवृत्तीवर शिकून मोठा झाल्यावर ‘आपले पालक ‘खालच्या जाती’चे होते’ हे कळलेल्या माणसाचे.. दु:खे वागवत माणूस जगतो कसा, त्याची आशा त्याला समाजाकडूनच कशी मिळते, हे चित्तल शोधत होते. त्यांच्या ‘मूरु दरिगळु’ (तीन मार्ग) कादंबरीवर गिरीश कासारवल्लींनी चित्रपट काढला, पण एरवी चित्तल आपल्या अरविंद गोखल्यांसारखेच, उचित प्रसिद्धीविना राहिले.