हिंदी चित्रपट, क्रिकेट, शास्त्रीय संगीत आणि साहित्य, या गोष्टी भारतीयांच्या विविधतेतील एकात्मतेचे प्रतीक मानल्या जातात. पहिल्या दोन्हींसाठी हिंदी वा इंग्रजी भाषेची आवश्यकता असते. पण शास्त्रीय संगीतासाठी त्याचीही गरज नसते. त्यामानाने साहित्य हा सर्व भारतीय भाषांतील लेखक-वाचकांना जोडणारा दुवा कसा ठरेल आणि त्यातून एक सांस्कृतिक एकात्मता कशी आकाराला येईल, हे दूरदृष्टीचे आणि प्रतिभेचे काम होते. पण स्वातंत्र्यानंतर अल्पावधीतच पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी त्या दृष्टीने एका शिखर साहित्य संस्थेची निर्मिती करायचे ठरवले. त्यानुसार १२ मार्च १९५४ रोजी ‘साहित्य अ‍ॅकॅडमी – द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ लेटर्स’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. नुकतेच या संस्थेने आपले हीरकमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. त्यानिमित्ताने या संस्थेचा सचित्र इतिहास सांगणाऱ्या ‘साहित्य अ‍ॅकॅडमी-१९५४-२०१४’ या कॉफी टेबल आकारातील देखण्या पुस्तकाचे प्रकाशन अकादमीने केले आहे. २००४ साली अकादमीला पन्नास र्वष पूर्ण झाली, तेव्हा ‘फाइव्ह डिकेड- अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ साहित्य अ‍ॅकॅडमी’ या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. त्यातून जसा अकादमीचा इतिहास तपशीलवार उलगडतो तसा या पुस्तकातून उलगडत नाही. याचे कारण हे चित्रमय चरित्र आहे. पण या पुस्तकातून अकादमीचा गाभा आणि आवाका समजून घ्यायला मदत होते. कुठल्याही व्यक्ती वा संस्थेचे मूल्यमापन करताना त्यांच्या कामाचा गाभा आणि आवाका समजून घेणे महत्त्वाचे असते. तो घेतला तर त्यांचे मूल्यमापन नीट करता येते.
आजघडीला साहित्य अकादमी ही केंद्र सरकारची स्वायत्त संस्था २४ मान्यताप्राप्त भारतीय भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित करणारी, साहित्यकृतींना उत्तेजन देणारी, त्यांच्या वेगवेगळ्या भाषांमधील अनुवादांना चालना देणारी आणि विविध साहित्य-उपक्रम घडवून आणणारी भारतातील सर्वात मोठी संस्था आहे. म्हणूनच ‘लेखकांची, लेखकांनी, लेखकांसाठी चालवलेली संस्था म्हणजे साहित्य अकादमी’ असे तिचे वर्णन केले जाते.
मान्यवर साहित्यिकांना गौरववृत्ती देणे; साहित्य अकादमी, भाषा सन्मान, युवा पुरस्कार, बाल साहित्य पुरस्कार, अनुवाद पुरस्कार आणि  विविध साहित्य-उपक्रम याद्वारे अकादमी भारतीय साहित्यातील विविधतेतील एकात्मतेला जोडून ठेवण्याचे आणि ती संघटित करण्याचे काम सतत करत आली आहे. ‘इंडियन लिटरेचर’, ‘समकालीन भारतीय साहित्य’, ‘संस्कृत प्रतिभा’ या तीन द्वैमासिकांद्वारे विविध भाषांतील साहित्याला भारतीय स्तरावर पोहोचवण्याचे काम करते. याशिवाय मान्यवर साहित्यिकांविषयीचे लघुपट, पुस्तक प्रदर्शने, चर्चासत्रे-शिबिरे-लेखक भेटी यांचे आयोजन सतत चालू असते. थोडक्यात काय तर अकादमीने गेल्या साठ वर्षांत भारतीय जनतेची साहित्यरुची, साहित्य गुणवत्ता आणि साहित्य-जाणिवा यांचे आपल्यापरीने भरणपोषण करण्याचे, ते प्रगल्भ करण्याचे काम केले आहे, करत आहे.
सुरुवातीला शिक्षण मंत्रालयाच्या एका खोलीत सुरू झालेले अकादमीचे ऑफिस नंतर कनॉट प्लेसच्या थिएटर कम्युनिकेशन इमारतीत गेले. १९६१ साली केंद्र सरकारने साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी आणि ललित कला अकादमी या तीन संस्थांसाठी तीन मजली स्वतंत्र इमारत उभारली. (तेव्हापासून या तिन्ही संस्था तेथून भारतीयत्वाचे प्रतिनिधित्व करत आहेत.) दिल्लीत मुख्यालय असले तरी १९५६ ला अकादमीचे पहिले विभागीय कार्यालय कलकत्तामध्ये सुरू झाले, १९५९ ला चेन्नईला; १९९० ला तेच बंगलोरला हलवले गेले, १९७२ ला मुंबईला कार्यालय सुरू झाले.
साहित्य अकादमीशी भारतीय भाषांतील मान्यवर साहित्यिक सुरुवातीपासूनच जोडलेले आहेत. महादेवी वर्मा यांच्यापासून गिरीश कार्नाड यांच्यापर्यंत आणि गंगाधर गाडगीळ यांच्यापासून भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंत भारतीय भाषांतील साहित्यिक इतक्या मोठय़ा प्रमाणावर इतर कुठल्याही संस्थेशी निगडित नाहीत. साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष म्हणून पं. नेहरू यांची निवड करण्यात आली, ती ते पंतप्रधान होते म्हणून नव्हे तर एक लेखक म्हणून. साहित्य अकादमीचे बोधचिन्ह सत्यजित राय यांनी तयार केले, एवढेच नव्हे तर ‘मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर’ या साहित्यमालिकेतील काही पुस्तकांची मुखपृष्ठं त्यांनी काढली. अकादमीविषयीचा सुवर्णमहोत्सवी वर्षांतला लघुपट प्रसिद्ध गीतकार-कवी गुलज़ार यांनी बनवला आहे.
हा सर्व वैभवशाली इतिहास या पुस्तकातून समर्पक छायाचित्रांद्वारे उलगडून दाखवला आहे. या पुस्तकाचे लेखन-संयोजन इंग्रजीचे प्राध्यापक, समीक्षक आणि ‘इंडियन लिटरेचर’चे माजी संपादक डी. एस. राव यांनी केले आहे. त्यांनीच ‘फाइव्ह डिकेड – अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ साहित्य अ‍ॅकॅडमी’ या पुस्तकाचेही लेखन केले. या पुस्तकातून त्यांची विचक्षण दृष्टी प्रत्ययाला येते. समर्पक छायाचित्रे आणि त्यांना उचित मजकुराची जोड, यांची भट्टी जमून आल्याने हे पुस्तक हीरकमहोत्सवी वर्षांतले अकादमीचे एक उत्कृष्ट प्रकाशन ठरले आहे.
हे पुस्तक चाळताना गेल्या साठ वर्षांतील अकादमीचा इतिहास आपल्यासमोर प्रत्ययकारी रीतीने सिनेमाच्या रिळासारखा उलगडत राहतो. छायाचित्रांची निवड आणि दर्जा चांगला असल्याने ती पूर्ण पाहिल्याशिवाय पुढचे पान उलटावेसे वाटत नाही, ही या पुस्तकाची एक जमेची बाजू आहे.
अकादमीचा विस्तार भारतभर पसरलेला असल्याने तिला महावृक्षाचीच उपमा द्यायला हवी. अकादमी भारतीय साहित्याचे प्रतिनिधित्व करणारी शिखर संस्था असल्याने अनेक गोष्टींच्या पहिलेपणाचे मान तिच्याकडे जातात. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांचीही ओळख होते. उदा. भारतीय साहित्याची राष्ट्रीय सूची, हुज हू इन इंडियन लिटरेचर, विविध भाषांतील साहित्याचा इतिहास, भारतीय साहित्याचे निर्माते ही पुस्तकमालिका, भारतीय साहित्याचा विश्वकोश, एकाच व्यासपीठावर वेगवेगळ्या भाषांमधील साहित्यिकांना आणणे इत्यादी.
एका संस्थेचा हा चित्रमय इतिहास असल्याने आणि तो हौसेखातर प्रकाशित केला असल्याने त्याला शास्त्रकाटय़ाची कसोटी फारशी लावता येत नाही. पण तरीही एक खटकणारी गोष्ट नोंदवायला हवीच. एरवी अकादमी प्रकाशित करत असलेल्या पुस्तकांच्या किमती या सर्वसामान्य वाचकांना परवडतील अशा असतात. त्यामुळे ती पुस्तके कुणालाही सहजपणे विकत घेता येतात. या कॉफी टेबल पुस्तकाचा वाचकवर्ग मर्यादित असला तरी साहित्याच्या प्रेमापोटी हे पुस्तक हौसेने खरेदी करणाऱ्यांची संख्या थोडी असेल, पण असेलच. कारण हे पुस्तक संग्राह्य़ नक्कीच आहे. पण त्याची किंमत मात्र अकादमीच्या नेहमीच्या लौकिकाला साजेशी ठेवली गेलेली नाही.
साहित्य अ‍ॅकॅडमी – १९५४-२०१४ : डी. एस. राव,
साहित्य अ‍ॅकॅडमी, नवी दिल्ली,
पाने : १९०, किंमत : २५०० रुपये.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार