28 September 2020

News Flash

असं हकनाक जाऊ नका..

घराघरांत पोलीस तैनात केला तरी गुन्हे थांबणार नाहीत, असं अतिशयोक्तीनं कुणी म्हटलं असलं, तरी महाराष्ट्रातील सध्याची कायदा सुव्यवस्था स्थिती खरोखरच गंभीर आहे.

| June 16, 2014 12:14 pm

घराघरांत पोलीस तैनात केला तरी गुन्हे थांबणार नाहीत, असं अतिशयोक्तीनं कुणी म्हटलं असलं, तरी महाराष्ट्रातील सध्याची कायदा सुव्यवस्था स्थिती खरोखरच गंभीर आहे. अशा परिस्थितीत, घराघरांचं संरक्षण करण्यासाठी निदान पोलिसी खाक्याची खमकेगिरी आणि रग अंगी असलेला तरुण तरी घराघरांत असायला हवा. कुणीही कुणालाही भर रस्त्यात छेडतोय, कुणा असहाय कंडक्टर महिलेला बसमधून बाहेर खेचून रस्त्यावर आणून तिच्या अब्रूचे धिंडवडे काढतोय आणि बघ्यांचे थवे सारे मात्र, थंडपणे हातावर हात घेऊन स्वस्थपणे बसून राहतात, अशा परिस्थितीत तरुण रक्ताची सळसळ अनुभवण्यासाठी अवघा महाराष्ट्र आतुरलेला असताना, केवळ कुठल्या तरी समज-गैरसमजांच्या पोटी म्हणा, गरजेपोटी म्हणा किंवा अपरिहार्यतेपोटी म्हणा, आपला जीव कवडीमोलानं रस्त्यावर तडफडून त्यागून टाकावा, ही शरमेची बाब आहे. कुणाला, पोलीस दलातील नोकरी म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असं वाटत असेल, तर या नोकरीतून देशसेवेचं उदात्त स्वप्नदेखील कुणी उराशी बाळगलेलं असेल.  दृष्टिकोन कसाही असला, तरी त्यासाठी अविचारीपणाने जीव पणाला लावावा, असं मात्र घडू नये. गेल्या काही दिवसांत पोलीस भरतीच्या चाचणी परीक्षांमध्येच चार उमद्या तरुणांनी आपला जीव गमावला. जगणं इतकं कवडीमोल का झालं आहे?..  नोकरीमुळे रोजगाराची भ्रांत मिटेल हे खरं आहे. पोलीस दलात नोकरी मिळविण्यासाठी भरतीच्या चाचण्या हा केवळ देखावा असतो, असंही म्हटलं जातं. पाच किलोमीटर अंतर कापण्याची स्पर्धा एखाद्या रिक्षातूनही पार पाडता येते, फक्त त्यासाठी टेबलाखालून व्यवहार करण्याची तयारी असली पाहिजे, अशीही कुजबुज ऐकू येते. असं केल्यावर नोकरी मिळते आणि या टेबलाखालच्या व्यवहाराचा कित्येक पटीने परतावा देणारी कोंबडीही हाती लागते, असेही उघडपणे सर्वत्र ऐकावयास मिळते. असे असेल तर रस्त्यावर भर उन्हात घामाच्या धारांनी निथळत पळण्याची चाचणी पार पाडताना जीव गमावणाऱ्या त्या चार जणांनी असा कोणता गुन्हा केला होता?.. अनेकांच्या मनात याच विचारांचा गोंधळ माजला असेल. पोलीस भरतीच्या नियमांची आणि नियमबाह्य़तेची चर्चाही घरोघरी झडली असेल आणि जीव गमावलेल्या त्या चार कोवळ्या तरुणांसाठी कुठे तरी डोळ्यांच्या कडादेखील ओलावल्या असतील. भरतीसाठी टेबलाखालून पैसे मोजायचे, नोकरी मिळवायची आणि मोजलेले पैसे वसूल करण्यासाठी लोकांच्या खिशावर नजरा लावून रस्तोरस्ती दबा धरून शिट्टय़ा मारत सुटायचे, असाच आजकालच्या पोलिसी नोकरीविषयीचा एकंदरीतील समज बळावलेला आहे. असे असेल तर भरती होण्यासाठी पैसे मोजण्याऐवजी, तोच पैसा स्वत:साठी खर्च करून स्वत: आरोग्यसंपन्न व्हावे, भरपूर खावे, व्यायामाची सवय लावून घ्यावी, शरीर तंदुरुस्त बनवावे आणि कोणत्याही शारीरिक क्षमतेच्या कोणत्याही चाचण्यांना तोंड देण्याची क्षमता स्वत:च्या अंगी निर्माण करावी, असा विचार करावयास काय हरकत आहे?.. पोलीस दलाकडून समाजाच्या मोठय़ा अपेक्षा असतात. आसपास खाकी वर्दीधारी चेहरा दिसला, की ओळख नसतानादेखील दिलासा वाटू लागतो. समाजात ही भावना जिवंत आहे, तोवरच हा समजूतदारपणा मनामनांत जोपासायला हवा. नाही तर, पोलीस भरतीच्या वेळी पळण्याची खडतर परीक्षा द्यायची आणि प्रत्यक्ष नोकरीत मात्र, सुटल्या पोटाचा भार सांभाळत चालणेदेखील मुश्कील व्हायचे, हा उफराटेपणाही बंद व्हायला हवा. त्यासाठी नियम बदलायची गरज असेल, तर तेही केले पाहिजे. सेवेत असताना पोलिसांच्या तंदुरुस्तीची काळजी घेतली गेली पाहिजे. ..कारण जीव कुणाचाही एवढा स्वस्त नसतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2014 12:14 pm

Web Title: police recruitment process and their duties
टॅग Police Recruitment
Next Stories
1 पांडुरंगाचे सरकारीकरण
2 नवा सिक्का
3 नवी खिलाफत..
Just Now!
X