News Flash

मातोश्री नव्हे, बारामतीची गोविंदबाग!

शरद पवार यांचे आमंत्रण स्वीकारून बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, याचे विविध राजकीय अर्थ काढले जाणारच.

| February 17, 2015 12:23 pm

शरद पवार यांचे आमंत्रण स्वीकारून बारामतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, याचे विविध राजकीय अर्थ काढले जाणारच. राज्याची राजकीय सद्यस्थितीसुद्धा, असे अनेक अर्थ काढले जाण्यासाठी पोषकच आहे!  ‘ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विनंतीमुळे’ भाजपने शिवसेनेला सत्तासहभाग दिला असला तरी सहकार्यमय सहजीवनाच्या भूमिकेत ना शिवसेना नेते आहेत, ना केंद्रातील भाजपचे नेतृत्व. शिवाय, राज्य सरकार करणार असलेल्या चौकशांतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कसे बाहेर पडणार, हाही प्रश्न आहेच..
युद्धाप्रमाणेच राजकारणात सारे क्षम्य असते. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे दोन्ही क्षेत्रांमध्ये लागू पडते. अगदी कालपर्यंत परस्परांना शिव्या देणारे दुसऱ्या दिवशी गोडवे गाताना दिसतात. आणीबाणीनंतर काँग्रेसच्या विरोधात समाजवादी, साम्यवादी, संघपरिवाराशी संबंधित अशी सारी भिन्न विचारांची मंडळी एकत्र आली होती. काँग्रेस विरोध हा तेव्हा सर्वाचा समान धागा होता. राजीव गांधी यांना राजकीयदृष्टय़ा शह देण्याकरिता जनता दलाला सरकार स्थापण्यासाठी भाजपने मदत केली होती. राजकीय फायद्यासाठी दोन भिन्न विचारसरणींच्या राजकीय पक्षांनी आडमार्गाने परस्परांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अगदी १२५ दिवसांपूर्वी ‘नॅचरल करप्ट पार्टी’ (एनसीपी) असा राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीमध्ये येऊन शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक करतात. नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचा समान शत्रू काँग्रेस. यामुळे दोघे एकत्र आले तर त्यात विशेष काय, असा साहजिकच प्रश्न उपस्थित होतो. पण मोदी आणि पवार यांनी परस्परांवर स्तुतिसुमने उधळणे यात बरीच गुंतागुंत आहे. भविष्यातील राजकारणाचे कंगोरेही आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीचा दौरा करणे किंवा शरद पवार यांनी मोदी यांना बारामतीमध्ये निमंत्रित करणे यामागे राजकारणाचे अनेक पापुद्रे आहेत. शरद पवार शक्यतो दिल्लीतील सत्तेतील पक्षांच्या जवळ राहतात, असा अनुभव आहे. १९९९ मध्ये भाजपचे सरकार असताना त्यांच्याकडे आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद होते.  २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे काँग्रेस सत्तेत असताना पवार केंद्रात मंत्री होते. काँग्रेसचा पराभव होऊन भाजप सत्तेत येताच पवारांनी पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेतले. संसदेत सत्ताधारी भाजपला मदत होईल अशीच भूमिका घेतली. काँग्रेस कमकुवत होत असताना त्याची पोकळी भरून काढण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. तसे मत पवार यांनी गेल्याच आठवडय़ात पुण्यातील शिबिरात जाहीरपणे मांडले होतेच. मोदी यांच्यासाठी उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या ४८ जागा असलेला महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचा उपयोग होऊ शकतो. परिस्थिती बदलल्यास काँग्रेसला रोखणे कठीण जाईल, पण राष्ट्रवादीला केव्हाही आटोक्यात ठेवता येऊ शकते, असे भाजपचे गणित आहे.
राज्यात सरकार टिकविण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरच सरकार टिकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे दिल्लीतील भाजप नेत्यांनी शिवसेनेशी हातमिळवणी करण्याला होकार दिला. शिवसेना सत्तेत आली तरी उभयतांचे सूर तेवढे जुळलेले नाहीत. शिवसेनेकडून अधूनमधून चिमटे काढण्याचे प्रयत्न सुरूच असतात. मोदी यांच्या मनात शिवसेनेबद्दलची अढी लपून राहिलेली नाही. शिवसेनाही मोदी यांचे महत्त्व मानायला तयार नाही. मागे मुंबईच्या सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचेही त्यांनी टाळले होते. शिवसेनेला जागा दाखवून द्यायची असल्यास राष्ट्रवादीचा उपयोग होऊ शकतो. यामुळेच मोदी यांच्यासाठी राष्ट्रवादी किंवा शरद पवार अधिक फायद्याचे आहेत. राज्यात काँग्रेसप्रमाणेच शिवसेना वाढू नये हे भाजपचे ध्येय आहे. कारण शिवसेनेची ताकद वाढल्यास त्याचा भाजपच्या मतपेढीवर परिणाम होऊ शकतो. उभयतांची मतपेढी साधारण सारखीच आहे. शिवसेनेने सत्तेत राहून दबावाचे राजकारण सुरू केल्यास फार काही किंमत देणार नाही हा संदेश मोदी यांनी बारामती भेटीतून दाखवून दिला आहे. ‘भाजपच्या नव्या नेतृत्वाला ‘मातोश्री’चे वावडे आहे, पण बारामतीमधील ‘गोिवदबाग’ (पवारांचे निवासस्थान) अधिक जवळचे वाटते’ हा संदेश गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर झळकू लागला आहे.
केंद्रात यूपीएची सत्ता असताना काँग्रेस आणि तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांच्यातील वितुष्ट जगजाहीर होते. मोदी यांना अडकविण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर करण्यात आला. मोदी हे काँग्रेसचे नं. १चे शत्रू असताना शरद पवार यांनी सरकारमध्ये राहून मोदी यांना मदत केली होती, ही माहिती मोदी यांनीच दिली.. पवारांशी बोलणे झाले नाही, असा एकही महिना गेला नसावा, असे वक्तव्य मोदी यांनी तीन-चार वेळा केले. शरद पवार यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्या मनातील अढी लपून राहिलेली नाही. मोदी यांच्या गौप्यस्फोटानंतर काँग्रेस आणि पवार यांच्यातील आधीच ताणले गेलेल्या संबंधांत वितुष्ट येण्याची चिन्हे आहेत. कारण पवार यांची भूमिका दुटप्पी होती, अशी टीका काँग्रेसमधून होऊ लागली आहे. राष्ट्रवादीवर टीका करण्याकरिता मोदी यांच्या बारामती भेटीचा काँग्रेसकडून खुबीने वापर होण्याची शक्यता आहे.
सत्तेत असताना पवार यांनी मोदी यांना मदत केली होती, तर आता राष्ट्रवादीला मदतीची आवश्यकता आहे. विविध नेत्यांवरील आरोपांमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा आधीच डागाळली आहे. गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा राष्ट्रवादीला फटका बसला. यातून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला बाहेर पडायचे आहे. छगन भुजबळ, अजित पवार आणि सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांची चौकशी राज्यातील भाजप सरकारने सुरू केली आहे. सिंचन घोटाळ्यात अजित पवार आणि तटकरे यांच्यावर आरोप झाले. सार्वजनिक बांधकाम खात्यातील घोटाळ्यात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी विशेष चौकशी पथकाने सुरू केली आहे. सिंचन घोटाळ्यात विदर्भातील सिंचन प्रकल्पांबाबत घोटाळ्यांचा आरोप होतो, पण कोकणातील प्रकल्पांची सुरुवात झाली आहे. विदर्भातील प्रकल्पांची चौकशी सत्ताधारी भाजपसाठीही तापदायक ठरू शकते, कारण यात काही सत्ताधारी पक्षाशी संबंधितांची नावे जोडली जातात. चौकशीचे स्वरूप कसे राहते यावरही बरेच अवलंबून आहे. सिंचन घोटाळ्यातील काही आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. उद्या सरकारने ही चौकशी योग्यपणे पूर्ण करून त्याचा सोक्षमोक्ष लावायचा ठरविल्यास राष्ट्रवादीचे नेते अडचणीत येऊ शकतात.
 अर्थात, हे सारे जर-तरवर अवलंबून आहे. पुतण्या अजित कोठेही अडचणीत येऊ नये, असा काका म्हणजे शरद पवार यांचा नक्कीच प्रयत्न असणार. तटकरे यांना फार काही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही व ते पवार यांच्या शब्दाबाहेर नाहीत. खरा प्रश्न छगन भुजबळ यांचा आहे. भुजबळांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यातून त्यांना बनावट मुद्रांक (अब्दुल करीम तेलगी) घोटाळ्यात चौकशीला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादीतील काही नेते भुजबळांचा काटा निघावा म्हणून नेहमीच प्रयत्नशील असतात. तेलगी घोटाळ्याच्या चौकशीतून भुजबळ सहिसलामत बाहेर पडले, पण त्यांना बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या. पक्षाने त्याही वेळी त्यांची कसोटी बघितली होती. आता त्याचीच पुनरावृत्ती होते का, हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
पवार यांचा आपण नेहमीच सल्ला घेतो वा त्यांनी मदत केली होती, याची जाहीरपणे कबुली पंतप्रधानांनी दिली. या वक्तव्यानंतर, केलेल्या मदतीची मोदी परतफेड करणार का? ती कशी करणार? याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहेच. मोदी बारामतीमध्ये आले याचाच अर्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही हे स्पष्ट आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. बारामतीमध्ये आलो म्हणून त्याचा वेगळा अर्थ काढू नका, उद्या परस्परांवर टीका करू, असे मोदी यांनीच सांगून टाकले. भाजप आणि राष्ट्रवादी कदापिही एकत्र येऊ शकणार नाहीत, पण एकमेकांना मदत होईल असेच राजकीय संबंध उभयतांमध्ये राहतील हे नक्कीच.
संतोष प्रधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2015 12:23 pm

Web Title: prime minister narendra modi meet sharad pawar in baramati
Next Stories
1 दिल्ली निवडणुकीचे धडे सर्वासाठीच
2 मिकेली फेरेरो
3 खबरदार, विचार कराल तर..
Just Now!
X