आम आदमी पक्षाच्या अरिवद केजरीवाल यांच्या आंदोलनकारी राजकारणामुळे सामान्य माणसाचा स्वाभिमान जागा झाला. त्यापाठोपाठ राजकारणातही स्वाभिमानाची लाट आली आहे. महाराष्ट्रात स्वाभिमानी आणि तडफदार नेत्यांची तशी अगोदरही वानवा नव्हतीच. स्वाभिमानाच्या मुद्दय़ावरच पक्षत्याग करून पदाच्या स्वप्नपूर्तीसाठी पक्षश्रेष्ठींपुढे लोटांगण घालणाऱ्या नेत्याच्या सावलीतून स्वाभिमानाचा गजर करणाऱ्या संघटनांचाही महाराष्ट्राला चांगलाच अनुभव आहे. गेल्या आठवडय़ात आम आदमी पक्षासोबतच्या युतीची बोलणी फिसकटल्यानंतर महाराष्ट्राच्या ऊसभूमीतील शेतक ऱ्यांचे नेते खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना अखेर शिवसेना-भाजप-रिपाइंच्या महायुतीत दाखल झाली, आणि नव्या स्वाभिमानाची चर्चा रंगू लागली. आम आदमी पक्षासोबत गेल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा स्वाभिमान जपला जाणार नाही, अशा भावनेने अखेर महायुतीच्या तंबूत दाखल झालेल्या राजू शेट्टी यांच्या ‘मुद्दय़ांवर आधारित’ मागण्यांना महायुतीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रवेशाच्या क्षणीच राजू शेट्टी यांचा स्वाभिमान सेना-भाजपने कुरवाळला, पण खासदारकीकडे डोळे लावून महायुतीच्या नेत्यांचे उंबरठे झिजविणाऱ्या रिपाइंच्या रामदास आठवले यांचा स्वाभिमान मात्र यामुळेच दुखावला. राज्याच्या राजकारणाची नस हाती असलेल्या ऊस उत्पादक शेतक ऱ्यांमध्ये राजू शेट्टी यांचे नेतृत्व प्रस्थापित झाले आहे. त्यामुळे साहजिकच, महाराष्ट्रातील शुगर लॉबीवर पकड असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी शेट्टी यांच्यासारखा खंदा मोहरा हाती लागल्याचा आनंद सेना-भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता. राष्ट्रवादीवरील नाराजीतून महायुतीत दाखल झालेले रिपाइंचे नेते रामदास आठवले यांच्या नाराजीचे सावटदेखील तेथे दाटले नव्हते. काँग्रेसी राजकारणाचे दरवाजे बंद झाल्याने आठवलेंना आता महायुतीशिवाय आधार नाही, अशा समजुतीत महायुतीचे नेते मश्गूल असतानाच राज्यसभेच्या उमेदवारीसाठी महायुतीच्या नेत्यांचे उंबरठे झिजवून आठवले यांच्या स्वाभिमानाचा कस लागला आहे. अशाच परिस्थितीत राजू शेट्टी नावाचा आणखी एक भिडू महायुतीत दाखल होताच त्यांच्या मागण्यांना मात्र क्षणात प्रतिसाद मिळाला आणि त्यातच भर म्हणून, राजू शेट्टींच्या प्रवेशाच्या क्षणीच नेमके महायुतीचे नेते आठवलेंनाच विसरले. नेमक्या या संधीचा लाभ घेऊन आठवले यांना पुन्हा आपल्या तंबूत ओढण्याची हलकीशी चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. त्यामुळे आठवले यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच राष्ट्रवादी काँग्रेसमुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत आपला पराभव ओढवला, हे शल्य रामदास आठवले यांच्या मनावरून अजूनही पुसले गेलेले नाही. शरद पवार यांच्याविषयी तर ते कटुतेनेच बोलतात. असे असताना, केवळ महायुतीने स्वाभिमानाला धक्का लावला म्हणून पुन्हा माघार घेऊन राष्ट्रवादीच्या वळचणीला जायचे का, खासदारकीच्या स्वप्नासाठी आपली  विश्वासार्हताच पणाला लावावी का, अशा द्विधा आता आठवले यांच्याभोवती फेर धरून राहणार आहेत. राजू शेट्टी हे राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक आहेत, ही बाब लपून राहिलेली नाही. शेट्टी यांच्यामुळे नाराज झालेल्या आठवलेंना आपल्या कंपूत ओढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने टाकलेले पाऊल फारसे दमदार नसले तरी नव्या राजकीय परिस्थितीत महायुतीने सुरू केलेल्या बेरजेच्या राजकारणाला शह देण्याचा एक फासा राष्ट्रवादीने टाकून पाहिला आहे. आठवले यांच्या स्वाभिमानाला पुन्हा एकदा आव्हान मिळाले आहे..