News Flash

भ्रष्ट रशियाची गोष्ट

रशियाने ज्याला गुन्हेगार ठरवून कैदेची शिक्षा फर्मावली आहे, अशा लेखकानं ब्रिटनमध्ये राहून लिहिलेलं हे ताजं पुस्तक..

| April 18, 2015 01:26 am

रशियाने ज्याला गुन्हेगार ठरवून कैदेची शिक्षा फर्मावली आहे, अशा लेखकानं ब्रिटनमध्ये राहून लिहिलेलं हे ताजं पुस्तक.. १९९६ नंतर सुरू होणारी ही गोष्ट स्टालिनकाळालाही लाजवणारी आहेच आणि मुख्य म्हणजे, आपल्या भ्रष्टाचाराच्या मार्गातले काटे काढण्यासाठी राज्यकर्ते आणि प्रशासक कोणत्या थराला जातात याचंही दर्शन घडवणारी आहे..
‘रशिया हा एक अशक्य देश आहे..  कुणाशी हा देश कसा वागेल, काहीच सांगता येत नाही. बरा-वाईट वागला तर त्या वागण्याला राष्ट्रीय हिताचे लेबल लावून रशियन नेते मोकळे होतात. गूढ देश ..’ असे स्पष्ट मत विन्स्टन चíचल यांनी १ ऑक्टोबर १९३९ रोजी व्यक्त केले होते. दुसऱ्या महायुद्धातील रशियाच्या सहभागाच्या शक्याशक्यतेविषयी बोलताना चíचल यांनी हे वक्तव्य केले होते. आजही त्यांचे हे वक्तव्य वस्तुस्थितीशी सुसंगत असेच आहे.
साम्यवादाचा पोलादी पडदा दूर झाल्यावर तरी रशिया जागतिक प्रवाहात सामील होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, आता अडीच दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही रशियाविषयी बरे बोलावे असे काहीच घडत नाही. याचे कारण तेथील नेतृत्व. गेल्या १५ वर्षांपासून त्या देशावर व्लादिमिर पुतिन या अत्यंत धूर्त राजकारण्याची सत्ता आहे. पुतिन यांच्याशी उभा दावा मांडणाऱ्या अनेकांची एक तर तुरुंगात किंवा यमसदनी रवानगी झाली आहे. गेल्या दीड दशकात देशत्याग करून अन्यत्र आश्रय घेणाऱ्या पुतिनविरोधकांची यादीही लांबलचक आहे. मात्र, पुतिन यांना पुरून उरणारेही अनेक जण आहेत. त्यात बिल ब्राउडर यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. ब्राउडर यांनी रशियाच्या इतिहासातील सर्वात मोठा आíथक घोटाळा उघडकीस आणला, त्याचे साद्यंत वर्णन ब्राउडर यांच्या ‘रेड नोटीस – हाऊ आय बिकेम पुतिन्स नंबर वन एनिमी’ मध्ये आहे.
‘अमेरिकी कम्युनिस्ट’ ही ब्राउडर यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी. मात्र, ही ओळख इथेच संपते. भांडवलशाही अमेरिकेत जन्माला येऊनही घरात साम्यवादाचे वातावरण असले तरी बिल ब्राउडर हे भांडवलशाहीचे पक्के पुरस्कत्रे होते. तशात साम्यवादी राजवटीतून मुक्त झाल्यावर पोलंडमध्ये भांडवलशाहीचे वारे वाहायला सुरुवात झाली होती. त्याच सुमारास ब्राउडर यांच्या करिअरची सुरुवात झाली. १९९६ मध्ये रशियानेही खासगीकरणाचा मार्ग अवलंबला होता. साम्यवादी राजवटीमुळे रशियातील आíथक गुंतवणुकीच्या संधी अगदीच मर्यादित होत्या. मात्र, खासगीकरणाच्या निर्णयानंतर या संधी वाढल्या. नेमकी हीच संधी साधून ब्राउडर यांनी आपले बस्तान मॉस्कोला बसवले. तिथेच त्यांनी त्यांच्या हर्मिटेज कॅपिटल फंडची स्थापना करून जगातील अनेक बडय़ा गुंतवणूकदारांना रशियातील गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. २००४ पर्यंत त्यांची कंपनी रशियातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी म्हणून नावारूपाला आली. मात्र, पुढच्याच वर्षी ब्राउडर यांची रशियातून हकालपट्टी झाली. रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका, असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यांचा गुन्हा काय? तर रशियातील सर्वात मोठी तेलकंपनी असलेल्या ‘गॅझप्रॉम’ या कंपनीत सुरू असलेला भ्रष्टाचार त्यांनी ओळखला तर होताच शिवाय रशियन राजकारण्यांचे हितसंबंध असलेल्या इतरही कंपन्यांमधील भ्रष्टाचारावर त्यांनी खुलेआमपणे बोट ठेवले होते. त्यामुळे साहजिकच रशियातील राजकारण्यांच्या डोळ्यांत ब्राउडर खुपू लागले होते. साम्यवादाच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतरही रशियन राज्यकर्त्यांची मानसिकता मात्र बदलली नव्हती. अमर्याद सत्तेतून अगणित संपत्ती जमा करण्याचे त्यांचे ध्येय तसेच राहिले होते आणि सामान्य रशियनांचे भागधेय या असल्या राजकारण्यांच्या हाती होते.
एक्झॉनमोबिल आणि ब्रिटिश पेट्रोलियम या तेलकंपन्यांपेक्षा कैकपटीने मोठी असलेली गॅझप्रॉम, या कंपन्यांना प्रचंड सूट देऊन तेलाचा पुरवठा करत होती. इथेच खरी गोम असल्याचे ब्राउडर यांनी ओळखले. मात्र, या भ्रष्टाचारात युरोपातील बँका, धनदांडगे यांचाही हात असल्याने त्यांनी एकटय़ानेच या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आणि नेमका हाच निर्णय त्यांच्या अंगाशी आला. कारण गॅझप्रॉममध्ये पुतिन यांचेही समभाग होते. साहजिकच त्यांची गच्छंती करण्यात आली. त्यानंतर हर्मिटेज कॅपिटल फंडची मालकी रशियातील काही जणांकडे हस्तांतरित करण्यात आली. याच कालावधीत हर्मिटेज कॅपिटल फंडाला करवजावटीतून प्राप्त झालेल्या २३ कोटी डॉलर एवढय़ा प्रचंड रकमेचा अपहार झाला. रशियातून हकालपट्टी झाली तरी ब्राउडर यांनी लंडनमधून कंपनीचे कामकाज सुरूच ठेवले होते. ब्राउडर यांचे रशियातील वकीलमित्र सर्जी मॅग्नित्स्की यांनी या गरव्यवहारप्रकरणी जागल्याचे काम केले. इथूनच ब्राउडर यांच्या दुर्दैवाच्या दशावतारांना सुरुवात झाली. या गरव्यवहारात रशियाच्या सरकारी अधिकाऱ्यांचाच समावेश होता. कर विभाग, गृहमंत्रालय, प्रशासकीय यंत्रणा या विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच परस्पर २३ कोटी डॉलर आपापल्या खात्यांत वळवून स्वत:च्या तुंबडय़ा भरल्या होत्या. मॅग्नित्स्की यांनी हा गरव्यवहार उघडकीस आणताच त्यांच्यावर खोट आरोप लावून २००८ मध्ये त्यांना अटक करण्यात आली. वर्षभर अनन्वित अत्याचार करण्यात आले. २००९ मध्ये तुरुंगातच मॅग्नित्स्की यांचा मृत्यू झाला.
मॅग्नित्स्की यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सर्वाना शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा ब्राउडर यांचा निर्धार. त्यात त्यांना रशियातील सुहृदांकडून मिळालेली मदत, अमेरिकी कायदेमंडळात (काँग्रेसमध्ये) ‘सर्जी मॅग्नित्स्की कायदा’ संमत करून घेऊन मॅग्नित्स्की यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्यांना अमेरिकेत प्रवेशबंदीपासून ते त्यांच्या संपत्ती गोठवण्यापर्यंतच्या सर्व कारवायांना संमती मिळवण्यासाठी ब्राउडर यांनी केलेले प्रयत्न या सगळ्याचे वर्णन या पुस्तकात आहे.
साम्यवादी रशियातील नव-उमरावांची किंवा ‘ऑलिगार्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांची विलासी जीवनपद्धती आणि आजच्या काळातील रशियन राज्यकर्त्यांची जीवनशैली यात काडीचाही फरक नसल्याचे निरीक्षण लेखक नोंदवतो. एकाधिकारशाही, गुप्तचर यंत्रणांची नको इतकी लुडबुड, कायदा धाब्यावर बसवणारी सरकारी वृत्ती, बोकाळलेला भ्रष्टाचार, लाचार रशियन जनता, देशाची खालावलेली अर्थव्यवस्था या सगळ्याचे यथास्थित वर्णन ब्राउडर यांनी या पुस्तकात केले आहे. पूर्वाश्रमीची केजीबी आणि आताची एफएसबी या गुप्तहेर संघटनेनेच आपल्याविरोधात कुभांड रचले असून त्याला पुतिन यांचा पािठबा असल्याचे लेखकाचे मत आहे आणि त्याच्या पुष्टय़र्थ लेखक अनेक पुरावेही देतो.
ब्राउडर यांच्या पुतिनविरोधी लढय़ात पेरिलिन्श्की या पूर्वाश्रमीच्या भांडवलदाराने त्यांना खूप मदत केली. रशियाच्या भ्रष्टाचारी राज्यपद्धतीचा बळी ठरलेल्या पेरिलिन्श्की यांनी २३ कोटी डॉलरच्या भ्रष्टाचारातून कोणाकोणाच्या तुंबडय़ा भरल्या गेल्या याची आकडेवारीच ब्राउडर यांच्याकडे सादर केली होती. त्याची गोपनीय कागदपत्रे पेरिलिन्श्की यांनी पुरवली. मात्र, याच पेरिलिन्श्की यांचा लंडनमधील त्यांच्या घरापासून नजीकच गूढ मृत्यू होतो त्या वेळी एफएसबी कुठल्या स्तरापर्यंत पोहोचू शकते याची लेखकाला जाणीव होते.
सग्रेई मॅग्नित्स्की कायदा अमेरिकी कायदेमंडळात संमत झाल्यावर त्याचा बदला म्हणून पुतिन यांनी रशियन कायदेमंडळात (डय़ूमात) ‘अमेरिकींना रशियन मुले दत्तक घेण्यावर बंदी आणणारा कायदा’च संमत करून घेतला. मॅग्नित्स्की यांचा मृत्यू तुरुंगातील छळामुळे नव्हे, तर हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला, असा दावा पुतिन प्रशासनाकडून वारंवार करण्यात आला. मॅग्नित्स्की कायद्याला विरोध म्हणून करण्यात आलेल्या दत्तकबंदी कायद्याला रशियातूनच विरोध झाला. तरीही पुतिन यांनी त्यांचा हेका पुढे ठेवलाच. तसेच ब्राउडर यांच्याविरोधात इंटरपोलतर्फे रेड नोटीस बजावण्यातही (अर्थात नंतर इंटरपोलने ही रेड नोटीस रद्द केली) पुतिन प्रशासन यशस्वी ठरले होते. ब्राउडर यांच्याबरोबरच मृत मॅग्नित्स्की यांच्यावरही खटला भरण्याइतपत मजल पुतिन प्रशासनाने मारली. मृत व्यक्तीविरोधात खटला उभा करण्याची रशियाच्यासुद्धा इतिहासातील ही पहिलीच वेळ.. अगदी क्रूरकम्र्या स्टालिननेही अशी गल्लत कधीच केली नव्हती. ब्राउडर व मृत मॅग्नित्स्की यांच्या अनुपस्थितीत चाललेल्या खटल्याची सुनावणी होऊन उभयतांना रशियन न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. मॉस्कोतील तुरुंग ब्राउडर यांची वाट पाहतो आहे.. ब्राउडर यांच्या जिवाला असलेला धोका आजही कायम आहे.. कारण रशियन सत्यकथांचा अंत कधीच सुखद नसतो.
*रेड नोटीस, हाऊ आय बिकेम पुतिन्स नंबर वन एनिमी
लेखक – बिल ब्राउडर
प्रकाशन – बॅन्टम प्रेस
पृष्ठे – ३७३,  किंमत – ६९९ रु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 1:26 am

Web Title: red notice story of corrupt russia
Next Stories
1 वाचनदेशाटनाचे विच्छेदन
2 पुस्तकवेळ!
3 मुंबईत ४५० वर्षांपूर्वी फुललेली ज्ञानाची बाग!
Just Now!
X