खतरनाक म्हणता येईल, अशा अब्दुल करीम ऊर्फ टुण्डा या ‘लष्कर ए तय्यबा’ या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला अटक करून भारतीय पोलिसांनी अतिरेकी कारवायांना आळा घालण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याच्या आविर्भावात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे खरे तर काही कारण नाही. गेली काही वर्षे हा टुण्डा संघटनेत सक्रिय नाही. त्याचे वयही सत्तरीच्या आसपास आहे. बॉम्बस्फोटाच्या घटनेत त्याचा एक हातही तुटला आहे. या वयात येणाऱ्या आजारांशिवाय त्याला अन्य अनेक विकारांनी घेरले आहे. असा विकलांग टुण्डा हाती लागला, म्हणजे फार मोठा तीर मारला असे नव्हे. अब्दुल करीम याला बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान अवगत होते. संघटनेत नव्याने येणाऱ्या तरुणांना तो ते शिकवत असे. नवे चेहरे ओळखून त्यांना संघटनेत आणून त्यांची ‘मशागत’ करण्याचे काम हा टुण्डा करीत असे. उत्तर प्रदेशातील पिलखुआ या गावी असलेल्या टुण्डाच्या घरातील सगळय़ा वस्तूंचा लिलाव स्थानिक पोलिसांनी २० वर्षांपूर्वीच केला होता. मध्यंतरी तो मरण पावल्याच्या बातम्या आल्यानंतर त्याच्या नातेवाइकांचा त्रास कमीच झाला होता. आपल्या देशातील गुप्तचर यंत्रणाही अशा अफवांवर कसा विश्वास ठेवतात, याचा हा एक पुरावा. भारताला हव्या असलेल्या ५० अतिरेक्यांची जी यादी पाकिस्तानला सादर करण्यात आली होती, त्यातही टुण्डाचे नाव होते. दहशतवादी संघटनांसाठी निधी उभा करण्यासाठी त्याने दाऊद इब्राहीमशी जवळचे संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळे टुण्डाला अटक करून आपल्याला आणखी माहिती मिळू शकेल, असे भारतीय पोलिसांना वाटते आहे. असा आरोपी हाताशी लागल्याने पोलिसांचे धैर्य कदाचित वाढेलही, परंतु गुन्हेगार निवृत्त झाल्यानंतर त्याला पकडणे आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील तपास करणे, हा काही शहाणपणाचा उद्योग नाही. भारतात घडलेल्या सुमारे ४० बॉम्बस्फोटांशी संबंधित असलेला हा टुण्डा गेली दोन दशके भारतीय पोलिसांना चकवा देत होता. वय वाढल्याने त्याच्या कार्यशैलीतही फरक पडू लागला होता. अशा वेळी सतत पोलिसांचा ससेमिरा चुकवत आपले आजार सांभाळत जगणे हेही खरे म्हणजे जिकिरीचे असते. टुण्डाने कदाचित निवृत्तीनंतरची सारी वर्षे सरकारी खर्चाने राहण्यासाठी ही अटक मान्य केली असणे शक्य आहे. आजारांवर उत्तम उपचारही मिळतील आणि सरकारी खर्चाने जगणेही फारसे त्रासाचे होणार नाही, अशी त्याची अटकळ असावी. गेल्या २० वर्षांत भारतीय राजकारण्यांनी निवडणुकीतल्या आश्वासनात दाऊदला मुसक्या बांधून आणण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात काहीच घडले नाही. आताही शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मोदी पंतप्रधान झाले तर दाऊदला पकडून आणतील, असे म्हटले आहे. उद्धव यांचे हे म्हणणे उपहासाने होते की गांभीर्याने हे कळत नाही. उद्धव यांना अनेकदा म्हणायचे असते एक, परंतु प्रत्यक्षात मात्र ते वेगळेच बोलतात. दहशतवाद मोडून काढण्यासाठी वेगवेगळय़ा पातळीवरील माहिती सतत गोळा करत राहावे लागते, तिचे विश्लेषण करावे लागते आणि अर्थही शोधावा लागतो. टुण्डाच्या अटकेने यातले काहीच आजपर्यंत हवे तसे झाले नाही, हेच स्पष्ट झाले आहे.