नरेंद्र मोदी हे ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाईक आहेत, त्या संघटनेत बौद्धिकांना किती महत्त्व असते हे सांगावयास नको. मोदी यांनी आता भाजपमध्येही बौद्धिकांचा हा संस्कार रुजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हरयाणातील सूरजकुंडमध्ये भाजप खासदारांच्या कार्यशाळेत त्यांनी केलेला हितोपदेश हा त्याचाच एक भाग. भाजपचे हे खासदार म्हणजे मोदींची कमळे. मोदींमुळे निवडून आलेली. त्यांना चिखल लागू नये ही स्वाभाविकच मोदींची सदिच्छा असणारच. त्यातल्या जुन्या कमळांना संसदेचे पाणी लागलेले. एवढय़ा वर्षांत त्यातले काही बनचुकेही झालेले. त्यामुळे त्यांची शाळा घेण्यातून फारसे काही साध्य होणार नाही. म्हणूनच बहुधा मोदी यांनी केवळ प्रथमच निवडून आलेल्या दीडशेहून अधिक खासदारांना सूरजकुंडातील कार्यशाळेत पाचारण केले. वर्तन, आचरण आणि कारभार हा या कार्यशाळेतील महत्त्वाचा धडा होता. तसे एरवीही चाल आणि चलन यावर भाजपचा जरा जास्तच जोर असतो. किंबहुना त्याची मक्तेदारी जगात फक्त आपल्याकडेच आहे, असा भाजपाईंचा समज असतो. तरीही नव्या खासदारांनी आपले वर्तन आणि आचरण याकडे लक्ष द्यावे, हा प्राथमिक पाठ गिरवून घ्यावा असे मोदी यांना वाटले. काहींना हे काहीसे विचित्र वाटले असेल. परंतु सोळाव्या लोकसभेत भाजपच्या ३५ टक्के खासदारांची पाश्र्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्यातील काही जणांवर तर महिलांविरोधातील गुन्ह्य़ांची नोंद आहे. हे पाहून भाजप आणि काँग्रेस या दोन विरोधी पक्षांत काय फरक असेही कोणास वाटेल. त्यावर, हे सगळे गुन्ह्य़ांचे आरोप राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा नेहमीचा युक्तिवाद करता येऊ शकतो. त्यासाठी प्रसंगी इतिहासाचे पुनल्रेखनही केले जाऊ शकते. पण ज्यांच्या हातात ‘आयबी’च्या नाडय़ा त्या दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी यांना ते कसे पटणार? त्यांची कार्यपद्धती पाहता, या सर्व खासदारांची जन्मकुंडली, त्यातील शुभग्रह आणि पापग्रह हे त्यांना चांगलेच माहीत असणार. त्यामुळेच त्यांनी खासदारांना चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. जबाबदारीची जाणीव करून दिली. आचारसंहिता आखून दिली. त्यामुळे मोदी यांचेही प्रतिमावर्धन खचितच झाले. या कार्यशाळेस भाजपचे राजस्थानातील तरुण तडफदार खासदार व मोदींचे मंत्रिमंडळातील सहकारी निहालचंद मेघवाल उपस्थित होते की नाही, हे माहीत नाही. नसतील तर बरेच झाले म्हणायचे. खरे तर हे गृहस्थ मंत्रिमंडळाच्या यादीतच नसते तर अधिक बरे झाले असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. (त्या प्रकरणाचा तपशील या अंकातच अन्यत्र दिलेला आहे.) अर्थात भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांच्या लेखी त्या आरोपांत काहीही तथ्य नाही. ते खोटे, बिनबुडाचे वगरे वगरे आहेत. कारण ‘अजून काहीच सिद्ध झालेले नाही,’ असे लेखी यांचे म्हणणे आहे. कायदामंत्री अरुण जेटली यांनी तर भाजपच्या सर्व नेत्यांना निहालचंद यांची बिनशर्त पाठराखण करण्याच्या सूचनाच दिल्या असल्याचे सांगण्यात येते. तेव्हा निहालचंद हे निर्दोष आहेत, यावर विश्वास ठेवणे देशवासीयांना भाग आहे. मोदी यांचा स्वत:चा यावर विश्वास आहे की नाही ते स्पष्ट झालेले नाही. मात्र ज्या अर्थी निहालचंद अजूनही त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत, त्या अर्थी मोदी यांचा त्यांच्या सत्शीलतेवर पूर्ण विश्वास आहे असेच म्हणावे लागेल. यामुळे देशवासीयांची अडचण अशी झाली आहे, की मोदी यांचे सूरजकुंडमधील बौद्धिक आणि मंत्रिमंडळातील निहालचंद यांची सांगड कशी घालायची? हे तर मोदींची शाळा सुटली आणि पाटी फुटली असे झाले. या बौद्धिक अडचणीतून सुटण्याचा मार्ग एकच. अशी बौद्धिके म्हणजे केवळ उपचार असे समजायचे, की झाले!