आत्मज्ञान प्राप्त करून घेता यावं, यासाठी सदोदित परमतत्त्वात रममाण असलेल्या माता शारदेची प्रज्ञाशक्ती माणसाला लाभली, पण माणसानं त्या शक्तीचा उपयोग केवळ भौतिक जग विस्तारण्यासाठी आणि जवळ आणण्यासाठीच अधिक केला. या परमशक्तीला त्यानं कलांची स्वामिनी बनवलं. आता ‘कला’ म्हणजे काय हो? एखाद्यानं एखादं काम अधिक वेगानं आणि कौशल्यानं पार पाडलं की आपण सहज म्हणतो, त्याच्यात कला आहे हो! तेव्हा भौतिक जीवन संपन्न बनविण्याची कला या प्रज्ञाशक्तीच्या जोरावर माणसानं अवगत करून घेतली. मग हीच शारदा भौतिक संपदेची अधिष्ठाती ती लक्ष्मी अर्थात श्री बनून विश्वमोहिनी झाली! निव्वळ प्रज्ञेच्याच आधारावर जगाला व्यापलेलं तिचं जे अजस्त्र मोहिनीरूप आहे, ते आपल्याला जाणवतही नाही. प्रत्येक शोध हा एका कठोर तपस्येतून, चिकाटीच्या संशोधनातून, जिद्दीतूनच जन्माला येतो. तो शोध लावणारा शास्त्रज्ञ हा प्रज्ञावंत ऋषीसारखाच असतो. तो शोध म्हणजे त्याच्या प्रज्ञेची कमाल असते. त्या शोधाचा जग कसा वापर करील, याची मात्र त्याला प्रत्यक्ष शोधाच्या क्षणी जाणीवही नसते, इतका तो स्वत:सकट जगाला विसरून त्या शोधातच आकंठ बुडाला असतो. पाहा, दूरचित्रवाणीचा जो शोध आहे, तो काय प्रज्ञेशिवाय शक्य आहे? तो शोध लावणाऱ्याला माहीत होतं का की पुढे दिवसरात्र या टीव्हीला लोक खिळून राहातील आणि कौटुंबिक मालिकांच्या रतीबात वाहवत जातील! साधा विजेचा दिवा घ्या. हा शोधही प्रज्ञेशिवाय शक्य आहे? पण तो शोध लावणारा कुठे जाणत होता की, असे असंख्य दिवे लोक तयार करतील जे मंदिरापासून पबपर्यंत सर्व ठिकाणी लागतील. त्या प्रकाशात काहीजणांना वास्तवाची जाग येईल तर कित्येकांना भ्रामक, स्वप्नाळू असं जगणंही साधेल ज्यात वास्तवाचं भान सहज सुटून जाईल. थोडक्यात, प्रज्ञेतून शोध लागला आणि त्या शोधातून लोकांना जे गवसलं ते विश्वमोहिनी झालं! विश्वावर त्याची मोहिनी पडली. प्रत्येक शोधानं जग जितकं जवळ आलं तितकाच माणूस माणसापासून  आणि माणुसकीच्या सद्भावापासून दुरावलादेखील. आता याच संपर्कक्रांतीतून सामाजिक जाण असलेले लाखो तरुण एकत्र येतात आणि त्यातून कधीकधी चांगलं कामही उभं राहातं, हे खरं. पण हे सार्वत्रिक नाही. इथे शोधांना किंवा आधुनिकतेला वाईट ठरविण्याचा हेतू नाही आणि माऊलींनाही ते अभिप्रेत नाही, हे ओवीच्या अखेरीस आपल्याला उमगेलच. मुद्दा हा की प्रज्ञेची जी स्वामिनी आहे तिला माणसानं कलेची स्वामिनी बनविली. त्या कलास्वामिनी रूपानं जगावर मोहिनी टाकली. माणूस मग भौतिकाच्या अधिकच अधीन झाला.  हे हिताचं आहे का, हे अंतरंगातील हेतूवर अवलंबून आहे. स्वामी स्वरूपानंद सांगतात- ‘‘बैसुनी विमानीं आकाशीं उड्डाण। करूं येतें जाण यंत्र-युगीं।। १।। हिंडविती नौका सागराच्या पोटीं। विद्युत्द्वारा देती संदेश ते।।२।। साधाया कल्याण नाना शोध जाण। लाविती विज्ञान-शास्त्रवेत्ते।।३।। अंतरीं सद्भाव असेल जागृत। तरी यंत्रें हित स्वामी म्हणे।।’’ (संजीवनी गाथा, ८१) .