महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अस्तित्वात असतानादेखील त्या काळी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचाच बोलबाला असायचा. कारण सरकारचा कारभार राजधानी दिल्लीतून चालत असला, तरी पक्षाचा कारभार चालविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची नजर आíथक राजधानी असलेल्या मुंबईवरच असते. काँग्रेसने मुंबईचे राजकीयदृष्टय़ा असलेले हे आíथक महत्त्व सर्वात अगोदर ओळखले; म्हणूनच मुंबईसाठी पक्षाची स्वतंत्र कार्यकारिणी तयार करून तिचा कारभार मुरली देवरा यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याकडे सोपविला. राजकारण्यांचा पेहराव १९८०च्या दशकापर्यंत खादीचा पायजमा, खादी सिल्कचा झब्बा असाच असे. देवरा मात्र, त्या परंपरागत पेहरावात कधीच वावरले नाहीत. कारण राजकीय नेत्यांमध्ये त्यांची जेवढी ऊठबस असायची, तेवढीच देशाच्या औद्योगिक विश्वाचे लगाम हाती असलेल्या बडय़ा उद्योगपतींकडेही असायची. स्वत:ची पुंजी ओतून उद्योजक बनलेले आणि राजकारणात सक्रिय होण्यासाठीदेखील स्वत:च्या पुंजीतून पक्षासाठी वाटा देणारे मुरली देवरा, हे त्या काळी काँग्रेसचे ‘धनसंकट विमोचक’ होते. पक्षनिधीच्या उभारणीत देवरा यांच्याएवढा वाकबगार माणूस त्या काळी पक्षाकडे नव्हताच, पण देवरा यांच्याशी स्पर्धा करू शकेल असा माणूस दुसऱ्या कोणत्याही पक्षाकडे नव्हता. थोडक्यात, देवरा हे काँग्रेसचे ‘व्हिटॅमिन एम’ होते. अर्थशास्त्राचे पदवीधर असलेल्या देवरा यांच्या एका इशाऱ्यानिशी मुंबईच्या आíथक विश्वाच्या तिजोरीची तोंडे उघडी होत असत. नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत आणि मतदारापासून माध्यमांपर्यंत सर्वाशी व्यक्तिगत संबंध जपण्याचा एक दुर्मीळ गुण देवरा यांना साधला होता. अनौपचारिक, काहीसे अघळपघळ वागणाऱ्या देवरा यांनी मित्रपरिवाराचे मजबूत जाळे विणले होते. मुंबईतील कोणत्याही घटनेवर देवरा यांच्या सहीनिशी व्यक्त होणारी मुंबई काँग्रेसची प्रतिक्रिया हा त्या काळी माध्यमांच्या औत्सुक्याचा भाग असायचा. ही प्रतिक्रिया प्रसंगी सरकारबद्दलच्या नाराजीच्या सुरातही उमटायची. पण त्या प्रसिद्धीपत्रकाच्या अखेरीस असणारी झोकदार स्वाक्षरी मुरली देवरांची असल्यामुळे, पक्षावरच टीका करणाऱ्या या नेत्याला जाब विचारण्याची िहमत पक्षातही कुणीच करू शकत नव्हते. मुरली देवरा हे पक्षाला आíथक बळ देणारे जीवनसत्त्व आहे, याची जाणीव पक्षाच्या हरएक पदाधिकाऱ्याला होती. त्या काळातील पक्षीय राजकारणाच्या प्रत्येक घडामोडीत मुरली देवरा प्रत्यक्ष कधी दिसले नाहीत, तरीही त्यामागे कुठेतरी त्यांच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा असत. रजनी पटेल यांच्या प्रेरणेतून काँग्रेसच्या राजकारणात प्रवेश केलेल्या मुरली देवरा यांनी मुंबईच्या राजकारणावरच पकड ठेवण्याचे ध्येय निश्चित केले होते. १९७७-७८ मध्ये महापौर म्हणून मुंबईला त्यांची ओळख झाली. मुरली देवरा ज्यांना ओळखत असत, त्या व्यक्तीच्या किंवा त्या परिवारातील कोणाचेही निधन झाल्यानंतर, अंत्यविधीला देवरा यांची हमखास हजेरी असायची. यातूनही त्यांनी सुहृदांचा मोठा परिवार जोडला. हजरजबाबीपणा आणि विरोधी पक्षांतील नेत्यांशीही असलेले जिव्हाळ्याचे संबंध यांचा त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना मोठा फायदा झाला. महापौरपदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंतच्या वाटचालीत, कोणत्याही वादग्रस्त मुद्दय़ावर देवरा विरोधकांकडून घेरले गेले नाहीत आणि अनेक वादग्रस्त मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच विरघळून गेले. तब्बल २२ वष्रे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या देवरांनी दक्षिण मुंबई मतदारसंघावर जणू आपली मक्तेदारी प्रस्थापित केली, त्यामागेही या गुणाचा मोठा वाटा होता असे म्हणतात. पुढे या मतदारसंघाचा वारसा मुलाच्या- मििलद देवरा यांच्या- हाती सोपविल्यानंतरही देवरा यांचे काँग्रेसच्या केंद्रातील महत्त्व कायमच राहिले होते.