मुंबईत आपले घर असावे, एवढे एकच स्वप्न उराशी बाळगून केवळ या स्वप्नपूर्तीसाठी रात्रंदिवस घाम गाळत मेटाकुटीला येणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी ‘म्हाडा’चे घर ही केवळ ‘लॉटरी’ असताना, लोकप्रतिनिधी म्हणून मिरविणाऱ्यांच्या कुंडलीत मात्र, प्रसंगी सारे नियम गुंडाळून आलिशान घरांचा ‘राजयोग’ सहजपणे लाभतो , याचे उदाहरण  वर्सोवा येथील म्हाडाच्या उच्च उत्पन्न गटातील आलिशान सदनिका मिळविण्यासाठी झालेल्या राजकीय मोर्चेबांधणीतून समोर आले होते. ‘राजयोग’ नावाच्या या सोसायटीत सर्वपक्षीय आजी-माजी आमदारांसाठी सव्वादोनशे सदनिका राखून ठेवण्यात आल्या होत्या. सामान्य माणसासाठी मुंबईतील किमान गरजेपुरते घर मिळविणे हीदेखील आवाक्याबाहेरची गोष्ट असताना, म्हाडाच्या या योजनेतील सुमारे सव्वानऊशे चौरस फुटांच्या या सदनिका मात्र ५०-६० लाखांच्या मोबदल्यात मिळणार होत्या. या सोसायटीतील काही घरे वितरित झाली तरी त्यांचा ताबा घेतला गेला नाही. अनेक ‘गरजू’ आजी-माजी लोकप्रतिनिधींनी तर, आपल्याला लाभलेल्या ‘राजयोगा’चे ‘भाडे’ वसूल करून म्हाडाचे नियम सोसायटीच्या धाब्यावर बसविल्याची चर्चा होती. सरकारदरबारी वजन असलेल्या व्यक्तींची घरे हे अलीकडच्या काळात गुन्हेगारीसाठी सुरक्षित नंदनवन ठरू पाहात आहे. पोलीस वसाहती किंवा सनदी अधिकाऱ्यांच्या वसाहतींमध्ये अनैतिक धंद्यांचा सुळसुळाट याआधी काही ठिकाणी उघडकीसही आला आहे. राजयोग सोसायटीदेखील अशाच चर्चेमुळे पूर्वीही बदनाम झालीच होती, त्यावर आता बदनामीचे आणखी एक पीस खोवले गेले आहे. या सोसायटीतील एका सदनिकेत चालविल्या जाणाऱ्या उच्चपदस्थांच्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चित्रवाणी वाहिन्यांमध्ये दिसणाऱ्या पाच ‘अर्धवेळ’ तारकांसह दोघा दलालांना पोलिसांनी अटक केल्याने, ‘राजयोग’विषयी अगोदरपासून व्यक्त होणारा संशय व चर्चा आणि पोलिसांची ही कारवाई हे निव्वळ योगायोग नव्हते, हे मानण्यास भरपूर वाव आहे. या सोसायटीतील संबंधित सदनिका विधान परिषदेच्या एका माजी आमदाराच्या मालकीची असल्याचे सांगितले जाते. या आमदाराच्या नावाची गुप्तता पाळण्यासाठी आता कसरती सुरू झाल्या आहेत. पण आपला लोकप्रतिनिधी कोणत्या लायकीचा आहे, हे समजण्याचा समाजाला अधिकार आहे, आणि जनतेच्या कोणत्याही अधिकारांचे संरक्षण करणे ही पोलीस यंत्रणेची सर्वोच्च प्राधान्याची जबाबदारी आहे. त्यामुळे राजयोगमध्ये अशा बेकायदा आणि समाजस्वास्थ्याला घातक ठरणाऱ्या ‘कामयोगा’ला कळत-नकळत अभय देणाऱ्या आमदाराच्या नशिबी भविष्यातील जे भोग असतील, ते त्याला भोगावयास लावलेच पाहिजेत. लोकप्रतिनिधीचा शेजार ही समाजासाठी आश्वस्त भावना असली पाहिजे. अशा प्रकारांमुळे, लोकप्रतिनिधींमुळे संकटाची भावना समाजात बळावण्याचीच शक्यता अधिक असते. गोव्यातील एका बेकायदा डान्स बारवर घातलेल्या छाप्यात उत्तर प्रदेशातील  नेता असेच रंगेल चाळे करताना पकडला गेल्याची बातमीही ताजी आहे. अगोदरच लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. अशा प्रकारांमुळे लोकप्रतिनिधींबाबतच्या भावना अधिकच कडवट होत जातील, याचे भान त्यांनी ठेवायलाच हवे.