News Flash

संपाचा अरे‘रावी’ उपद्व्याप

संपाचे हत्यार उपसून मुंबईकरांना हकनाक वेठीला धरणे हा जणू वार्षिकोत्सवी वसा असावा, असा हेकट आव शरद राव वर्षांतून अनेकवार आणत असतात. कामगारांच्या मागण्या मान्य करून

| June 19, 2013 12:02 pm

संपाचे हत्यार उपसून मुंबईकरांना हकनाक वेठीला धरणे हा जणू वार्षिकोत्सवी वसा असावा, असा हेकट आव शरद राव वर्षांतून अनेकवार आणत असतात. कामगारांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आणि जनतेला असहाय झालेली पाहण्यातील आसुरी आनंद अनुभवण्यासाठी संपासारखे दुसरे प्रखर शस्त्र नाही, यावर त्यांचा दुर्दम्य विश्वास असला पाहिजे. ज्यामुळे सामान्य माणसे भरडली जातील, त्यांचे जगणे अधिक दुष्कर होईल, तीच वेळ संप आणि बंदसाठी योग्य, असे या रावांचे गणित असते. आताही पावसाच्या हाहाकारामुळे महामुंबई विकलांग झालेली असताना संपाचे हत्यार उपसले तरी मुंबईला त्याचा धसका बसणार आणि आधीच गलितगात्र झालेल्या जनतेचे आणखी हाल नकोत म्हणून प्रशासन नेहमीप्रमाणे मान तुकविणार याची त्यांना नेमकी कल्पना असावी. त्यामुळेच मुंबईला वेठीला धरणारा संप त्यांनी जाहीर करून टाकला. पण या वेळी त्यांचा अंदाज चुकला असावा. शरद रावांनी संपाची हाक दिल्याचे वृत्त पसरले आणि मुंबईकरांमध्ये संतापाची लाट पसरली. गेल्या वेळी रिक्षा भाडेवाढीसाठी रावांच्या संघटनेने पुकारलेल्या बंदच्या काळात सामान्य मुंबईकरांच्या रोषाचे चटके रावांनी अनुभवले आहेत. त्यामुळे नव्या संपाच्या काळातील जनतेच्या संतापाचा उद्रेक आपल्याला परवडणार नाही, एवढे शहाणपण त्यांना केवळ संपाआधीच्या प्रतिक्रियांवरून आले. पण पराभुतासारखी माघार घेतली तर ज्या संघटनांचे नेतृत्व करतो तेथेच नाचक्की होईल या भीतीने केवळ आश्वासनांचे निमित्त करून संप मागे घेण्याचा शहाणपणा रावांनी दाखविला असावा. राव यांच्या अरेरावी कारकिर्दीत नाइलाजाने घ्यावा लागलेला त्यांचा हा बहुधा पहिला समंजस निर्णय असावा. संप हे कामगारांच्या लाखो दुखण्यांवरचे एकमेव औषध असल्याचा समज डाव्या विचारसरणीमुळे कमालीचा फोफावला होता. अशाच लढय़ातून अनेक कामगार पुढाऱ्यांनी स्वत:चे राजकीय वजन वाढविले. जॉर्ज फर्नाडिस यांचे बोट धरून कामगार चळवळीत उतरलेले शरद राव गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला आहेत. कामगार संघटनांची शक्ती आपल्या पाठीशी हवी, अशी राजकीय पक्षांची नेहमीच सुप्त महत्त्वाकांक्षा असते. पण शरद राव यांची शक्ती मात्र राष्ट्रवादीसाठी अडचणीचीच ठरल्याचे अनेकदा दिसते. कामगारांचा पाठिंबा मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी, मोठा मताधार असलेल्या सामान्य जनतेची सहानुभूती गमावण्याचा बेजबाबदार विचार करण्याइतके राष्ट्रवादीचे नेतृत्व अपरिपक्व नाही. मूठभर कामगारांची सहानुभूती मिळविण्याकरिता सामान्यांना वेठीला धरणे सध्याच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेल्या वातावरणात तर अजिबात परवडणारे नाही, याची जाणीव राष्ट्रवादीला असावी. अजित पवारांच्या आश्वासनानंतर संप मागे घेत असल्याचे शरद राव म्हणत असले तरी प्रत्यक्ष चर्चेत याच वास्तवाचा कडवट डोस मिळाल्यानेच रावांना संप मागे घेण्याची उपरती झाली असल्यास नवल नाही. कामगार संघटना चालविताना केवळ स्वत:च्या फायद्या-तोटय़ाची गणिते न सोडवता, राजकीय फायदे-तोटेही लक्षात घ्यावेत, अशी पक्षनेतृत्वाची अपेक्षा असेल आणि तसे रावांना सुनावले गेले असेल तर त्यात गैर काहीच नाही. राव यांनी ते समजून घेतले की नाही, हा मुद्दा महत्त्वाचा!  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 12:02 pm

Web Title: sharad rao strike weapon
टॅग : Sharad Rao,Strike
Next Stories
1 तेच ते चेहरे
2 ‘रॉ’चा जागल्या
3 अजितदादांचे नाटक
Just Now!
X