हॉटेलच्या आवाराबाहेर वेगानं गेलेल्या कर्मेद्रकडे पाहात हृदयेंद्र म्हणाला..
हृदयेंद्र – त्या वेळी त्याला दारू आणि सिगारेटचं व्यसन लागलं. आम्ही सर्वच घाबरलो होतो. ही व्यसनं आमच्या या अत्यंत देखण्या मित्राच्या रंगरूपाची नासाडी करणार, याची भीती वाटत होती. सुदैवानं दारुच्या आहारी जाण्याआधीच तो मागे फिरला. या जगात प्रेमबिम नावाची गोष्टच नाही, हे त्यानं जाहीर केलं. मग काही महिन्यांतच जगात प्रेम आहे, याचा त्यालाच शोध लागला!
सगळेच हसतात. तोच कर्मेद्र येताना दिसतो. व्यसनाविषयीचं बोलणं तिथेच थांबतं. पण सर्वचजण अगदी गप्प आहेत आणि आपल्याकडेच पाहात आहेत, हे पाहून कर्मेद्र विचारतो..
कर्मेद्र – काय झालं? माझी बदनामी करत होतास?
हृदयेंद्र – नाही रे बाबा.. बस आता आणि ऐक. तर डॉक्टरसाहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर एक गोष्ट आधी निश्चित समजून घ्यावी लागेल की ही कुंडलिनी म्हणजे नेमकं काय? ती जागी कशी होते?
योगेंद्र – सद्गुरू शक्तीपात करतात तेव्हाच ती जागी होते.
हृदयेंद्र – बरोबर.. गुरुकृपेशिवाय काहीच शक्य नाही. पण आता कुंडलिनीसारखाच दुसरा गूढ शब्द आला शक्तीपात! बघा हं, कुंडलिनीलाही शक्ती हा शब्द जोडला आहे आणि शक्तीपातात शक्तीचं संक्रमण आहे. तुम्ही शब्दांच्या जाळ्यात फसला नाहीत ना, तर सोप्या गोष्टी सहज उकलतात. कुंडलिनी शक्ती म्हणजे आत्मशक्तीच नाही का? आणि ती प्रत्येक माणसात आहेच ना? अडचण एवढीच ही आमची आत्मशक्ती बहिर्मुखी आहे आणि बाहेरच्या अशाश्वत पसाऱ्याला शाश्वत ठेवण्यासाठीच ती खर्ची होत आहे. ती सर्वत्र विखुरली आहे. ती एकत्र होऊन जेव्हा अंतर्मुख होईल तेव्हाच तिचं वाया जाणं थांबेल नाही का? आता विखुरलेली शक्ती गोळा करण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे तिलाच साधना म्हणतात. मग ती योगाची असेल, नामाची असेल, ज्ञानाची असेल अगदी पूजाअर्चा, पारायण अशीही असेल. ज्या कोणत्या मार्गानं मी अंतर्मुख होत असेन, तो मार्ग हीन कसा असू शकतो? जो मार्ग मला परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी प्रेरित करतो, तो क्षीण कसा असू शकतो? मार्ग कोणताही हीन नाही, प्रयत्न करणारा किती चिकाटीनं त्या मार्गानं चालतो, यालाच महत्त्व आहे.
डॉ. नरेंद्र – बरोबर..
हृदयेंद्र – माझी साधना जर अत्यंत प्रामाणिकपणे आणि कळकळीने सुरू असेल तर तिच्यासाठी आवश्यक ती शक्ती सद्गुरूच देतात. परमात्मा म्हणा की जीवनातील जे शाश्वत तत्त्व आहे ते म्हणा, माझ्यासमोर प्रकटल्याशिवाय राहात नाही. यालाच मी अस्तित्वाच्या खुणा म्हणतो. परमात्मा आहे.. हे नुसते शब्द राहात नाहीत. तो अनुभवाचा भाग होतो.. खरी खूण पटवतात ते सद्गुरूच! सद्गुरूंमधील परमतत्त्वाची खूण ज्याला पटली ना त्याला दुसरं काही करायला नको!त्या गोपालेर माँची कथा आहे ना? म्हातारपणाकडे झुकलेली ही बालविधवा. मंदिराच्या आडोशाला एका लहानशा खोलीत रहायची. बरोबर एक गोपाळकृष्णाची मूर्ती. तिचंच पालनपोषण हीच तिची अहोरात्र चालणारी उपासना! भगवंत अशा भक्ताला दूर कसा ठेवेल? रामकृष्ण परमहंसांच्या दर्शनाला म्हणून त्या गेल्या. पहा हं! रामकृष्ण कोणाकडे काहीच मागत नसत. या बाईंना मात्र म्हणाले, ‘‘आई, मला खायला आण.’’ दर भेटीत हेच पालुपद! त्यांना वाटलं, हा कसला साधू? सारखी खा-खा! एके रात्री कमालच झाली. त्या जपाला बसलेल्या. बाजूला रामकृष्ण प्रकटले. त्या घाबरल्या. तर त्यांच्या जागी गोपाळकृष्ण प्रकटला! ‘आई खायला दे.. खायला दे..’ म्हणू लागला. रात्रभर त्या कृष्णाला खाऊ घालण्यात, त्याच्याशी खेळण्यात दंग. डोळ्यांना मात्र अखंड अश्रूधारा लागलेल्या.. पहाटे त्या कृष्णाला कडेवर घेऊन त्या धावतच रामकृष्णांकडे निघाल्या, तर इकडे ते एकदम लहान मुलासारखे रांगू लागले. त्या बाईच्या कडेवरचा गोपाळ डोळे असूनही कुणाला दिसेना! त्या मात्र रडत धावत आल्या. म्हणाल्या, हे काय केलंत हो तुम्ही? तर कडेवरचा गोपाळ उतरून धावत गेला आणि रामकृष्णांच्या हृदयात घुसला! त्या क्षणापासून गोपाळकृष्णाच्या जागी रामकृष्ण आणि रामकृष्णाच्या जागी गोपाळकृष्णच दिसू लागले! याला म्हणतात अस्तित्वाची खूण पटवणं!!
चैतन्य प्रेम