समुद्राच्या लाटा मन आकर्षून घेत होत्या. अभ्यासिकेतून दिसणारं त्यांचं नर्तन विलोभनीय भासत होतं. त्या विराट रूपाकडे पाहात ज्ञानेंद्र म्हणाला..
ज्ञानेंद्र – रात्री लाटांचा हा आवाज मनाला दूरवर घेऊन जात असे.. मग बेगम परवीन सुलताना, मल्लिकार्जुन मन्सूर, राशीद खान यांचा सूर ऐकताना वाटे की सुराचं बोट पकडून गायकही स्वरसमुद्रात स्वत:ला झोकून देत असावा.. सूरच नेईल तिकडे आणि तसा तो विहरत असावा.. ऐकणाराही असाच भावसमुद्रात विहरत जातो.. मग वाटतं जीवनही तर असंच आहे.. आपण स्वत:ला झोकून दिलंय.. काळ, परिस्थितीच्या लाटांबरोबर आपण हिंदकळत जातोय.. कुठे वाहत जाणार, काहीच माहीत नाही.. आपल्याला वाटतं, मी अमुक केलं, अरे, मग ते पुन्हा करता येईल, याची खात्री का देता येत नाही? म्हणजेच आपण जे काही करतो त्यात कितीतरी गोष्टींची साथ लागते. प्रयत्न तर महत्त्वाचे आहेतच, पण परिस्थिती आणि योगही लागतो. मग वाटतं, आपलं असं काहीच नाही. आपण या सगळ्यात आहोत, एवढंच..
योगेंद्र – आणि ज्यात आहोत, त्यातून कुणालाच सुटताही येत नाही. आहे ती परिस्थिती, आहेत ती साधनं स्वीकारूनच परिस्थिती पालटण्यासाठी धडपडावं लागतं.
हृदयेंद्र – थोडक्यात परिस्थिती बदलता येईलच, याची खात्री कुणी देऊ शकत नाही, पण स्वत:ला मात्र बदलता येऊ शकतं! हा जो आंतरिक धारणेचा बदल आहे तोच मुक्तीच्या चार टप्प्यांवर आहे.. या चार मुक्ती आपल्याला माहीत आहेतच..
योगेंद्र – सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता..
हृदयेंद्र – या मुक्तीच्या चार अवस्थांचा आणि मौनाभ्यासाचा फार दृढ संबंध आहे..
ज्ञानेंद्र – कसा काय?
हृदयेंद्र – आधी भक्तीमार्गानुसार या चार मुक्तींचा प्रचलित अर्थ काय ते सांगतो.. सलोकता म्हणजे हे जग परमेश्वराचं आहे, याची जाणीव होणं. समीपता म्हणजे त्याच्या अस्तित्वाची जाणीव होणं, सरूपता म्हणजे भगवंतानं अंत:करण भरून जाणं आणि सायुज्यता म्हणजे त्याच्याशी अखंड ऐक्यस्थिती साधणं..
ज्ञानेंद्र – आता यात मौनाभ्यासाचा संबंध कसा आला?
हृदयेंद्र – मागेच सांगितलं, नुसतं गप्प बसणं म्हणजे मौन नव्हे, तर बाह्य़ दुनियेच्या कोणत्याही घडामोडीची आतमध्ये ‘अहं’प्रेरित प्रतिक्रिया न उमटणं, हे खरं मौन आहे! आता या मुक्तींचा साधकासाठी अधिक सखोल अर्थ ऐका.. माझ्या गुरुबंधूंची सद्गुरूंशी जी चर्चा झाली, त्यात तो ऐकला.. तो आठवतोय तसा सांगतो.. ‘मी’ आणि ‘माझे’च्या जागी ‘तू’ आणि ‘तुझे’ हा भाव निर्माण होणं हीच सलोकता आहे! हे जीवन, ही दुनिया माझी नाही, हे सद्गुरो हे सारं काही तुमचंच आहे, हा भाव कायम होणं हीच सलोकता आहे!
योगेंद्र – व्वा..
हृदयेंद्र – आता जर हे सारं काही सद्गुरूंचंच आहे, माझं काहीच नाही तर मग जीवनातला उत्कर्ष-अपकर्ष, लाभ-हानी, यश-अपयश, सुविधा-दुविधा, मान-अपमान यांच्याशी माझं काय देणं-घेणं? जर सर्व काही सद्गुरुंनाच समर्पित आहे, तर जसं ते ठरवतील, तसं घडेल, ही धारणा म्हणजेच ‘समीपता’ आहे.. आता सलोकता आणि समीपता या दोन्हींत सद्गुरू समर्पणाची प्रक्रिया स्पष्ट होते, पण तरीही त्यात सूक्ष्मसा द्वैतभाव उरतोच. हे जीवन तुम्हाला समर्पित आहे, तुमच्या इच्छेनुसारच काय ते घडेल, या धारणेपर्यंत साधक पोहोचला की त्याची इच्छा आणि सद्गुरुंची इच्छा यातलं अंतर नष्ट होऊ लागतं. मग त्याचा विचार आणि सद्गुरुंचा विचार एकच होतो. हीच सरुपता मुक्ती आहे! आणि सर्व तऱ्हेच्या सूक्ष्मतम द्वैताचा निरास होऊन सद्गुरुभावात अखंड लीन होणं हीच सायुज्यतेची स्थिती आहे!
ज्ञानेंद्र – पण तरी यात मौनाभ्यासाचं महत्त्व कुठे येतं?
हृदयेंद्र – अरे! ‘मी’ आणि ‘माझे’च्या जागी ‘तू’ आणि ‘तुझे’ हा भाव आणि सारं काही तुमचंच आहे, तर त्याची फिकीर तुम्हाला, हा भाव काय सोपा आहे? जीवनातल्या कोणत्याच चढउताराचं तुम्हाला काहीच वाटेनासं होईल तेव्हाच ते घडेल ना? आणि ते काहीच वाटेनासं होणं हाच मौनाभ्यासाचा परिणाम आहे ना?
कर्मेद्र – आणि मीही पुन्हा सांगतो, हा अत्यंत धोकादायक विचार आहे! डेंजरस विचार आहे!
चैतन्य प्रेम