News Flash

खमके खेमका

हरयाणातील ज्येष्ठ सनदी अधिकारी अशोक खेमका यांनी धीटपणे कु. रॉबर्ट वढेरा यांचे उद्योग चव्हाटय़ावर आणले. मात्र राज्यातील काँग्रेस सरकारने खेमका

| August 12, 2013 01:08 am

हरयाणातील ज्येष्ठ सनदी अधिकारी अशोक खेमका यांनी धीटपणे कु. रॉबर्ट वढेरा यांचे उद्योग चव्हाटय़ावर आणले. मात्र  राज्यातील काँग्रेस सरकारने खेमका यांची तडकाफडकी बदली केली. उत्तर प्रदेशातील दुर्गाशक्तीसाठी मुख्यमंत्र्यंना पत्र धाडणाऱ्या सोनिया गांधी आपल्या जावयासाठी खेमकासारख्या अधिकाऱ्यावर कारवाई करू नका असे सांगतील का?
उच्चपदस्थी जामातांच्या उचापतींनी भारतीय राजकारणात कायमच उच्छाद मांडलेला आहे. त्यात आता सोनिया गांधी आणि त्यांचे बलदंड जामात कु. रॉबर्ट वढेरा यांचा समावेश करता येईल. सोनिया गांधी यांची कन्या प्रियांका यांचे कु. रॉबर्ट हे पती. प्रियांका त्यांच्या स्नेहाळ वागण्याबोलण्यातून राजीव गांधी यांच्या शालीन आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देतात तर कु. रॉबर्ट हे धसमुसळय़ा नवश्रीमंत निर्बुद्धतेचे मूर्तिमंत प्रतीक भासतात. कु. रॉबर्ट यांस व्यायामाची फार आवड. तंग कपडय़ांतून टंच दिसणाऱ्या दंडातल्या वगैरे बेटकुळय़ा त्यांच्या सर्वागीण निर्बुद्धतेत भरच घालतात. असा नवश्रीमंत वर्ग संपत्तीच्या गुणाकारासाठी बुभुक्षित असतो आणि त्यांची संपत्ती ही संस्कृतीपासून अस्पर्श असल्याने जास्त बटबटीत आणि प्रदर्शनीय असते. कु. रॉबर्ट नि:संशय या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. पंजाबमधील हे वढेरा कुटुंबीय तांब्यापितळी भांडय़ांच्या व्यवसायात होते आणि गांधी घराण्याशी संबंध आल्यापासून त्यांच्या धातुव्यवसायास सोन्याची झळाळी आली. हे का आणि कसे झाले हे सांगण्याची काहीच गरज नाही. वढेरा यांच्याबाबत आश्चर्याची बाब ही की आर्थिक मलिद्याकडे नेणारी पायवाट ही राजकारण्यांच्या माजघरांतून जाते हे त्यांना फारच लवकर समजले. त्यातही महत्त्वाचा भाग हा की व्यवसायवृद्धीचे हे गांधी घराणे पुरस्कृत लक्ष्मीयंत्र कु. रॉबर्ट यांच्याप्रमाणे समग्र वढेरा कुटुंबीयांनादेखील गवसले. इतके की कु. रॉबर्ट यांचे वडील वेगवेगळय़ा सरकारी कामांत हे गांधी घराणे संबंध वापरून लक्ष्मीप्राप्ती करतात असे जाहीर आरोप झाले. कु. रॉबर्ट यांच्याकडे आलेला उद्योगीपणा हा वडिलोपार्जित असावा असे मानण्यास जागा आहे. कारण कु. रॉबर्ट यांचे पिताश्री काँग्रेसजनांच्या उच्चपदांवरील नेमणुकांपासून ते सरकार दरबारी कंत्राटे मंजुरीसाठीदेखील मदत करत आणि मधल्यामध्ये स्वत:साठी संपत्तीवृद्धी करीत. या वढेरापिताश्रींशी केलेल्या व्यवहारांतून हात पोळून घेणाऱ्यांत महाराष्ट्रातील काही वजनदार राजकारण्यांचादेखील समावेश आहे. त्या वेळी थोरल्या वढेरांचे उद्योग इतके वाढले की अखेर कु. रॉबर्ट यांवर आपल्या पालकांपासून जाहीर घटस्फोट घेण्याची वेळ आली. आपले आणि आपल्या वडिलांचे काहीही संबंध नसून त्यांच्याशी केल्या गेलेल्या व्यवहारांस अन्य कोणी (म्हणजे गांधी कुटुंबीय) जबाबदार असणार नाहीत, असे वर्तमानपत्रातील जाहिरातीतून कु. रॉबर्ट याने सांगून टाकले. या वढेराकुमाराचे कवतिक हे की वडिलांचा तो उद्यमशीलतेचा वसा त्याने पडू दिला नाही. आपल्या बालबुद्धीद्वारे वडिलांचे कार्य तो इमानेइतबारे पुढे नेत आहे. हरयाणातील ज्येष्ठ सनदी अधिकारी अशोक खेमका यांनी धीटपणे कु. रॉबर्ट यांचे उद्योग चव्हाटय़ावर आणल्याने हीच बाब अधोरेखित होते. याही आधी त्यांच्या उद्योगांविषयी कोणाच्याच मनात दुमत नव्हते. परंतु व्याप्तीचा अंदाज नव्हता. तो खेमका यांच्यामुळे आला.
आपल्याकडील विद्यमान व्यवस्थेत ज्यास कोणताच सभ्य उद्योग करता येत नसेल तर अशी व्यक्ती बिल्डर होते. कु. रॉबर्ट यास अपवाद नाहीत. राजकीय लागेबांध्याचा निलाजरा वापर करून सरकारी जमिनी स्वस्तात पदरात पाडून घ्याव्यात, आपणास अनुकूल असणाऱ्या बिल्डरांच्या घशात त्या घालाव्यात आणि त्यातून स्वत:च्या तळ नसलेल्या तुंबडय़ा भराव्यात हा अनेकांचा उद्योग असतो. कु. रॉबर्ट त्याच मार्गाने जाताना दिसतात. दिल्लीजवळील गुरगाव परिसरातील जवळपास साडेतीन एकरांचा भूखंड कु. रॉबर्ट याने ओंकारेश्वर प्रॉपर्टीज या कंपनीकडून अवघ्या साडेसात कोटी रुपयांत पदरांत पाडून घेतला आणि काही दिवसांतच त्याचे मोल समजून आल्याने डीएलएफ या बडय़ा बिल्डराने तो कु. रॉबर्ट याच्याकडून तब्बल ५८ कोटी रुपयांना विकत घेतला असा हा व्यवहार आहे. वरवर पाहता त्यात गैर ते काय, असा प्रश्न एखाद्यास पडू शकतो. परंतु हा प्रश्न यात रास्त ते काय, असा असावयास हवा. याचे कारण असे की वरवर पाहता जो व्यवहार दिसतो तो याबाबत घडलाच नाही आणि सर्व काही डीएलएफ या बडय़ा बांधकाम व्यावसायिकासाठीच रचले गेले. याचे कारण असे ओंकारेश्वर प्रॉपर्टीज या कंपनीकडून कु. रॉबर्ट याने जमीन विकत घेतल्याचा फक्त आभास निर्माण केला. या जमिनीच्या किमतीपोटी जो धनादेश कु. रॉबर्ट याने ओंकारेश्वर कंपनीला दिला तो धनादेश प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही, असे या खेमका यांनी दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे या जमिनीच्या तुकडय़ावर कु. रॉबर्ट यास भव्य गृहनिर्माण प्रकल्पासाठी हरयाणा सरकारने मंजुरी दिली ती या क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना, असेही या अधिकाऱ्याने दाखवून दिले आहे. त्या परवानगीबाबत हरयाणा सरकारचीही तत्परता अशी की कु. रॉबर्ट याने स्थापन केल्यानंतर अवघ्या १८ दिवसांत इतक्या मोठय़ा प्रकल्पाची परवानगी अत्यंत अननुभवी अशा या कंपनीस देण्यात आली. जनसामान्यांच्या प्रश्नावर कोणत्याही सरकारने इतकी त्वरा केल्याचे कधी आढळून येत नाही. यातील उल्लेखनीय बाब ही कु. रॉबर्ट यांच्यासाठी तडजोड करणाऱ्या ओंकारेश्वर कंपनीचेही हरयाणा सरकारने भरभक्कम भले केले. कोणताही अनुभव नाही आणि कौशल्य तर नाहीच नाही, तरीही हरयाणा सरकारने कु. रॉबर्ट यांच्या कंपनीस अनुकूल असेच निर्णय घेतल्याचे खेमका यांनी सोदाहरण नमूद केले असून वढेरा यांचे (गांधी घराण्याशी असलेले संबंध) असणे हेच या कंपनीचे भागभांडवल इतक्या स्पष्ट शब्दांत वस्तुस्थिती मांडली आहे. यातील दुर्दैवी बाब ही की हे प्रकरण जेव्हा पहिल्यांदा उघडकीस आले तेव्हा त्याची गंभीर दखल घेत असल्याचा देखावा करीत हरयाणा सरकारने चौकशीसाठी एक उच्चपदस्थ समिती नेमली. परंतु खेमका हे दाखवून देतात की कु. रॉबर्ट यांच्यासाठी पुढेमागे मिळेल तसे झुकून ज्या अधिकाऱ्यांनी नियम वाकवले त्याच अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली. तेव्हा अशा परिस्थितीत या प्रकरणात निष्पक्षपाती चौकशी होऊच शकत नाही हे खेमका यांचे म्हणणे रास्त आणि विश्वसनीय ठरते. हा सर्व कथित गैरव्यवहार ज्या हरयाणा राज्यात झाला तेथे काँग्रेसचे सरकार आहे हा केवळ योगायोग नाही. आपले सर्व मंत्री आणि मुख्यमंत्री हे थेट हरिश्चंद्राचे वंशज असल्याचा आव काँग्रेसजन आणत असतात. अशा या सत्यवचनी नेत्यांच्या राज्यात खरोखरच सत्यवचनी होण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशोक खेमका यांची मात्र त्यांच्या सत्याच्या प्रयोगानंतर तडकाफडकी बदली करण्यात आली. या संदर्भातील चौकशी समितीस दिलेले उत्तर स्वत: खेमका यांनीच प्रसिद्धीस दिल्याने हा सर्व तपशील बाहेर आला.
आता या खेमकांचे काय करणार या प्रश्नाचे उत्तर कु. रॉबर्ट याच्या सासूबाई सोनिया गांधी यांनी द्यावयास हवे. कारण गेल्याच आठवडय़ात उत्तर प्रदेशातील अशाच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावरील अन्यायावर दाद मागण्यासाठी सोनिया गांधी यांनी थेट मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पत्र लिहिले होते. राजकारणातील दुसरे कु. अखिलेश यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ते एक वेळ क्षम्य. कारण कु. अखिलेश हे सोनिया गांधी यांच्या पक्षाचे नाहीत. परंतु हरयाणात तसे होणार नाही. तेथे काँग्रेसचेच राज्य आहे. तेव्हा न्यायनीतीसाठी तत्पर सोनिया गांधी खमक्या अशा अशोक खेमका यांच्यावर कु. रॉबर्ट याच्यासाठी अन्याय करू नका अशी सूचना हरयाणाचे मुख्यमंत्री भूपेंदरसिंग हुडा यांना करतील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 1:08 am

Web Title: straightforward khemka administrative officer of haryana
Next Stories
1 पोटोमॅकवरचा प्रावदा
2 संगीत शिलेदार
3 रघुरामप्रहर
Just Now!
X