आपलं जीवन कर्माच्या साखळीतच बांधलेलं आहे. माझ्याच प्रारब्धकर्मानुसार ही र्कम माझ्या वाटय़ाला आली आहेत. भूतकाळात, मग तो अनेक जन्मांचा का असेना, मी जे काही केलं त्याचंच फळ वर्तमानकाळात अर्थात या जन्मात माझ्यासमोर उभं ठाकतं आणि मला सुख किंवा दु:ख भोगायला भाग पाडतं. त्या फळानुरूपही माझ्याकडून अटळ कर्म होतं आणि तेच कर्तव्य म्हणजे ‘जे करणं प्राप्त आहे ते’, असं असतं. उदाहरणार्थ ज्याच्याकडून मी गेल्या जन्मी सेवा घेतली आहे आणि त्याचा छळही केला आहे त्याच्याच सेवेचं कर्म मला या जन्मी पार पाडावं लागतं आणि छळही सोसावा लागतो. आता इथे सामाजिक पातळीवरील अन्यायाचं समर्थन अभिप्रेत नाही, हे नीट लक्षात घ्या. माझ्या व्यक्तिगत जीवनात माझ्या वाटय़ाला जी माणसं, वस्तू आणि परिस्थिती येते ती माझ्याच कर्माचं फळ असते. त्यामुळे त्या प्रारब्धाचा नाश कर्तव्यकर्मानीच होत असल्यानं मी प्रत्येक कर्तव्यकर्म नेटकेपणानं पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता इथे ‘नेटकेपणाने’ या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी ‘प्रपंच करावा नेटका’ याच वचनाचा आधार घेतला पाहिजे. प्रपंच नेटका करावा म्हणजे नेटानं करावा असा नाही! नेटका म्हणजे आटोपशीर, आवश्यक तेवढाच! तर कर्तव्यकर्मही नेटकेपणानं पार पाडावं, याचा अर्थ मोह आणि आसक्तीपायी कर्तव्यापलीकडे त्या कर्मात गुंतू नये. उदाहरणार्थ मुलाला कपडे विकत घेणं हे वडील म्हणून कर्तव्य आहे, पण शेजारच्या मुलापेक्षा माझ्या मुलाचे कपडे महागडेच असले पाहिजेत, या भावनेनं पैसे उधळणं, हे कर्तव्यकर्म नव्हे! मोह, भ्रम, अज्ञान यातून मी कर्तव्याची मर्यादा अनेकवार ओलांडतो आणि अनावश्यक कर्माच्या दलदलीत रुतून बसतो.   तेव्हा आई, वडील, पती वा पत्नी, मुलं, भावंडं, सासू-सासरे अशी सर्व माणसं जी माझ्या जीवनात येतात त्यांच्याशी माझं अनेक जन्मांचं देणं-घेणं असतं. त्यामुळे त्या प्रत्येकाप्रतिची कर्तव्यं मी नेटकेपणानं केली पाहिजेत. मी माणूस म्हणून जन्मलो तेव्हा ही कर्तव्यं पार पाडताना माणुसकीचं भानही जपलं पाहिजे. त्यामुळे ती रूक्षपणे नव्हे तर प्रेमानं केली पाहिजेत. साधक म्हणून तर ती अधिक नेटकेपणानं करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कारण मोडकंतोडकं का असेना, आपल्याला ‘ज्ञान’ आहे ना! जीवन क्षणभंगुर आहे, त्यात आसक्तीनं गुंतू नये, मोहानं राहू नये, हे ‘ज्ञान’ आचरणात उतरवण्याचा अभ्यासही याच माणसांत राहूनच तर साधेल!  आपल्यात राग किती आहे, लोभ किती आहे, मोह किती आहे, आसक्ती किती आहे, याची तपासणी प्रपंचातच तर होईल. मग तरीही आपलं आचरण जर त्या ‘ज्ञाना’नुरूप झालं तर लोकांनाही खरं धर्माचरण कसं असतं, हे जाणवेल! माउलीही सांगतात –
मार्गी अंधासरिसा। पुढें देखणाही चाले जैसा। अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा। आचरोनि।। ३२।। (अ. ३ / १५६).
प्रचलितार्थ : रस्त्याने दृष्टिहिनाच्या पुढे चालणारा माणूस जसे त्याला सांभाळून घेऊन त्याच्याबरोबर चालतो, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाने अज्ञानी जनांना आपल्या आचरणातून धर्म स्पष्ट करून दाखवावा.