मज हृदयी सद्गुरू! हृदयामध्ये श्रीसद्गुरूंना मी धारण केलं, त्यामुळे माझी जीवनदृष्टी विवेकी झाली. त्यामुळेच मी हा भवसागर पार करू शकलो, अशी माउलींच्या या ओवीची अर्थछटा आहे. या प्रक्रियेचे तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा श्रीसद्गुरू हृदयात स्थानापन्न होणं (मज हृदयी सद्गुरू), दुसरा टप्पा त्यायोगे जीवनात विवेकाला सर्वोच्च मूल्य दिलं जाणं (म्हणौनि विशेषें अत्यादरू विवेकावरी) आणि तिसरा टप्पा म्हणजे भवसागर, संसाराचा पूर तरून जाणं (जेणें तारिलों हा संसारपूरू). या तिन्ही टप्प्यांचा आता विचार करू. श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत की, मला तुमच्या हृदयात यायला तुम्ही जागाच ठेवलेली नाही. अर्थात आपल्या हृदयात विकार आणि वासनायुक्त इच्छांची इतकी गर्दी आहे की तिथे सद्गुरूंना स्थानापन्न व्हायला आपण जागाच ठेवलेली नाही. आता आध्यात्मिक भावयात्रेत ‘हृदय’ या शब्दाचा अर्थ आहे अंत:करण. शरीरशास्त्राच्या दृष्टीनं विचार केला तर हृदयात अशी काही पोकळी नसते. जगही हृदयाला भले प्रेमाचं प्रतीक मानत असलं तरी शरीरशास्त्राच्या दृष्टीनं हृदयाचं स्थान आणि कार्य हे भावनिक नाही! फुप्फुसाला रक्ताचा पुरवठा करणं आणि तिथून शुद्ध होऊन आलेलं रक्त शरीरभर पोहोचविणं, हे हृदयाचं कार्य आहे. एक मात्र खरं की हृदयक्रिया बंद पडणं म्हणजे मृत्यूच! याचाच अर्थ हृदय हा माणसाच्या जिवंतपणाचा, चेतनेचा महत्त्वाचा आधार आहे. या अर्थानं विचार करता, त्या जागी सद्गुरू असले पाहिजेत, म्हणजे माझ्या चेतनेचा जो मुख्य जीवनाधार आहे तो सद्गुरूच झाले पाहिजेत. सद्गुरूंनी अंत:करण जोवर पूर्णपणे व्यापलं जात नाही तोवर ‘मज हृदयीं सद्गुरू’ ही स्थिती संभवत नाही. शरीरशास्त्रात हृदयाला भावनिकतेचा स्पर्श नाही, पण अध्यात्माला अभिप्रेत जी अंतर्यात्रा आहे त्यात हृदय म्हणजे अंत:करण हे शुद्ध भावानं व्यापण्याला अत्यंत महत्त्व आहे. माणसाच्या अंत:करणावर ज्या तऱ्हेचे भावसंस्कार होतात त्याप्रमाणे माणूस घडतो. त्यामुळे त्याचा आंतरिक भाव शुद्ध करणं, हाच सर्व प्रकारच्या साधनामार्गाचा मुख्य हेतू आहे. माणूस हा भावनाशील प्राणी आहे. भावनेशिवाय तो जगू शकत नाही. त्यामुळे हा आंतरिक भाव शुद्ध करण्यावरच सत्पुरुषांचा भर असतो. आपण समजतो की माणसाच्या जीवनात बुद्धीचा प्रभाव मोठा असतो. प्रत्यक्षात बुद्धीपेक्षा त्याची भावनाच वरचढ ठरते. माणूस हा बुद्धीनं विचार करतो, पण भावनेनुसार निर्णय घेतो. इतकंच नाही तर भावनेनुसार घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी तो आपल्या बुद्धीला राबवतोदेखील! तेव्हा जोवर आंतरिक भाव शुद्ध होत नाही तोवर त्याच्या जगण्यातली विसंगती, विरोधाभास संपू शकत नाही. मग हा भाव शुद्ध होण्यासाठी या भावाचा उगम ज्या अंत:करणात आहे तिथेच सद्गुरूंना विराजमान करण्यावाचून दुसरा उपाय नाही. आता एका साधकाच्या मनात शंका आली आहे की, सद्गुरूंना हृदयात विराजमान करायचं, पण ते मुळातच तिथे नसतात काय? आजच्या चिंतनातून त्या शंकेचं निरसन बऱ्याच अंशी झालं असेलही. तरी थोडा अधिक विचार करू.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !