27 September 2020

News Flash

ठाकरे हरले, ठाकरे जिंकले!

निवडणुकीच्या मैदानात पक्षाचा सर्वोच्च नेता कधीही नाही आणि एकहाती सत्तादेखील कधीही नाही, अशी गत शिवसेनेची आहे.

| June 2, 2014 03:58 am

निवडणुकीच्या मैदानात पक्षाचा सर्वोच्च नेता कधीही नाही आणि एकहाती सत्तादेखील कधीही नाही, अशी गत शिवसेनेची आहे. ठाकरे घराण्यातून आजवर कोणीही निवडणूक लढवली नव्हती, तर मनसेचे नेते राज ठाकरे स्वत: मैदानात उतरणार आहेत. अन्य पक्षांचेही निवडणूकपूर्व राजकारण हलू लागण्याची चिन्हे या घोषणेने स्पष्ट झाली आहेत.
स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ही म्हण राजकारणासही लागू पडते. समस्त ठाकरे परिवारास याचा विसर पडला होता वा ते मान्य नव्हते. त्यामुळे अन्यांनी मरावे आणि आपल्यासाठी मातोश्री स्वर्ग निर्माण करून द्यावा असेच त्यांचे राजकारण राहिले. सेनापती मैदानात नसेल आणि वातानुकूलित दिवाणखान्यातून सैन्याचे नियंत्रण करू पाहात असेल तर सैनिकांचा त्याच्या युद्धकौशल्यावरील विश्वास उडतो. सेनेचे असे झाले होते. त्यामुळे ऐन जोशात असतानाही सेनेला एकहाती कधीही सत्ता मिळवता आली नाही. अन्य अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचे नेते सत्तासामथ्र्य लढून सिद्ध करीत असताना सेनेचे कथित रणवीर आणि रणरागिण्यांची तितकीच कथित रणगर्जना गल्लीबोळापुरतीच राहिली. त्याचे कारण हे आहे. एकीकडे लोकशाहीवर विश्वास नाही असे म्हणायचे आणि तरीही स्वत:च्या पक्षास सत्तेची सावली मिळून आपल्या डोक्यावरील छप्पर अबाधित राहावे यासाठी आपल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे हा दुटप्पीपणा होता आणि तो सेना नेतृत्वाने आयुष्यभर केला. खरे तर याबाबत सेना नेतृत्वापेक्षा नक्षलवादी प्रामाणिक म्हणावयास हवेत. लोकशाही त्यांनाही मान्य नाही. म्हणून ते निवडणुकाही लढवत नाहीत. सेना नेतृत्व मात्र उक्ती आणि कृती याबाबत जन्मापासूनच विसंगती दाखवत आले आहे. आपण म्हणजे कोणी सेनापती आहोत आणि सैनिक मावळे, असा या नेतृत्वाचा आव होता. या मावळ्यांनी मुलुखगिरी(?) करावी आणि आपल्यासाठी शिध्याची व्यवस्था करावी असे ते राजकारण होते. ज्यांच्या नावे ही मंडळी राजकारण करीत होती त्या शिवछत्रपतींनी स्वत: रायगडाच्या सुरक्षित उबेत राहून आपल्या सैन्यालाच फक्त मैदानात ढकलले असे केले नाही, तर स्वत: आघाडीवर राहून त्या सैन्याचे नेतृत्व केले. असे झाले तरच सैनिकांचा आपापल्या नेतृत्वावर विश्वास राहतो. याची जाण सेनेला कधीही आली नाही. आपल्या हाती रिमोट आहे आणि आपला मुख्यमंत्री ऊठ म्हटले की उठतो आणि बस म्हटले की बसतो, अशी वल्गना बाळासाहेब ठाकरे करीत. वास्तविक रिमोट कंट्रोलमुळे दूरचित्रवाणीच्या वाहिन्या बदलण्याव्यतिरिक्त काहीही होत नाही, हे ठाकरे यांनी लक्षात घेतले नाही. आपल्या हातातील रिमोटवर त्यांनी जरुरीपेक्षा जास्त विश्वास ठेवला. त्यामुळे हाती सत्ता येऊनही राज्यभर कोहिनुरी कमळे तेवढी उमलली. सेना मात्र होती तेथेच राहिली. याचा अर्थच हा की रिमोट चालतात, पण ते प्रत्यक्ष रणमैदानात उतरणाऱ्याच्या हातात असले तर आणि तरच. व्यवस्थेच्या बाहेर राहून रिमोटद्वारे राजकारणावर यशस्वी नियंत्रण ठेवले गेल्याचे भारतीय राजकारणात एकमेव उदाहरण आहे.
ते म्हणजे फक्त महात्मा गांधी. मोहनदास करमचंद गांधी यांनी कधीही सत्तापद घेतले नाही. पण ते काही या व्यवस्थेवर विश्वास नाही म्हणून नाही. तर त्यांना स्वत:तील आंतरिक शक्तीची जाणीव होती आणि या ताकदीच्या जोरावर राजकारणाचे नियंत्रण करण्याची त्यांची क्षमता होती म्हणून. पण ते त्यांना जमले ते केवळ नैतिक ताकदीच्या बळावर. परंतु तरीही आयुष्याच्या अखेरीस आपल्या रिमोटची ताकद कमी होत असल्याची जाणीव त्यांना झाली होती. इतिहास हेच दाखवतो की काही प्रमाणात गांधी यांचा अपवाद वगळता अन्य प्रत्येकास रणमैदानात उतरावेच लागले. मग ते पंडित जवाहरलाल नेहरू असोत, राम मनोहर लोहिया वा श्यामाप्रसाद मुखर्जी असोत वा अलीकडच्या काळातील एम जी रामचंद्रन असोत वा एन टी रामाराव. प्रत्येकाने प्रत्यक्ष प्रक्रियेत भाग घेतला आणि मगच आपल्या हाती रिमोट राहील याची खबरदारी घेतली. अशांच्या मालिकेतील ताजे यशस्वी आणि अपयशी उदाहरण म्हणजे अनुक्रमे नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी. या क्षणाला केवळ गुजरात वा केंद्रातीलच नव्हे तर भारतीय जनता पक्षाचा देशव्यापी रिमोट त्यांच्या हाती आहे. एवढय़ा मोठय़ा भूप्रदेशावर तो चालतो याचे एकमेव कारण म्हणजे ते आघाडीवर येऊन लढले. हातातील रिमोटमध्ये ताकद येते ती त्यामुळे. सोनिया आणि राहुल गांधी हे मायलेक हे याचे उलट उदाहरण. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नंतर मतदारांनीही हाय खाल्ली ती काही काँग्रेसवरील प्रेम वा सहानुभूती आटल्यामुळे नव्हे. तर या रिमोटवरील रागामुळे. सत्ता हवी असेल तर सरकारमधील पदांच्या मैदानात या आणि मगच रिमोट हाती धरण्याची मनीषा बाळगा हा साधासोपा संदेश त्यांना समजला नाही. पडद्याआड राहून मनमोहन सिंग सरकारचे नियंत्रण करणे त्यांच्या अंगाशी आले. अशा पद्धतीने लाकडी कठपुतळ्या तेवढय़ा चालवता येतात. राजकारण असे नसते. ते रासवट, रसरशीत आणि जिवंत असते. ते चालवायची इच्छा असेल तर आघाडीवर उतरावे लागते. नॉन प्लेइंग कॅप्टन कोणत्याच संघाला आवडत नाही. मग ते टेनिस असो वा राजकारण. तेव्हा या रिमोट कंट्रोली भ्रमातून बाहेर येण्याइतके वास्तवाचे भान राज ठाकरे यांनी दाखवले याबद्दल ते अभिनंदनास पात्र ठरतात.
त्यांच्या या कृतीने आसपासच्या सर्वच पक्षांना महाराष्ट्राच्या राजकारण रांगोळीतील ठिपके नव्याने मांडावे लागतील हे उघड आहे. यातील महत्त्वाचा मोठा घटक असेल तो म्हणजे अर्थातच शिवसेना. परिणामी राज यांचे ज्येष्ठ बंधू उद्धव यांना पहिल्यांदा कट्टीबट्टीचे राजकारण सोडून मोठे झाल्याची जाणीव द्यावी लागेल. सध्या तो पक्ष आणि त्याचे नेते लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या जल्लोषी वातावरणात मश्गूल आहेत. या जल्लोषाच्या भुईनळ्याची वात तुमची असली तरी त्यातील दारू शिवसेनी नाही असे सांगून त्यांचा तो आनंद हिरावून घेण्याचे कारण नाही. त्यासाठी नरेंद्र मोदी समर्थ आहेत. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षासदेखील गोपीनाथ मुंडे की नितीन गडकरी की देवेंद्र फडणवीस यांचा एकदा काय तो निकाल लावावा लागेल. निवडणुकांच्या आधीच नेता जाहीर करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली आहे. ती त्यांना आता खंडित करता येणार नाही. लोकसभेला एक नियम आणि विधानसभेला दुसरा असे त्यांनी केल्यास त्यातून राज्य भाजपचा अशक्तपणाच काय तो दिसेल. मोदी डोक्यावर असताना तसा तो दिसणे त्यांना परवडणारे नाही. दुसरीकडे जवळपास पंधरा वर्षे सत्ता भोगलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाही आपल्यात आतापर्यंत दडलेला असा एखादा हिरा शोधून काढावा लागेल की ज्याच्या केवळ दर्शनानेच मतदारांचे डोळे दिपतील. तेच ते अजित पवार आणि तेच ते पाटील किंवा आणखी कोणी यांना जनता कंटाळली आहे. त्याच वेळी काँग्रेसला पृथ्वीराज चव्हाण यांचे काय करायचे ते कळेनासे झालेले दिसते. नैतिक स्वच्छता आणि टापटीप यासाठी पृथ्वीराजाचे कौतुक करावे की राजकीय क्षमतेअभावी दुसरा पर्याय शोधावा या प्रश्नाचे उत्तर शोधेपर्यंत बहुधा निवडणुका जाहीर होतील. त्यानंतर या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे कष्ट काँग्रेसला घ्यावेच लागणार नाहीत.
तेव्हा अशा परिस्थितीत पहिली खेळी करून राज ठाकरे यांनी इतरांना गाफील पकडले आहे. यानिमित्ताने एक तरी ठाकरे मैदानात आले, ते बरे झाले. मैदानात आले की सत्ता ते संपत्ती सर्व काही मतदारांच्या मोजमाप टप्प्यात येते. त्यास सामोरे जाण्याचे धैर्य एका तरी ठाकरेंनी दाखवले. लोकशाहीवर विश्वास नाही असे म्हणणाऱ्या ठाकऱ्यांपासून निवडणुका लढणाऱ्या ठाकऱ्यांपर्यंत झालेला हा बदल लोकशाहीचे सामथ्र्य दाखवतो. म्हणूनच त्याचे वर्णन ठाकरे हरले, ठाकरे जिंकले असेच करावे लागेल.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2014 3:58 am

Web Title: thackeray loss thackeray win
टॅग Raj Thackeray
Next Stories
1 भाषेचे आभाळ
2 किमानही महान
3 ‘सिसी’लियन चाल
Just Now!
X