डेनिस किंकेड (१९०५- १९३७)
डेनिस किंकेड यांनी १९३० मध्ये शिवरायांची थोरवी सांगण्यासाठी  लिहिलेले,
‘द ग्रँड रिबेल : अ‍ॅन इम्प्रेशन ऑफ शिवाजी’ हे पुस्तक अगदी अलीकडेच पुन्हा नव्या रूपात  उपलब्ध झाले आहे..
छत्रपती शिवरायांचा इतिहास समजून घेऊन, लालित्यपूर्ण भाषेत त्याची मांडणी अख्ख्या पुस्तकात करणारे डेनिस किंकेड हे काही पेशाने इतिहासकार नव्हते. पण ब्रिटिशांच्या सेवेसाठी भारतात आलेल्या किंकेड घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील या आयसीएस अधिकाऱ्याने, विशेषत: मराठा इतिहास अभ्यासल्याचे दोन पुस्तकांमधून दिसते. त्यापैकी ‘द ग्रॅण्ड रिबेल : अ‍ॅन इम्प्रेशन ऑफ शिवाजी’ हे पुस्तक अगदी अलीकडेच (१ ऑगस्ट २०१५ रोजी) पुन्हा ‘शिवाजी : द ग्रॅण्ड रिबेल’ या नावाने बाजारात आले आहे. या नव्या आवृत्तीची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहेच आणि ती अनेक दुकानांतही मिळू लागली आहे, परंतु ‘प्रकाशन दिनांक : १६ सप्टेंबर २०१५’ असा उल्लेख इंटरनेटवरून हे पुस्तक विकणाऱ्या काही स्थळांवर असल्याने वाचकांचा गोंधळ होण्याचीही शक्यता आहे. हा तपशील अर्थातच बिनमहत्त्वाचा. डेनिस किंकेड कोण आणि ‘शिवाजी’विषयक पुस्तकातून त्यांचे सांगणे काय, हे पाहणे आपल्यासाठी अधिक रोचक आहे..
डेनिस किंकेड हे चार्ल्स ऑगस्टस किंकेड यांचे सुपुत्र आणि मेजर जनरल विल्यम किंकेड यांचे नातू. चार्ल्स ऑगस्टस व डेनिस या पितापुत्रांबद्दल ‘द किंकेड्स’ हे पुस्तक अरुण टिकेकर यांनी लिहिले आहे. पितापुत्र दोघेही आयसीएस अधिकारी म्हणून भारतात, दोघेही लेखक आणि दोघांनाही भारताबद्दल कुतूहलयुक्त ममत्व. यातून चार्ल्स ऑगस्टस यांनी कादंबऱ्या लिहिल्या, तर डेनिस यांनी अभ्यासावर आधारित लेखन केले. अखेर ‘अ हिस्टरी ऑफ द मराठा पीपल’ या पुस्तकाचे लेखन सुरू असतानाच डेनिस यांच्यावर काळाने घाला घातला, तेव्हा दिवंगत पुत्राचे हे काम चार्ल्स ऑगस्टस किंकेड यांनी तडीस नेले. या दोघांच्या जीवनकार्याचा तपशीलवार, साक्षेपी आढावा म्हणजे टिकेकरांचे ‘द किंकेड्स’. शिवाजी महाराजांबद्दल ग्रॅण्ट डफने लिहिले, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी शिवचरित्र सांगितले आणि मोगलांचा अभ्यास करतानाच शिवाजी महाराजांचे नेमके ऐतिहासिक कार्य काय, याचा मागोवा सर जदुनाथ सरकार यांनी १९१९ सालच्या पुस्तकात घेतला. डेनिस किंकेड यांच्या ‘शिवाजी’ची पहिली आवृत्ती १९३० साली (म्हणजे सरकारांच्या पुस्तकानंतर ११ वर्षांनी) निघाली होती. तरीही वेगळेपण असे की किंकेड यांचे पुस्तक, शिवाजी महाराजांना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने लिहिले गेलेले होते! ‘इतिहासापेक्षा हे पुस्तक म्हणजे इतिहासाला दिलेला कलात्मक प्रतिसाद होय,’ असा अभिप्राय टिकेकर यांनीही ‘द किंकेड्स’ या पुस्तकाच्या ‘डेनिस द बायोग्राफर ऑफ शिवाजी’ या प्रकरणात दिला आहे.
नव्या आवृत्तीला टी. एन. चतुर्वेदी (आयएस, माजी ‘कॅग’ आणि कर्नाटकचे माजी राज्यपाल) यांची प्रस्तावना आहे, तिचा शेवटदेखील या पुस्तकाच्या लिखाणास इतिहास न मानता लोकप्रिय इतिहासकथन मानावे लागेल, असा कौल देणारा आहे. जदुनाथ सरकार यांच्या ऐतिहासिक प्रतिपादनांचे उल्लंघन अजिबात न करता, परंतु त्याला शिवरायांबद्दल अन्य लेखकांनी मांडलेल्या सकारात्मक बाबींची जोड देऊन, अतिशय ओघवत्या आणि खानदानी इंग्रजीत डेनिस किंकेड लिहितात.
कधी कधी किंकेड यांचा ब्रिटिशपणा – किंवा भारताबद्दल युरोपियनांना वाटणारे कुतूहलमिश्रित कौतुक- या पुस्तकातूनही लपत नाही. उदाहरणार्थ, विजापूरमध्ये जिजाऊ आणि बालशिवाजी यांना शहाजीराजे बोलावून घेतात, या घटनाक्रमाचे वर्णन करताना तेव्हाचे विजापूर कसे होते, हे सांगण्याच्या मिषाने डेनिस किंकेड, विजापूरची तांबट आळी कशी होती हे तद्दन ब्रिटिश वसाहतवाद्यांच्या प्रवासवर्णनांमध्ये शोभणारी भाषा वापरून जातात. हे तांबट लोक ‘हाफ-नेकेड टु द वेस्ट’ (म्हणजे फक्त धोतर नेसलेले) असत, त्यांच्या सावळ्या वर्णामुळे त्यांची घामेजलेली पाठ चमकत असे, वगैरे तपशील शिवाजीराजे अथवा कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीबद्दल काहीही सांगत नाहीत, तरीही ते आहेत. अखेर, या पुस्तकाचा लेखनकाळ आजपासून तब्बल ८५ वर्षांपूर्वीचा आहे, हे लक्षात ठेवावयास हवेच.. त्यामुळे अशा लिखाणाबद्दल आज तक्रार नाही किंवा दोषदिग्दर्शन असा सूर लावण्यात अर्थ नाही. तरीही त्याकडे पाहायचे, ते या इतिहासकथनात लेखकाचे व्यक्तिमत्त्व कसे उमटते याचा मनोज्ञ मागोवा घेण्यासाठी! लिखाणाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, इंग्रजांपर्यंत वा आंग्लभाषा वाचणाऱ्या कुणाही देशातील वाचकापर्यंत हे पुस्तक जाणार आहे, याचे भान डेनिस किंकेड यांनी सोडलेले नाही. भारतीय संस्कृती, रूढी, प्रथा, नाती यांबद्दल जेथे म्हणून स्पष्टीकरण हवे, तेथे वाचकाला ते न मागता मिळतेच. शिवरायांसंबंधीच्या इतिहासाची जी जाणीव मराठीजनांना संस्कृतीमुळे आपसूकच आहे, तशी डेनिस किंकेड यांनी कल्पिलेल्या वाचकांना नाही.. यावर जणू काही नामी उपाय म्हणून ‘माहीत नसलेल्या’ची समतुल्यता ‘माहीत असलेल्यां’शी दाखविण्याची लेखकीय युक्ती (ऑथरली डिव्हाइस) किंकेड योजतात. यातूनच, ‘शिवाजी म्हणजे गॅरिबाल्डी’ किंवा ‘(मुसलमान राज्यकर्त्यांपैकी जरी मोगलच त्याकाळी महत्त्वाचे असले तरी) विजापूरच्या लोकांची सुलतानावरील निष्ठा सीझरवर रोमनांची असावी तितकीच’ अशा उपमांची रेलचेल दिसते आणि खासकरून भारतीय वाचक, केवढी ही स्तुती म्हणून भारावतोच.
प्रसंग रंगवून सांगण्यावर लेखकाचा भर आहे. त्यामुळे शायिस्तेखान पुण्यात कसा आला, कसा राहू लागला, यासाठी अडीच पाने खर्ची पडली आहेत. मिर्झाराजे जयसिंग यांची शिष्टाई का यशस्वी झाली असावी, यावर मात्र (तह आणि शिष्टायांत वाकबगार राज्याचा प्रतिनिधी असूनही) लेखकाने दुर्लक्ष केल्याचे दिसते, तसेच खांदेरीची लढाई (जेथे ब्रिटिशांना मराठय़ांचा पराक्रम दिसला) किरकोळ उल्लेखावर भागवली आहे. हेदेखील आजघडीला, लेखकाच्या दृष्टीने कालसापेक्षच म्हणावे लागेल.
दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख या पुस्तकात ‘शिवाजीचे प्रशिक्षक’ असा आहे, तसेच शहाजीराजांचे प्रेम प्रथमपत्नीवर का नसावे याचा ऊहापोहसुद्धा. हा भाग अर्थातच आज महाराष्ट्रातील अनेकांना अप्रिय वाटेल. परंतु अख्खे पुस्तक वाचल्यास शिवरायांचे ऐतिहासिक नायकत्व सिद्ध करण्याचाच विधायक हेतू लेखकाने बाळगला होता, हे स्पष्ट होईल. पंचाऐंशी वर्षांपूर्वीच्या या पुस्तकासाठी ‘हा इतिहास नसून केवळ पोवाडा’ हे निरीक्षण म्हणजे दूषण ठरू नये.. उलट, शिवशाहीर म्हणून दिवंगत डेनिस किंकेड यांचेही नाव घेतले जावे, अशी या पुस्तकाची महती आहे.
‘रूपा पब्लिकेशन्स’च्या पुस्तकाची किंमत आहे २९५ रुपये.

lakdi pool in Pune
VIDEO : पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तातडीने ‘लकडी पूल’ का बांधून घेतला? वाचा रंजक गोष्ट
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन