05 March 2021

News Flash

एक ऑनलाइन विनोदी भयनाटय़!

सोनी पिक्चर्सने जेव्हा ‘द इंटरव्ह्य़ू’ हा विनोदी चित्रपट काढायचे ठरविले असेल, तेव्हा त्यातून एक वेगळाच भयपट निर्माण होईल, हे सोनीच्या चालकांच्या स्वप्नातही आले नसेल.

| December 22, 2014 12:38 pm

सोनी पिक्चर्सने जेव्हा ‘द इंटरव्ह्य़ू’ हा विनोदी चित्रपट काढायचे ठरविले असेल, तेव्हा त्यातून एक वेगळाच भयपट निर्माण होईल, हे सोनीच्या चालकांच्या स्वप्नातही आले नसेल. परंतु नेमके तसेच झाले. सुरुवातीला विनोदी अंगाने जाणाऱ्या या भयपटाने मध्येच थरारक वळणही घेतले. आधीच दहशतवाद, आविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी अशी उपकथानके असलेल्या या नाटय़ाला आता तर आंतरराष्ट्रीय संबंधांचा प्रवेशही जोडला गेला आहे. खुद्द अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना या प्रकरणी भाष्य करावे लागले आहे. आपल्याकडे मॅरेथॉन मुलाखत नावाचा एक प्रकार मध्यंतरी बराच गाजला होता. सोनीचा हा ‘द इंटरव्ह्य़ू’सुद्धा त्याच प्रकारे सुरू असून, त्याचा शेवट कसा होतो याकडे अनेकांच्या भयशंकित नजरा लागल्या आहेत. हे भयनाटय़ समजून घेण्यासाठी त्यातील पात्रपरिचय करून घ्यावा लागेल. यातील मुख्य पात्र अर्थातच प्रत्यक्ष सिनेमाचे. अमेरिकेच्या दृष्टीने हुकूमशहांचे दोन प्रकार असतात. चांगला आणि जो आपल्या हातातील खेळणे नसतो असा, वाईट. उत्तर कोरियाचा तरणाबांड ‘हिरो’ किम जाँग उन हा असा वाईट हुकूमशहा. अशा हुकूमशहांवर विनोदी चित्रपट काढण्याची हॉलीवूडमध्ये प्रथा आहे. उदा. सद्दाम हुसेनवरील हॉटशॉट. सोनीने आपल्या नव्या कोऱ्या चित्रपटासाठी किम जाँग उन यांना निवडले. दोन अमेरिकी पत्रकार त्यांना मारण्याची सुपारी घेऊन उत्तर कोरियात जातात, ही या चित्रपटाची बीजकथा. ती उपहासगर्भ विनोदाच्या अंगाने जाणार होती. परंतु विनोदाला माणसे हसतात, हुकूमशहा घाबरतात. किम यांची तर लोकप्रियता भीषणच आहे. त्यांच्यावर विनोद केले जाणार हे लक्षात आल्यानंतर ते चिडले की नाही हे समजायला मार्ग नाही, पण त्यांचे भक्त मात्र संतापले. येथे या नाटय़ातील दुसरे महत्त्वाचे पात्र येते. संगणकचाचे. त्यांनी थेट सोनी पिक्चर्सच्या संगणकांवरच हल्ला चढविला. सोनीच्या काही सिनेमांच्या पटकथा फोडल्या. एका अप्रदíशत चित्रपटाची रिळे जाहीर केली. शिवाय अधिकाऱ्यांचे ईमेल, तारेतारकांची वैयक्तिक माहिती अशा गंभीर गोष्टीही त्यांनी चोरून फोडल्या. त्या प्रयोगांतून पुन्हा वेगळीच पात्रे समोर आली. ती म्हणजे सोनीचे प्रमुख अ‍ॅमी पास्कल आणि त्यांचे सहकारी. त्यांची ओबामांपासून अँजेलिना जोलीपर्यंतच्या अनेक व्यक्तींबाबतची खरी मते त्यानिमित्ताने गॉसिप चॅनेलांना उपलब्ध झाली. तो वेगळाच विनोद झाला. पण त्यातील गंभीर बाब अशी की हा चित्रपट प्रकाशित केल्यास चित्रपटगृहांवर हल्ले होतील अशी धमकी संगणकचाच्यांनी दिली. त्याबरोबर चित्रपटगृह मालकांनी चित्रपट लावण्यास नकार दिला आणि मग सोनीनेही तो ठरल्यानुसार नाताळच्या दिवशी प्रदíशत न करण्याचा निर्णय घेतला. मधल्या काळात हे संगणकचाचे उत्तर कोरियायी असल्याचे एफबीआयने जाहीर केले आणि या नाटय़ाने गंभीर वळण घेतले. आता हा प्रश्न एका देशाच्या दहशतवादाशी जोडला गेला होता. या चाच्यांनी अमेरिकेला दुसऱ्या ‘नऊ/अकरा’ची धमकी दिली होती. अशा परिस्थितीत माघार घेणे म्हणजे दहशतवाद्यांची सेन्सॉरशिप मान्य करून राष्ट्राची प्रतिष्ठा धुळीत मिळवण्यासारखे असल्याची बहुसंख्य नागरिकांची भावना झाली होती. गेल्या शुक्रवारी ओबामा यांनी त्याच भावनेला उद्गार दिला. चित्रपट प्रदíशत न करण्याचा निर्णय ही सोनीची चूक असल्याचे त्यांनी म्हटले. एका चित्रपटाच्या निमित्ताने एवढे रामायण घडले. त्याचा उत्कर्षिबदू अजून पुढेच आहे. परंतु त्याआधीचा एक प्रसंग मात्र सांगण्यासारखा आहे. जॉर्ज क्लूनी यांनी या सेन्सॉरशिपविरोधात एक पत्रक काढले. पण त्यावर सह्य़ा करायला अनेक सेलेब्रिटी पुढेच आल्या नाहीत. का? तर उद्या त्या चाच्यांनी आपल्याही संगणकावर हल्ला केला तर काय घ्या? दहशतवादाविरोधातील लढाई खूपच कठीण असते..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2014 12:38 pm

Web Title: the interview likely to release online
Next Stories
1 कसा चालवावा पुढे वारसा..
2 एलबीटीचा घोळ
3 अ‍ॅबे यांच्यापुढील आव्हाने..
Just Now!
X