हा संघर्ष आजचा नाही. असं जगणं हाच इतिहास होता, आणि वर्तमान आहे.. पण, भविष्यदेखील हेच असावं, असं कुणालाच वाटणार नाही. मात्र गुडघे टेकून भविष्य बदलणार नाही..
जन्माला येणारं मूल जसजसं मोठं होऊ लागतं, तसतशी त्याला आपल्याआपल्या बोलीभाषेची समज येऊ लागते. घरात बोलले जाणारे शब्द अंगवळणी पडतात. वाढत्या वयाबरोबर पुढे ते सवयीचेही होत जातात. त्या शब्दांचा वास्तवातील अर्थ समजण्याआधीपासूनच त्या शब्दांशी त्या लहानग्याचं नातं जडतं. अलीकडच्या काही वर्षांपासून तर, जन्माला आलेल्या प्रत्येक नव्या पिढीबरोबर बोबडय़ा बोलीभाषेचा हा संग्रहदेखील अधिकाधिक समृद्ध होऊ लागला आहे. सतत कानावर पडल्यामुळे लहानपणीच ओळखीचे झालेले काही शब्द तर पुढे वास्तवाचं रूप घेऊन आयुष्यभर पाठलाग करत राहणार असतात.
‘महागाई’ या शब्दानं गेल्या काही पिढय़ांचं जन्मापासूनचं जगणं असंच व्यापून टाकलं आहे. कळतेपण येण्याआधीपासूनच मानगुटीवर येऊन बसलेला हा शब्द पुढे जिवंत होऊन जगण्याच्या प्रत्येक पावलावर चटके देऊ लागतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांमागून जन्माला आल्यापासून धावणं हाच जणू आजकालच्या जगण्याचा अर्थ झाला आहे, आणि महागाई हा शब्द या धावण्याच्या शर्यतीतला अडथळा होऊन गेला आहे. या महागाईच्या चटक्यांची तीव्रता प्रत्येकाच्या जगण्याच्या वाटचालीत सापेक्ष असते. या चटक्यांनी काही आयुष्यं करपून जातात, तर काही जण हे चटके सोसत महागाईशी झुंजत जगण्याच्या वाटेवर चालत राहतात. पण जगण्याच्या या वाटेवरून प्रत्येकालाच धावावं लागतं. अशा शर्यतीतच महागाईचे अडथळे असतात आणि प्रत्येक अडथळ्याच्या टप्प्यावर कमी-जास्त प्रमाणात चटकेच जाणवतात. अन्नाशिवाय, कपडय़ाशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे असंख्य जीव या रस्त्यावरच्या शर्यतीत अडथळ्याच्या प्रत्येक टप्प्यावर दिसतात. त्यांचं भकास जिणं पाहून उदासवाणंपण येऊ लागतं. पण तरीही शर्यतीत धावावंच लागतं.. कारण तो रस्ता अटळ असतो. लहानपणापासून कानावर आदळणाऱ्या आणि पुढे मानगुटीवर बसून छळणाऱ्या या शब्दाचं वास्तविक भकासपण वाढत्या वयाबरोबर आणखी जाणवू लागतं. महागाईनं आपलं जगणं व्यापून टाकलं आहे. महागाईच्या नावानं बोटं मोडतच अनेक पिढय़ा मोठय़ा झाल्या. उमेदीचं आयुष्य उतरणीला लागल्यावर मानगुटीवरच्या या ओझ्यापुढे पराभवाची कबुली देऊन निवृत्तीच्या वाटेवर चालू लागल्या आणि महागाईच्या या ओझ्यानं नव्या पिढय़ांच्या मानगुटीवर बसकण मारली. जगण्याच्या शर्यतीत धावण्याची उमेद संपत आली, की धापा टाकणारी आयुष्यं आपल्या मानगुटीवरचं हे ओझं पुढच्याच्या मानेवर लादतात, आणि ते घेऊन पुढचा कुणी अडथळ्यांच्या जागेवर दबा धरून बसलेले चटके सोसत पुढे धावू लागतो. ही शर्यत सोपी नाही हे माहीत असलं, तरी त्याला धावावंच लागतं. धापा टाकत, ऊर फुटेपर्यंत!.
प्रत्येकाला छळणाऱ्या या महागाईच्या चटक्यांवर औषध शोधण्याचा कोणताही प्रयत्न कधीही सफल का होत नाही, हे एक कायमचंच कोडं असतं. एका बाजूला विकासदराचा आलेख कागदावर उंचावलेला असतो, पण महागाईच्या चटक्यांच्या वेदनांना या कागदी आलेखाची फुंकर कोणताच दिलासादेखील देऊ शकत नाही, हेही वास्तव असतं. या महागाईचे चटके पहिल्या तारखेला खिशाला बसू लागतात, आणि पुढे प्रत्येक दिवशी तीव्र होत, महिनाअखेरीला अवघं स्वयंपाकघर महागाईच्या चटक्यांनी होरपळू लागतं. गेल्या काही वर्षांपासूनची ही स्थिती अलीकडे आणखीनच भयाण होऊ लागली आहे. पहिल्या तारखेलाच खिशाचे चटके स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतात, आणि या ओझ्याखाली कमावती व्यक्तीच नव्हे, तर अवघं घरच पिचून, खचून जातं. अशा अवस्थेत कधीकधी मन पेटून उठतं, तर कधी पराभवाच्या भावनेनं खंतावलेलं मन षंढही बनतं. इतर अनेक समस्यांशी सामना करताना जेरीस आलेलं एखादं मन महागाईच्या चटक्यांपुढे हतबल होतं. घराघरांना छळणारी ही वेदना मग व्यक्तीपुरती राहत नाही, ती कुटुंबाची वेदना होते, आणि पुढे आणखी फैलावते. अवघा समाज या वेदनेची शिकार होतो. मग काही मनं पेटून बंड करून उठतात. ..आणि राजकारण जागं होतं! महागाईच्या, समाजाला छळणाऱ्या असंख्य समस्यांच्या विरोधात बंडाचे झेंडे फडकू लागतात. रस्त्यावरचे लढे सुरू होतात. सरकार फुंकर मारण्याचे प्रयोग सुरू करतं, महागाई आणि तमाम समस्यांच्या नावानं सरकारविरोधी रण पेटवण्यासाठी विरोधी पक्ष सरसावतात, आणि कधीकधी या समस्यांचा भस्मासुर राजकीय सामाजिक स्वास्थ्याच्या मुळावरही येतो. असंतोष धुमसू लागतो. जगाच्या कानाकोपऱ्यात जगण्यापुढील समस्यांच्या विरोधात धुमसणारा असंतोष अलीकडे विक्राळपणे विस्तारू लागला आहे. ब्राझीलमध्ये तर गेल्या अनेक महिन्यांपासून महागाईच्या विरोधातील आंदोलनांनी रस्ते फुलून गेले आहेत, जनजीवन अस्ताव्यस्त झालं आहे. जीवघेण्या बौद्धिक स्पर्धेत तग धरून राहण्यासाठी महागडं शिक्षण घेऊनही बघावी लागणारी बेरोजगारी, जगण्याची शांतता आणि आश्वस्त सुरक्षितता हिरावून घेणारी गुन्हेगारी, भ्रष्टाचाराची बजबजपुरी, सरकारी यंत्रणांची बेमुर्वत बेदरकारी, घराबाहेरच नव्हे, तर घराच्या दरवाजाआडदेखील घुसखोरी करून दाटलेली असुरक्षितता आणि वाढती गुन्हेगारी यांमुळे दररोजचं जगणं कठीण होत चाललं आहे. दगडासारखं मन करून जगण्याच्या अटळ रस्त्यावरून चालणंदेखील अशक्य होतं, तेव्हा एक तर मान टाकून हतबलपणे परिस्थितीपुढे झुकणं किंवा रस्त्यावर उतरून बंड पुकारणं हेच पर्याय उरतात. जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक देशांमध्ये अशा परिस्थितीचा कडेलोट झाला आणि संयम संपला तेव्हाच संतापाचा उद्रेक झाला. अनेक देश संतापाच्या या उद्रेकात धगधगत आहेत. एका बाजूला विकासाची स्वप्नं दाखवत आश्वासनांचं गुलाबपाणी शिंपडून परिस्थितीचे चटके सुसह्य़ करण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे या चटक्यांनी होरपळलेले जीव परिस्थितीवर मात करण्यासाठी जगणं पणाला लावत आहेत. ब्राझीलमध्ये महागाईच्या उद्रेकानंतर असंतोष भडकला, तर टय़ुनिशियामध्ये बेरोजगारीविरुद्धच्या संतापाला लहानशा घटनेने तोंड फुटून सत्तापालट घडविणारी क्रांती झाली. आखाती देशांतही क्रांतीचे वारे वाहू लागले. चीनलाही अस्वस्थतेची धग जाणवू लागली. तेलाच्या किंमतवाढीमुळे इंडोनेशियात संतापाची आग भडकली.
मान्सूनचा पाऊस सुरू होण्याआधी दुष्काळाच्या चटक्यांनी महाराष्ट्र होरपळत होता. शेतकरी कंगाल झाला होता. असंख्य कुटुंबं गुराढोरांना छावणीत बांधून आणि घरदार वाऱ्यावर सोडून पोटापाण्यासाठी देशोधडीला लागली होती. हाती असलेली तुटपुंजी पुंजी दुष्काळाच्या वणव्यात केव्हाच खाक झाली होती. पाऊस पडला आणि दुष्काळाने सुकलेली मनं पुन्हा ताजीतवानी, टवटवीत झाली. सुखाची स्वप्नं घेऊन घरी परतली, पण दुष्काळाइतक्याच वेदनादायक महागाईच्या चटक्यांनी असंख्य आयुष्यं आजही होरपळलेलीच आहेत. महागाई आणि रोजच्या जगण्याला आव्हान देणाऱ्या असंख्य समस्यांनी असह्य़ झालेल्या अनेकांनी हार पत्करली, तर अनेक जण परिस्थितीशी कडवा सामना करत आहेत. पण हा संघर्ष आजचा नाही. असं जगणं हाच इतिहास होता, आणि वर्तमान आहे.. पण, भविष्यदेखील हेच असावं, असं कुणालाच वाटणार नाही. मात्र गुडघे टेकून भविष्य बदलणार नाही.. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी हिंमत करावीच लागेल!

loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण