सार्वजनिक गणेशोत्सव या शब्दांनाच नव्हे, तर या सोहळ्यालाच परंपरेचे आणि इतिहासाचे वलय आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्याला या वर्षी १२० वर्षे झाली. घरोघरी देवघरांत पूजला जाणारा गणपती रस्त्यावर आला, दुर्लक्षित, उपेक्षित असलेल्या एखाद्या मोकळ्या जागेवर उभारलेल्या तात्पुरत्या शामियान्यात विराजमान झाला आणि त्याच्या अवतीभवती रात्रंदिवस ध्वनिक्षेपकावरून भडक संगीताचा मारा सुरू झाला. स्वातंत्र्यापूर्वीच्या सार्वजनिक गणेशोत्सवास एका विचाराचे सूत्र होते. गेल्या सहा दशकांत जेव्हा जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवांची चर्चा झाली, तेव्हा तेव्हा, लोकमान्यांना अपेक्षित असलेला सार्वजनिक गणेशोत्सव तो हाच का, हा प्रश्न सहजपणे प्रत्येकाच्याच मनात डोकावून गेला आणि कितीही सकारात्मक विचार करूनही, उत्तर मात्र नकारात्मकच आले. सार्वजनिक गणेशोत्सवांचे स्वरूप भडक होत गेल्याचे माहीत असूनही, रात्रंदिवस दर्शनाच्या रांगेत ताटकळणाऱ्या भक्तांनी गणरायाच्या चरणी किती क्षणकाळांकरिता लीन व्हावे, हे मात्र त्या उत्सवांच्या मंडपातील ‘आधुनिक गणसेवकां’नीच ठरवावे, हा तो बदल.. ज्याच्या दर्शनासाठी आपण वेळेची तमा न बाळगता रांगांमध्ये ताटकळतो, त्याच्या चरणांवर माथा टेकवून लीन होणे मात्र, या गणसेवकांच्या मर्जीवरच अवलंबून असते, ही जाणीव विषण्ण करणारी असली, तरी असे अनुभव मात्र अलीकडे वारंवार भक्तांना येऊ लागल्याने, प्रत्येक गणेशोत्सवाच्या वेळी स्वत:लाच विचारला जाणारा तोच प्रश्न आता अधिकच ठळकपणे अधोरेखित झाला आहे. गणेशोत्सव हा केवळ ‘इव्हेन्ट’ झाला आहे, भक्तीची ही एक बाजारपेठ आहे आणि सण, उत्सवांचेदेखील एक अर्थकारण आहे, हेही अलीकडे गुपित राहिलेले नाही. त्यामुळे लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे ते सूत्र आताच्या उत्सवांत आढळणार नाही. तरीही, सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना मात्र कालबाहय़ झालेली नाही. कारण, सार्वजनिक उत्सवांचे आयोजक किंवा त्या उत्सवांचे बाजारीकरण करणाऱ्या सर्वाचेच उत्सवामागचे उद्देश काहीही असले, तरी भाविकांची भक्ती मात्र निखळच आहे. म्हणूनच, ज्याच्या दर्शनासाठी कित्येक तास रांगेत उभे राहण्याची ‘तपश्चर्या’ केल्यानंतरही, प्रत्यक्ष त्या दैवताच्या पायाशी मात्र, क्षणकाल व्यतीत करण्याची इच्छा असली तरी कार्यकर्त्यांच्या मुजोरीपुढेच मान तुकवून माघारी फिरावे लागले तरी त्याची खंत वाटत नाही. त्या दैवतावरील श्रद्धा हेच त्यामागचे कारण असते. अशा अनुभवांमुळे एक झाले आहे.. सार्वजनिक गणेशोत्सव हा उत्सव काळातील भक्तिभावाच्या मानसिकतेला विचित्र वळण देणार की काय ही नवी भीती रुजण्याची शक्यता गडद झाली आहे. बदलत्या काळासोबत उत्सवांच्या आणि सणांच्या साजरेपणाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि तो बदल स्वीकारलादेखील गेला, सहजपणे पचवून अंगवळणी पाडून घेतला गेला. यंदाच्या गणेशोत्सवात याच बदललेल्या मानसिकतेचा अंधूक अनुभव आला. सण आणि उत्सवांच्या प्रत्येक परंपरेत काही सामाजिक मानसिकता सुदृढ करणारे संदेश दडलेले असतात, अशी आपली भावना आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मात्र, सार्वजनिक उत्सवांमधून असा काही संदेश मिळाला का, हे तपासण्याची गरज आहे. दहा दिवसांच्या या उत्सवाचा सांगताकाळ ही समाजाच्या समजूतदारपणाची आणखी एक कसोटी असते. गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये या समजूतदारपणाचे, भक्तिभावाचे आणि मुख्य म्हणजे, ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले, त्या ऐक्यभावनेचे प्रतिबिंब उमटले, तरी पुरेसे आहे. कारण आजच्या असुरक्षिततेच्या काळात, त्याची मात्र गरज आहे..