‘लघुचित्रं’ हा जणू भारताचा गतकालीन ठेवा ठरला असताना; तो ‘आपला इतिहास’ कसा आहे, हे  सोपेपणानं आणि सुटसुटीतपणे पोहोचवणाऱ्या पुस्तकाची ओळख..
प्राध्यापक बी. एन. गोस्वामी यांनी लिहिलेल्या किंवा सहलेखन केलेल्या पुस्तकांची संख्या २५हून अधिक आहे. यापैकी प्रत्येक पुस्तक अभ्यासपूर्ण आहे. चंडीगढच्या पंजाब विद्यापीठात सुप्रतिष्ठ (किंवा तहहयात) प्राध्यापक असलेल्या या कला-इतिहास अभ्यासकाला या क्षेत्रातले अनेकजण ‘महान’ का म्हणतात, त्यांना मिळालेल्या पद्मश्री (१९९८) वा पद्मभूषण (२००८) पदव्या वादग्रस्त का ठरत नाहीत, याचा उलगडा होण्यासाठी आधीच्या २५ पैकी कोणतीही एक-दोन पुस्तकं पुरेशी ठरावीत. या पुस्तकांच्या नंतरचं ‘द स्पिरीट ऑफ इंडियन पेंटिंग’ हे नवं पुस्तक गेल्या महिन्यात प्रकाशित झालं. त्याची ही ओळख..
भारतीय चित्रकलेचा इतिहास, हा प्रा. गोस्वामी यांचा विशेष अभ्यासाचा विषय. शिल्पकला आणि वास्तुकला बाजूला ठेवून केवळ ‘रंगवलेल्या चित्रां’चाच विचार केला, तरीही भारतीय इतिहासात भित्तिचित्रं आणि हातात घेऊन पाहण्याची चित्रं (किंवा रूढ भाषेत- ‘लघुचित्रं’) असे दोन भाग येतात. यापैकी लघुचित्रांच्या अनेक शैली आहेत आणि या सर्व शैलींचा अभ्यास करतानाच, प्रा. गोस्वामी यांनी पहाडी चित्र-शैलीचं विशेष संशोधन केलं. sam10इतिहासाच्या ‘संशोधना’तून लागणारे शोध नेहमी मूर्तरूपात असतातच, असं नाही. पण अठराव्या शतकात गुलेर गावातून जसरोटा संस्थानचे राजे बलवंतसिंग यांच्या पदरी चित्रकार म्हणून राहिलेल्या नैनसुख याच्या विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या चित्रांचा मूर्त-शोध प्रा. गोस्वामी यांनी लावला आणि नैनसुखचं मोठेपण नेमकं काय आहे, हे जगाला अभ्यासपूर्णरीत्या दाखवून दिलं. या नैनसुखच्याच चित्राचा अंश या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे. या चित्रामध्ये राजाच्या हातात एक ‘लघुचित्र’ आहे- त्यात नीलवर्णी कृष्ण वनात बसून बहुधा राधेची वाट पाहतो आहे- आणि या अशा चित्राकडे पाहणाऱ्या याच्या मागे विनम्रपणे हात जोडून उभा असलेला खुद्द चित्रकार नैनसुख, आपल्या अन्नदात्याला आपले काम पाहून काय वाटते हेही न्याहाळतो आहे! पुस्तकाच्या पानापानांत असे १०१ (किंवा त्याहून जास्तच- कारण एक चित्र अनेकजणांनी पूर्ण करण्याची प्रथा होती) दिवंगत चित्रकार आपल्यासाठी ताटकळले आहेत.. या चित्रकारांना जणू पाहायचं आहे की,  प्रा. गोस्वामी यांनी परिश्रमपूर्वक निवडलेल्या आमच्या चित्रांकडे आजचे रसिक कसे पाहतात!
वाचक ‘आजचे’ आहेत, त्यांना केवळ कुतूहल आहे, कौतुकही आहे; पण अभ्यास करायला वेळ नाही, हे गृहीत धरूनच प्रा. गोस्वामी यांनी सोपं किंवा सुटसुटीत लेखन केलं आहे. पुस्तकाची दोन भाग- चार उपविभाग ही रचनाही वाचककेंद्री आहे. दुसऱ्या भागाचे चार उपविभाग शैली, इतिहास, सनावळ्या या प्रकारे न करता ‘व्हिजन’ (चित्रकारांची कल्पनाशक्ती), ‘ऑब्झव्‍‌र्हेशन’ (चित्रकारांचं निरीक्षण), पॅशन (चित्रांमधलं भावदर्शन आणि शृंगारदर्शनसुद्धा) तसंच ‘कॉन्टेम्प्लेशन’ (चित्रांतला शांतरस आणि देवाच्या भक्तांची स्थिती दाखवणारी चित्रं) असे आहेत.  चित्र कशाचं आहे, त्यात काय दाखवलंय, त्यामागची कथा काय, कथेतली पात्रं कोण, याचा परिचय देताना संबंधित पुराणग्रंथांमधली किंवा काव्यग्रंथांमधली वचनं इंग्रजीतून उद्धृत करावीत, कथा थोडक्यात सांगाव्यात आणि सामान्य माणसाचं हे समाधान झाल्यानंतर मग अगदी अखेरच्या तळटीपेसारख्या परिच्छेदात संशोधक म्हणून आपल्या नोंदी जणू काही गुजगोष्टच सांगतोय इतक्या साध्या शब्दांमध्ये सांगाव्यात, अशी रीत प्रा. गोस्वामी यांनी पाळली आहे. अर्थात, १०१ चित्रांचा भाग हा पुस्तकाचा ‘भाग दुसरा’ आहे. त्याआधीची ११७ पानं ‘भाग पहिला’नं व्यापली आहेत. ‘अ लेअर्ड वर्ल्ड’- अनेक प्रतलांचं, बहुस्तरीय आणि अनेकांतवादी जग, असं त्याचं नाव. आज ज्याला ‘भारतीय संस्कृती’ (किंवा गतसंस्कृती) म्हणता येईल अशा सांस्कृतिक भूगोलाशी आणि त्या भूगोलात इसवी ११व्या ते १९व्या शतकापर्यंत घडलेल्या इतिहासाशी परिचय करून देण्यावर ‘अ लेअर्ड वर्ल्ड’ दीर्घलेखाचा भर आहे.
हे जग ‘लेअर्ड’ म्हणजे बहुस्तरीय असणार एवढं ठीक, पण ‘अनेकांतवादी’ कसं काय? हे पुढे चित्रांमधून दिसणारच असतं. उदाहरणार्थ, १८०व्या पानावरलं चित्र रामायणातल्या प्रसंगाचं आहे. इ.स. १५९५ ते १६०० या पाच वर्षांत रंगवलं गेलेलं आहे आणि तेही एका हिंदू राजानं स्वत:साठी रंगवून घेतलेलं आहे.. तरीही, वनवासी रामजींच्या कुटीची अख्खी सजावट मुघल राजवाडय़ासारखी, अशी कल्पना चित्रकारानं लढवली आहे! या चित्रातल्या राम, लक्ष्मण आणि सीता या व्यक्तिचित्रांची हाताळणी आणि प्रासादतुल्य कुटीचे डिझाइन यांत ढळढळीत फरक आहेच, पण मागल्या बाजूस दिसणारी झाडं, त्यावरले पक्षी, डोंगर आणि संध्याकाळचं सुवर्णरंगी आकाश यांची शैली आणखी तिसरीच आहे. या तीन शैलींचा संगम राजपूत राजांसाठी काम करणाऱ्या चित्रकाराच्या चित्रशाळेत घडला आणि मालकानंही तो मान्य केला! अनेकांतवादाच्या अशा दृश्यखुणा पुस्तकात आहेत, कारण त्या टाळता येणारच नाहीत. ‘बहुधा औरंगाबाद- महाराष्ट्र’ इथं तयार झालं असावं असं एक छान चित्र (पान २१२) आहे.. इंद्राचं नृत्य.. इथे इंद्राला एकंदर ४० हात आहेत! दोन्ही हातांच्या कोपरापासून फुटलेले २०-२० हात. त्या प्रत्येक हाताच्या बोटांवर एकेक वादक, नर्तक, पुजारी किंवा बऱ्याच हातांमध्ये फूल.. पण हिंदू देवदेवतांच्या रूपांकनात नेहमी खांद्यापासून फुटलेल्या भुजा आणि हात दिसतात; मग इथल्या इंद्राला कोपरापासून का? ‘ही काश्मिरी चित्रांची पद्धत होती,’ असं प्रा. गोस्वामी सांगतात आणि हे चित्र मात्र १७०० सालच्या एका जैन ‘पंचकल्याणक पटा’मधलं आहे, जैन पारंपरिक पद्धतीनुसार तो पट कापडावरच रंगवलेला आहे, हेही. शिवाय, इंद्र हे वैदिक दैवत इथे जैन पटावर आलं आहे, हेही! आहे की नाही अनेकांतवाद?
पण पुस्तकाची खुबी ही की, अनेकांतवाद- किंवा आणखी कुठल्याही ‘वादा’त अजिबात न पडता, तथ्यांची मांडणी करत आणि त्याला काव्याची, कल्पना समजावून सांगण्याच्या हातोटीची जोड देत हे पुस्तक पुढे जातं. हे साहजिकच आहे, कारण गोस्वामींनाही या पुस्तकाचं वेगळं महत्त्व मान्य असणार. आधीची पंचवीस पुस्तकं ज्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीत, असे लोक जगात कुठेही असू शकतात. त्या सर्वांपर्यंत आणि त्यांच्या पुढल्या पिढीपर्यंतसुद्धा भारतीय चित्रांपैकी या १०१ चित्रांचा ठेवा आपण पोहोचवायचा आहे, असा हेतू या ग्रंथामागे दिसतो. कालजयी चित्रांची ओळख काळांचे थर भेदणारीच असायला हवी होती, तसं इथं दिसतं.
अजिंठा किंवा बाघ इथल्या बौद्ध भित्तिचित्रांसारखी दिसणारी छोटय़ा आकाराची चित्रं १३व्या शतकात होती. त्यांपैकी एक चित्र इथं आहेच, पण ‘मुघल शैली’ अशी (तुर्कस्तानी आणि इराणी शैलींपेक्षा निराळी) शैली इथे रुळण्याआधी- म्हणजे साधारण सोळाव्या शतकापर्यंत बौद्ध आणि जैन लघुचित्रांची प्रगती होत होती. पुढे जैन शैली महाराष्ट्रातही विस्तारली. मुघल काळात राजपूत शैली बहरल्याच, पण पहाडी शैलीच्या अनेक शाखा (त्यात कांगडा शैली महत्त्वाची) मुघल अमलातही जिवंत राहिल्या. ‘मुघल शैली’ असं ज्याला म्हणता येईल, तीही या शैलींच्या प्रभावातून पुष्ट झाली (उदाहरणार्थ : ‘चितोडचा लढा’ हे १५८६-८७ सालचं, पान ३०२ वरलं चित्र) असं प्रा. गोस्वामी दाखवून देतात. यातून, भारतीय लघुचित्रांबाबतचे गैरसमज आणि काही ‘समज’सुद्धा गळून पडतात आणि डोळे- मेंदू हे अवयव पुस्तकात नसलेली- १०२ पासून पुढली चित्रं पाहण्यासाठी अधिक स्वच्छ होतात.
 ‘काय ठेवलंय तुमच्या त्या भारतीय लघुचित्रांत?’ असा प्रश्न विचारणाऱ्यांचा नक्षाच उतरवेल, एवढी ताकद या पुस्तकात आहे. चित्रांची निवड आणि त्याबद्दलचं लिखाण, या दोहोंतून ही ताकद दिसून येते. पुस्तकाची छपाई उत्कृष्ट आहेच. एवढं झाल्यावर ते संग्राह्य आहे हे मुद्दाम सांगावं लागूच नये. ‘ग्रंथराज’ असं या पुस्तकाला म्हणावं लागेल, याचं एक कारण (वर म्हटल्याप्रमाणे) म्हणजे, हे प्रा. गोस्वामींच्या ‘२५ पुस्तकांचा अर्क ठरणारं पुस्तक’ आहे. दुसरं कारण : आजवर १०१ निवडक चित्रांची पुस्तकं (पाश्चात्त्य, आधुनिक भारतीय.. वगैरे) अनेक झाली, पण या पुस्तकानं जो परिणाम साधला, तो एका गत-काळाला पुन्हा ‘आपला इतिहास’ (आपला म्हणजे जागतिक चित्रकलेचा सुद्धा) म्हणून पाहण्याची दृष्टी देणारा आहे. अखेर, ‘या चित्रांतून भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचे बहुस्तर नक्की कळतील, पण ‘भारतीय  सौंदर्यशास्त्र ते हेच’ असं मी म्हणणार नाही’ ही प्रा. गोस्वामी यांनी घेतलेली भूमिकाही स्वीडिश, मराठी, जर्मन, गुजराती आदी वाचकांसाठी उपकारकच आहे.

* ‘स्पिरिट ऑफ इंडियन पेंटिंग- क्लोज एन्काउण्टर्स विथ १०१ ग्रेट वर्क्‍स ११००- १९००’
– बी. एन. गोस्वामी
अ‍ॅलन लेन- पेंग्विन.
पृष्ठे : ५७० (सर्व आर्टपेपरवर), किंमत : १४९९ रुपये (इंटरनेटवर १०५०/- पासून)