News Flash

मराठी भाषावैभवाचा इंग्लिशमार्गे शोध

अलंकार म्हटले की शोभा वाढवणारे उपरे नक्षीकाम असे वाटते. याउलट भाषा ही जर नृत्यांगना मानली तर तिने केलेले आविर्भाव (जेस्चर्स) आणि घेतलेल्या कायिकमुद्रा

| November 15, 2013 01:32 am

अलंकार म्हटले की शोभा वाढवणारे उपरे नक्षीकाम असे वाटते. याउलट भाषा ही जर नृत्यांगना मानली तर तिने केलेले आविर्भाव (जेस्चर्स) आणि घेतलेल्या कायिकमुद्रा (पोस्चर्स) यांना ‘फिगर्स ऑफ स्पीच’ म्हणणे जास्त युक्त ठरते. आपण शिकतो ते मुख्यत: साधर्माधिष्ठित अलंकार. उलट इंग्लिशमधील विरोधात्मक फिगर्स फार मार्मिक असतात. या विरोधात्मक फिगर्स मराठीतही घडत असतात, पण तशा शिकविल्या मात्र जात नाहीत.
कॉलेज लेव्हलला, अभिधा म्हणजे वाच्यार्थ (भिक्षा वाटून घ्या – कुंती), लक्षणा म्हणजे सूचितार्थ (जंगल पेटले तर उंदीर काय करतील – विदुर) आणि व्यंजना म्हणजे विपरीत अर्थ (सगळाच ‘आनंद’ आहे!) अशा तीन भाषाशक्ती सांगितल्या जातात. त्यांपकी व्यंजना म्हणजे ‘माझे विद्वान वकील मित्र’ यासारखे उपरोधाने केलेले वाक्प्रयोग (व्हर्बल आयरनी), एवढीच आपल्याला माहीत असते. त्यामानाने विरोधावर आधारित इंग्लिश फिगर्स फारच समृद्ध आहेत.  कोणत्याही आलंकारिक विरोधाला ‘विरोधाभास’ म्हणायचे ही अगदीच बेशिस्त आहे. पॅराडॉक्स आणि आयरनी या दोन्ही फिगर्सना विरोधाभास म्हणणे चुकीचे आहे. जेथे खरे तर विरोध अजिबात नाही, पण सकृद्दर्शनी भासतो, अशालाच विरोधाभास (पॅराडॉक्स) ही संज्ञा राखून ठेवली पाहिजे. अशी शिस्त राहावी म्हणून सध्या इंग्लिश संज्ञाच वापरत आहे.
‘महापुरे झाडे जाती। तेथ लव्हाळी वाचती।’ यात ताठा हे झाडाचे दौर्बल्य आणि लवचीकता हे लव्हाळ्याचे सामथ्र्यच आहे, म्हणजे विसंगती भासते, पण प्रत्यक्षात नसते. तसेच एक संस्कृत सुभाषित ‘आशा हे असे बंधन आहे की त्यात अडकलेला पळत सुटतो आणि मुक्त असलेला जागेवरच थांबतो.’  किंवा ‘अहंकारावर मात करणे ही गोष्ट मी मी म्हणणाऱ्यांना जमत नाही’, यांतही विसंगती नाही. शाब्दिक खेळ म्हणून पाहता, ‘मी मी’ म्हणल्यावर कसे जमणार? जास्त सखोल पातळीवरही ‘मात करणे’ या क्रियेला भक्कम अहंकार लागणारच! म्हणून यालाही पॅराडॉक्स म्हणता येईल. पायधूळ या रूपकाचा वापर करून कुसुमाग्रजांनी ‘पृथ्वीचे प्रेमगीत’मध्ये, ‘अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्। मला ज्ञात मी एक धूलिकण। अलंकारण्याला परी पाय तुझे। धुळीचेच आहे मला भूषण।’ असा पॅराडॉक्स वापरला आहे.  
येथे एक खबरदारी घेतली पाहिजे. तत्त्वज्ञानात एकमेकांना कूटप्रश्न घालण्याची एक परंपरा आहे. त्यात व्यवहारात अगदी शक्य असलेली गोष्ट तर्कत:च अशक्य असल्याचे सिद्ध केले जाते. अशा गाजलेल्या प्रश्नांनादेखील पॅराडॉक्सेस म्हटले जाते, पण ‘फिगर्स ऑफ स्पीच’ या सदरातले पॅराडॉक्सेस हे नव्हेत. पॅराडॉक्सने बसणारा धक्का अनुकूल असतो, तर आयरनीतील धक्का प्रतिकूल असतो.  
उदाहरणार्थ, शांततेचे नोबेल! दारूगोळा बनविणाऱ्या कारखान्याच्या नफ्यातून मूळ निधी जमला. ही एक (सिच्युएशनल) आयरनी आहे. तशीच ‘जिथे दात आहेत तिथे चणे नाहीत..’ हीदेखील आहे. ‘जग हे बंदिशाळा’, असे एकदा मान्य केले की, ‘सुटकेलाही मन घाबरते’, यातील मृत्यूचा निर्देश आयरनी म्हणून उभा राहतो. ड्रॅमॅटिक आयरनीमध्ये मूळ हेतूशी विसंगत परिणाम पदरी येण्याचे नाटय़ दाखवले जाते. शर्मिष्ठेला दासी बनविण्याचा देवयानीचा हेतू तिच्यावर उलटतो. भीष्माला घ्यायला लावलेली प्रतिज्ञा सत्यवतीवर उलटते. भस्मासुराला दिलेला वर तो शंकरावरच वापरू पाहतो. अनकही (कालाय तस्म नम: – खानोलकर)चा नायक प्रेयसी वाचावी म्हणून वेडय़ा मुलीशी ‘पहिले लग्न’ करतो. पण ती सुधारत जाते आणि गिल्टने मूळ प्रेयसी आत्महत्या करते! ‘पहिली पत्नी’ लवकरच जाईल ही भविष्यवाणी खोटी ठरते की खरी ठरते? सुंदर स्ट्रेट ड्राइव्हने समोरचा पार्टनर धावचीत होतो वा इनसाइड एज लागून चौकार जाणे, हे बोलरसाठी आयरनी ठरते.  
अँटिथिसीस या फिगरमध्ये विरोध (कॉन्ट्रास्ट) असतो, पण विसंगतीचा प्रश्न नसतो. विरोधी गोष्टीशी तुलना करून, मुख्य गोष्टीचे महत्त्व अधोरेखित केले जाते. भांगेत तुळस, किनारा तुला (समुद्रा) पामराला, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, वैनतेयाची (गरुडाची) भरारी काय मशका (चिलट) साधते? वगरे.
एपिग्रॅम या फिगरमध्ये कशापेक्षा काय चांगले हे सांगण्यासाठी, त्याच शब्दांची मोडतोड करून, क्रम उलटसुलट मांडला जातो. ‘नंतर टाकून बोलण्यापेक्षा अगोदर बोलून टाकलेले चांगले’, ‘जग बदलण्याचा प्रश्न हा बदल जगण्याचा प्रश्न आहे’, ‘हाकेच्या अंतरावर राहणारे अंतरीची हाक जाणतीलच असे नाही.’ ‘न पेलणारी जबाबदारी घेणे, हे जबाबदारी न घेण्यापेक्षा जास्त बेजबाबदारपणाचे आहे.’  हे नमुनेदार एपिग्रॅम्स आहेत. ‘होणार सून..’ या मालिकेत, ‘जीवनातली नाती जपण्यापेक्षाही नात्यांतला जिवंतपणा जपणे महत्त्वाचे आहे’ असा एक एपिग्रॅम येऊन गेला आहे. अ‍ॅप्रोच बदलला की कसा मुळापासून फरक पडतो हे ठसविण्यात एपिग्रॅम्स फार प्रभावी ठरतात.  
तर्कदोषांच्या उंबरठय़ावरील अर्थपूर्णता
विरोधात्मक फिगर्समधली सर्वात धमाल फिगर आहे ऑक्झिमोरॉन. यात एकापुढे एक असे दोन शब्द येतात की सरळ व्याघात (लॉजिकल काँट्रॅडिक्शन) होईल की काय असे वाटते, पण अतिशय खुबीदारपणे व्याघात टाळलेला असतो. त्यातून व्यक्त होणारी गोष्ट वाच्यार्थाने खरी असू शकत नाही, पण लक्षणार्थाने असते. ‘उघड गुपित’ म्हणजे माहिती सर्वाना आहे, पण सिद्ध कोणालाच करता येणार नाही! मीठ अळणी हा व्याघात, नावडतीचं.. ने टळत असतो. ओरिजिनल कॉपी ही गोष्ट ‘कॉपी’चा अर्थ व्यापक करून पाहाता अस्तित्वात असते. एखादी गोष्ट ‘अभावानेच आढळते’ हाही ऑक्झिमोरॉन. असह्य़ शांततासुद्धा. गांधीजींच्या सुप्त हुकूमशाही वृत्तीमुळे, त्यांचा मोठा मुलगा हरिलाल याची जी शोकांतिका झाली (नाटक- गांधी विरुद्ध गांधी), तिच्यावरील मूळ गुजराती कादंबरीचे नाव, ‘प्रकाशनू पडछाया’ आहे. सावली ही प्रकाशाच्या आड येणाऱ्या गोष्टीचीच पडू शकते, पण मांगल्याच्या आग्रहात दडलेले अमंगळ, या अर्थाने शीर्षक महान आहे आणि म्हणूनच फिगर म्हणून पाहता ऑक्झिमोरॉन आहे. भयंकर सुंदर वगरे किरकोळ ऑक्झिमोरॉन्स तर भरपूर सापडतात. पुलंनी काही भन्नाट ऑक्झिमोरॉन्स केल्या आहेत. ‘माझं मौन कोणी ऐकायलाच तयार नाही.’ ‘मुलगी अगदी सरळ वळणाची आहे.’ वगरे.   
व्याघाताच्या उलटा तर्कदोष म्हणजे द्विरुक्ती. पिवळा पितांबर हे फक्त उदाहरण म्हणून रचलेले आहे. इतक्या बिनकामाच्या द्विरुक्त्या कोण करेल? तर्कदोष म्हणून द्विरुक्ती नाही, पण द्विरुक्ती भासते, तेव्हा टॉटॉलॉजी ही फिगर ऑफ स्पीच म्हणून येते. उदा. ‘नाही म्हणजे नाही!’, ‘जे होईल ते होईल!’ असे उद्गार निर्थक नसतात. चर्वतिचर्वण हा रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या संदर्भात आलेला शब्द, निष्फळ चच्रेतील निरुपयोगीपणा सांगण्यासाठी टॉटॉलॉजी म्हणून उपयोगी आहे. जे एवीतेवी अशक्यच असते ते ‘होणार नाही’ म्हणून सांगणेसुद्धा अर्थपूर्ण असू शकते. ‘काही आकाश कोसळत नाही.’, ‘तुझ्या जिभेला काही हाड?’, ‘मेलं कोंबडं आगीला भीत नाही.’ या प्राय: (क्वाझी) टॉटॉलॉजी ठरतात.
फिगर म्हणून येणाऱ्या ऑक्झिमोरॉन्स व टॉटॉलॉजीजमध्ये तर्कदोष टाळलेला असतो. पण या दोन तर्कदोषांचा अतिरंजित आरोप करून वक्रोक्तीही केल्या जातात. जसे ‘भ्रष्ट राजकारणी ही द्विरुक्ती आहे’ असे म्हणणे ही वक्रोक्ती आहे. ‘अर्थपूर्ण कविता हा व्याघात आहे’ असे म्हणण्यातून नवकाव्याला झोडायचे असते. अशा वेळी अस्सल व्याघात नसतोच, कारण कविता नक्कीच अर्थपूर्ण असू शकते. याउलट, ‘सर्वहाऱ्याची अधिसत्ता’ हा व्याघात आहे असे मी म्हणतो, तेव्हा ना तो ऑक्झिमोरॉन असतो व ना ती वक्रोक्ती असते. मला तर्कत:च तसे म्हणायचे असते.
भाषा विषयाच्या शिक्षणातील गफलती
अलंकार हा विषय शाळांमधून अगदीच मर्यादित आणि ठोकळेबाजपणे शिकवला जातो. महत्त्वाकांक्षी विद्यार्थी तो स्कोअिरगवाला म्हणून यांत्रिकपणे वापरतात, पण परीक्षेपुरताच. परीक्षा झाली की हा विषय जीवनातून हद्दपार झालेला असतो. भाषा म्हणजे मराठी, िहदी, गुजराती, जर्मन, फ्रेंच इत्यादी नव्हेत, तर ‘भाषा इन जनरल’ म्हणून आपण कशी जोपासतो यावर आपला सगळाच प्रवास अवलंबून असतो. आपण भाषां‘मध्ये’ पेपर देतो, पण भाषे‘चा’ पेपरच नसतो. साधे कारण असे आहे की पाठांचे आशय लक्षात (पाठ!) राहिल्याने मार्क मिळत राहतात. मी शाळेत होतो तेव्हा, उदाहरणार्थ इंग्लिशमध्ये गोपाल, सीता, लीला, गणपत, अहमद आणि यास्मिन या कृत्रिम पात्रांच्या जीवनात काय घडले हे कळायचे, पण भाषा चालवता येण्याचे काय?  
 खरे तर विचारशक्ती वाढविण्यासाठी व्याकरण ही चांगली संधी असते, पण व्याकरण इतके दुर्लक्षित राहते की काही शिक्षकांसह अनेकांची समजूत, उदाहरणार्थ ‘आपले कर्तरी/कर्मणी म्हणजेच इंग्लिशमधले अ‍ॅक्टिव्ह/पॅसिव्ह’ अशी धादांत चुकीची असते. क्रियापदाची रूपे बदलण्याचा एक किरकोळ संकेत इतकाच अर्थ कर्तरी/कर्मणीला आहे. त्यामुळे रामू/सीता खातो/खाते आणि आंबा/कैरी खाल्ला/खाल्ली इतपतच ते आहे. पण व्हॉइस म्हणून दोन्ही अ‍ॅक्टिव्हच आहेत. ‘च्या कडून खाल्ले जाते’ हे खरे पॅसिव्ह! ‘खनिज भट्टीत तापवले जाते’ अशा व्यक्तिनिरपेक्ष प्रक्रिया सांगताना पॅसिव्ह व्हॉइस लागतो. म्हणजे इथेही संबंध औद्योगिक क्रांतीशी आहे!
लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 1:32 am

Web Title: understanding richness of marathi language through english
Next Stories
1 ‘कर्तव्यच्युती-सत्ता-कर्तव्यच्युती’ दुष्टचक्र
2 आधी साफसफाई ‘गाढव’ कायद्यांची
3 ‘सम्यक’ – निसर्ग : एक शुद्ध भंकस
Just Now!
X