अंगभूत गुण आणि उत्स्फूर्तता यांवरच सर्व भार टाकून आंतरिक प्रेरणांच्या जोरावर विजय मिळवणे हे आता कोणत्याच क्षेत्रात शक्य नाही. कार्लसन याने विश्वनाथन आनंदवर मिळवलेल्या विजयातून याचा प्रत्यय यावा. बुद्धिबळ मोठय़ा प्रमाणावर बदलले असून आनंद या क्षेत्रात कालबाहय़ ठरला हे आपण, कितीही दुखदायक असले तरीही, मान्य करावयास हवे.बुद्धिबळाच्या चौसष्ट घरांवर गेली पाच वर्षे तळपणारा विश्वनाथन आनंद याचा भारतीय सूर्य अखेर अस्तास गेला. तोही त्याच्या मायभूमीत झालेल्या लढतीत. विश्वनाथन आनंद याने विश्वविजेतेपद गमावणे हे भारतीयांना दु:खदायक आहेच, परंतु अधिक वेदनादायी आहे ते त्याचे न लढता पराभूत होणे. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन या तरण्याबांडाने आनंदला अगदी सहज हरवले. कधी नव्हे ते क्रिकेट आणि सचिन वगळता भारतीय अन्य कोणत्या खेळाकडे लक्ष ठेवून होते. अखेर त्यांच्या पदरी निराशा आली. या जयापजयाचे अनेक अर्थ असून ते आपण समजून घेणे गरजेचे आहे.
या विजयाने कार्लसन हा पहिलाच आधुनिकोत्तर काळातील खेळाडू ठरणार आहे. संगणक विज्ञानाच्या आणि इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अतिवेगवान प्रसारामुळे बुद्धिबळातील मानवी कौशल्यास अचाट अशा कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड मिळाली आहे. यामुळे प्रतिस्पध्र्यास प्रत्यक्ष सामन्यापूर्वीच ‘वाचता’ येते. ही बाब जशी बुद्धिबळास लागू होते, तशीच जगण्याच्या अन्य क्षेत्रांसही लागू पडते. या संदर्भात क्रिकेट या आपल्याकडील लोकप्रिय खेळाचे उदाहरण देता येईल. प्रतिस्पध्र्याच्या बुरुजास कोठून खिंडार पडते हे संगणकीय माध्यमाचा कौशल्याने उपयोग करून शोधणे हे आता सहज शक्य झाले आहे. सचिन तेंडुलकर याचा उतरणीचा काळ आणि या संगणकीय कौशल्याचा प्रगतीचा कालखंड हा एकच आहे. सचिनच्या गेल्या काही वर्षांतील ढासळत्या कामगिरीस त्याच्या वयाइतकेच हे संगणकीय साहाय्य आहे हे आपण लक्षात घ्यावयास हवे. त्यामुळे सचिनच्या खेळातील कच्चे दुवे हे प्रतिस्पध्र्यानी वेचून काढले असून गेल्या काही वर्षांतील त्याच्या बाद होण्याचे विश्लेषण केल्यास हे लक्षात यावे. याचाच अर्थ असा की खेळ हा प्रत्यक्ष मैदानावरील प्रेरणा, प्रतिक्रिया यांवर चालणारी क्रिया नसून व्यवस्थापकीय कौशल्य वापरून एखाद्या शस्त्रक्रियेप्रमाणे करावयाचे बौद्धिक कृत्य आहे. भारतीय कमी पडतात ते नेमके याचबाबत हा इतिहास आणि वर्तमान आहे. अंगभूत गुण आणि उत्स्फूर्तता यांवरच सर्व भार टाकून आंतरिक प्रेरणांच्या जोरावर विजय मिळवणे हे आता कोणत्याच क्षेत्रात शक्य नाही. कार्लसन याने आनंदवर मिळवलेल्या विजयातून याचा पुन्हा एकदा प्रत्यय यावा. यावर काही युक्तिवाद करतील की कार्लसन यास उपलब्ध असलेल्या साधनसुविधा आनंद यासदेखील उपलब्ध होत्या. हे खरेच. परंतु येथे फरक पडतो तो वयाचा. आनंद आज ४३ वर्षांचा असून कार्लसन वयाने त्याच्या निम्मा आहे. बुद्धिबळास वयाचे काय, असे यावर विचारले जाईल. केवळ बुद्धीचे बळ हाच घटक निर्णायक ठरण्याच्या काळात हा प्रश्न सयुक्तिक ठरला असता. आताच्या काळात नाही. नवे तंत्रज्ञान, विज्ञान आणि नवीन जीवनपद्धती स्वीकारण्याची क्षमता ही चाळिशी ओलांडलेल्यापेक्षा ताज्या करकरीत तरुणात केव्हाही जास्तच असते. कार्लसन याने हे पुन्हा एकदा सिद्ध केले. या संदर्भात लक्षात घ्यावयाची बाब ही की आनंदचा सूर्य जेव्हा पहिल्यांदा बुद्धिबळाच्या पटावर तळपला तो आनंद हा कार्लसन याच्या वयाचा असतानाच आणि या क्षेत्रातील असामान्यत्व गॅरी कास्पारॉव्ह याच्या नावे नोंदले गेले ते गॅरी हा कार्लसन याच्याही पेक्षा काही महिन्यांनी तरुण असताना याकडे कशी डोळेझाक करणार? या शतकातील लढत असा गौरवपूर्ण उल्लेख जिचा केला जातो ती १९५६ सालातील डोनाल्ड बायरन आणि बॉबी फिशर यांच्यातील लढत जेव्हा लढली गेली तेव्हा बॉबी फिशर हा अवघा १३ वर्षांचा होता हे कसे विसरणार? आज आनंद ४३ वर्षांचा आहे आणि गॅरी ५०. खेरीज, या दोघांच्या काळातील खेळापेक्षा अलीकडचे बुद्धिबळ पूर्ण वेगळे असून झटापट, वेगवान, डोळे दिपवणाऱ्या आणि बुद्धीस गांगरून टाकणाऱ्या आनंदच्या पद्धतीपेक्षा थंड डोक्याने, प्रतिस्पध्र्यास चुका करण्यास भाग पाडण्याची शैली अधिक प्रभावी ठरलेली आहे. कार्लसन त्यासाठी ओळखला जातो. त्याच्या या पद्धतीस नेटलसमनेस म्हटले जाते. त्याचा अर्थ स्वत: आक्रमक खेळाच्या भानगडीत न पडता अशा चाली करावयाच्या की प्रतिस्पर्धी चुका करेल. विश्वविजेतेपद गमावल्यानंतर आनंद याने पत्रकार परिषदेत याचा उल्लेख केला आणि आपण नकळतपणे या चुकांच्या गराडय़ात अडकत गेलो हे कबूल केले. कार्लसन यास हे शक्य झाले ते त्याच्या मूळच्या अफाट बुद्धिमत्तेस तंत्रज्ञानाची कास लाभल्यामुळे. अर्थात येथे हेही स्पष्ट करावयास हवे की केवळ उच्च तंत्रज्ञान हेच जगज्जेतेपदासाठी पुरेसे ठरत नाही. तंत्रज्ञान उच्च हवेच. पण त्याहूनही उच्च हवी ती मानवी प्रतिभा. कार्लसन याच्या ठायी ती आहे. तब्बल १० हजार डाव कायमचे साठवून ठेवण्याइतके त्याचे स्मृतिपटल सक्षम असून पटाकडे न पाहता एका वेळी १० जणांशी खेळण्याइतके अष्टावधान त्याने साध्य केले आहे. त्या अर्थाने बुद्धिबळ मोठय़ा प्रमाणावर बदलले असून विश्वनाथन आनंद या क्षेत्रात कालबाहय़ ठरला हे आपण, कितीही दु:खदायक असले तरीही, मान्य करावयास हवे.
जगण्याच्या अन्य क्षेत्रांप्रमाणे बुद्धिबळाचा खेळदेखील मोठय़ा प्रमाणावर बदलला आहे. या खेळास कम्युनिस्ट आणि पाश्चात्त्य जगातील शीतयुद्धाची कायमच पाश्र्वभूमी राहिलेली आहे. येथे व्हिक्टर कोर्चनॉय आणि अनातोली कॉर्पाव्ह यांच्यात तब्बल पाच महिने चाललेल्या लढतीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. १९७४ सालचा हा सामना व्हिक्टर द टेरिबल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोर्चनॉयने जेव्हा गमावला तेव्हा त्यास सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यातील ताणतणावाची पाश्र्वभूमी होती. सोव्हिएत रशियातून पक्षांतर केलेला कोर्चनॉय आणि रशियाचा कॉर्पाव्ह यांच्यातील ही लढत सर्वार्थाने संस्मरणीय होती. हे शीतयुद्ध इतके तप्त होते की कोर्चनॉय याच्या पत्नी आणि मुलास कम्युनिस्ट रशियाने तुरुंगात डांबले आणि कोर्चनॉय याच्यावर आधी नेदरलँड्स आणि नंतर स्वित्र्झलड येथे आसरा घ्यावयाची वेळ आली. त्या लढतीस आणखी एक परिमाण होते. ते असे की त्याच्या आधीच्या लढतीत बोरीस स्पास्की यास हरवून अमेरिकेच्या लुई फिशर याने विश्वविजेतेपद पटकावले होते. म्हणजे फिशर हा बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद मिळवणारा शेवटचा पाश्चात्त्य खेळाडू. त्यानंतर कॉर्पाव्ह, कॉस्पारॉव आदींचे रशियन साम्राज्य या खेळात तयार झाले. त्यास पहिल्यांदा तडा दिला तो आपल्या विश्वनाथन आनंद याने. आनंद याचा विजय पाश्चात्त्यांसाठी महत्त्वाचा होता तो एकाच अर्थाने. त्याच्या विजयामुळे बुद्धिबळावरील रशियन मगरमिठी जवळपास तीन दशकांनंतर पहिल्यांदा सैल झाली. या पाश्र्वभूमीवर कार्लसन आणि आनंद यांच्या लढतीकडे या पाश्चात्त्य जगाचे डोळे होते. त्या जगास आनंदच्या पराजयापेक्षा कार्लसन याच्या विजयात अधिक आनंद होता. याचे कारण जवळपास चार दशके या पाश्चात्त्य जगात बुद्धिबळनायक तयार झाला नसून त्याच्या अभावामुळे या खेळाकडे तेथे दुर्लक्ष होऊ लागले होते. कार्लसन याच्या विजयामुळे बुद्धिबळाच्या पटावर पश्चिमरंग अधिक जोमाने खुलतील.
याच्या बरोबर उलट आपल्याकडे होईल. नायकाच्या शोधात वेळ दवडणाऱ्या आपल्या वेडय़ा समाजात आनंद याचे मावळणे अधिक दु:खदायक ठरेल. बुद्धिबळ हा समूहाचा खेळ नाही. त्यामुळे त्यात जाहिरातबाजी नाही. ती नाही म्हणून मोठय़ा प्रमाणावर पैसा नाही. तो नाही म्हणून राजीव शुक्ल, ललित मोदी आदी गणंगांना त्यात रस नाही. आणि हे सगळे नाही म्हणून या खेळातील विजेत्यास ‘भारतरत्न’ वगैरे मिळण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे तब्बल पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या आणि त्या पदावर सलग सहा वर्षे राहणाऱ्या विश्वनाथन आनंदची किंमत आपणास नव्हती. परंतु त्याच्या या पराभवाच्या डोहातील दु:खतरंगाचे मोल मात्र आपणास आता कळेल आणि छळेल.