आपापल्या खेळातील यशाचे शिखर गाठणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. एखादा खेळाडू अफाट कौशल्याच्या आधारावर अनेक पदके किंवा मानसन्मान तसेच महान खेळाडूचा मान मिळवतो, पण शिखर गाठण्यात मात्र अपयशी ठरतो, तेव्हा ते शल्य त्याला आयुष्यभर बोचत राहते. पोर्तुगालचे महान फुटबॉलपटू युसेबियो डा सिल्व्हा फरेरा यांच्या बाबतीत हेच घडले. व्यावसायिक सामन्यांत ७४५ गोल, ४१ आंतरराष्ट्रीय गोल, १९६५मध्ये जगातील आणि युरोपियन फुटबॉलमधील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार तसेच १९६६च्या ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल झळकावणारा खेळाडू आणि अनेक जेतेपदे मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या युसेबियो यांना आपल्या कारकिर्दीत मात्र पोर्तुगालला विश्वचषक जिंकू न देता आल्याचे दु:ख अखेपर्यंत सलत होते.  
मापुटो येथे १९४२मध्ये गरीब घरात जन्मलेल्या युसेबियो यांनी लहानपणीच मोझाम्बिकमधील फुटबॉल क्षेत्रात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला होता. (मोझाम्बिक १९७५ मध्ये स्वतंत्र देश झाला तोवर पोर्तुगालच्याच ताब्यात होता.) अद्वितीय कौशल्य, वेग, चपळाई आणि गोल करण्याची क्षमता यामुळे युसेबियो यांना स्पोर्टिग लिस्बनच्या सराव चाचणीला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, पण कराराचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आईला सोडून जाण्याचा धोका त्यांनी पत्करला नाही. अखेर बेनफिका संघाने वयाच्या १८व्या वर्षी त्यांना करारबद्ध करून घेतले. पदार्पणाच्याच सामन्यात (१९६१) हॅट्ट्रिक साधून त्यांनी गुणवत्ता दाखवून दिली. पुढे बेनफिका संघाकडून खेळताना युरोपमध्ये ठसा उमटवल्यानंतर त्यांना पोर्तुगालकडून खेळण्याची संधी मिळाली. १९६६च्या फिफा विश्वचषकात वेग आणि उजव्या पायाने जोरकस फटका मारण्याची क्षमता, यामुळे सर्वाचे लक्ष वेधून घेतले व सर्वाधिक नऊ गोल नोंदवून ‘गोल्डन बूट’ पुरस्कारही त्यांनी पटकावला, पण उपांत्य फेरीत पोर्तुगालला इंग्लंडकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आणि युसेबियो यांचे फिफा विश्वचषक पटकावण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. युसेबियो यांनी कारकिर्दीत ब्राझीलचे पेले, अर्जेटिनाचे अल्फ्रेडो डी स्टेफानो आणि इंग्लंडचे बॉबी चार्लटन अशा भल्याभल्यांशी सामना केला. १९६५मध्ये युसेबियो यांच्या कामगिरीवर प्रभावित होऊन रिअल माद्रिदचे महान हंगेरियन फुटबॉलपटू फेरेन्क पुस्कास यांनी आपली जर्सी त्यांना प्रदान केली- ‘ही ज्योत मी तुमच्याकडे समर्पित करीत आहे,’ अशा संदेशासह! त्याच वर्षी युसेबियो यांनी युरोपमधील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला. रविवारी त्यांचे निधन झाल्याने फुटबॉलच्या सुवर्णयुगाचा दुवा निखळला आहे.