‘उघडय़ाकडे नागडे गेले..’ हा अग्रलेख (७ जून) भावनाशून्य झालेल्या विरोधी पक्षांवर काही परिणाम करेल असे वाटत नाही. उद्यानप्रेमाच्या बाबतीतही ‘लोकसत्ता’ने मुंबईतील सत्ताधारी शिवसेनेला उघडे पाडले हे चांगले केले. चर्नी रोड आणि मरिन लाइन्स रेल्वे स्थानकांदरम्यान असणारे स. का. पाटील उद्यान हे खरोखरच एक चांगले उद्यान होते. पण गेली काही वष्रे ते बंद आहे व त्याची कारणे सर्वजण जाणतात. या भागातील मतदार गेली कित्येक वष्रे सेनेबरोबर आहेत. पण सुरुवातीच्या काळातील लोकप्रतिनिधी सोडले, तर गेल्या काही वर्षांतील सेना नगरसेवक व आमदार यांनी काय केले हा जाब विचारण्याची वेळ आली आहे.
उद्धव ठाकरे ‘करून दाखवले, करून दाखवले’ म्हणून नाचत आहेत; पण न केलेल्या गोष्टींची यादी प्रचंड मोठी आहे. खरे म्हणजे इतकी वष्रे सत्ता असलेल्या पक्षाने यापेक्षा कितीतरी जास्त करून दाखवायला हवे होते. साधी मुंबई महापालिकेची सत्ता जर यांना नीट राबवता येत नसेल, तर ते महाराष्ट्राची सत्ता काय कपाळ राबवणार?
– अभय दातार, ऑपेरा हाऊस, मुंबई

आयपीएल खेळ नाहीच.. मग चालूद्या!
‘आज.. कालच्या नजरेतून’ या सतीश कामत यांच्या सदरातील ‘जंटलमन ते माफिया’ हा लेख (८ जून) वाचला आणि क्रिकेटमधील फिक्सिंग या राष्ट्रीय अरिष्टाबद्दल आपणही आपले मत व्यक्त करावे, असे वाटले. क्रिकेट हा प्रामुख्याने पेशन्सचा खेळ आहे. कसोटी क्रिकेटचे दिवस ६-५-४-३ असे काळाबरोबर घसरले आणि एकदिवसीय क्रिकेट ६० षटकांवरून ५० वर आले तरी खेळाचा मूळ स्वभाव बदलला नव्हता. परंतु ट्वेन्टी-२० (वाचा : आयपीएल) मध्ये या मूळ स्वभावालाच उखडून टाकण्यात आले. आयपीएल हे फिक्सिंगसाठीच, पसा कमावण्यासाठीच तयार करण्यात आले, हे अगदी पहिल्या दिवसापासून तमाम क्रिकेटप्रेमींना माहीत आहे. अन् ही इतकी साधी गोष्ट आपल्या प्रसारमाध्यमांना कशी कळत नाही हेच समजत नाही!
ते उगाचच श्रीनिवासन यांच्या मागे लागलेत. मुळात आयपीएल हा खेळच नाही, एक ‘क्रीडाप्रकार’ म्हणून त्यात एकही लक्षण नाही. हे आपल्या सरकारलाही चांगलं माहीत आहे म्हणून गरज वाटली तेव्हा आयपीएलला देशाबाहेर हाकलण्यात तेव्हाच्या आमच्या गृहमंत्र्यांनी काहीही विलंब लावला नाही. दक्षिण आफ्रिकेत आयोजकही खळखळ न करता गेले, कारण मुळातच आयपीएलचे ‘स्टेडियम (तिकीट विक्री) कलेक्शन’ टीव्ही हक्क आणि सट्टा यांच्या तुलनेत कमी आहे.
तेव्हा माध्यमांनीही याबाबतीत उगाच नतिकतेचा आव आणण्याची गरज नाही. क्रिकेटबाबत त्यांची भूमिका कायम दुटप्पीपणाचीच राहिलेली आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयला राष्ट्रीय स्पर्धा आयोगाने (हीदेखील सीसीआय, पण कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) ने क्रिकेटमध्ये एकाधिकारशाही केल्याबद्दल ५० ते ५२ कोटींचा दंड ठोठावला आहे. बहुसंख्य वृत्तपत्रांनी याची एखादी बारीकशी बातमी क्रीडा पानावर छापली आणि तर वृत्तवाहिन्यांनी ‘त्यांच्या टॉप १० न्यूज’ वगैरेमध्ये यासंबंधी ढणढण पाश्र्वसंगीतात एक ‘वाक्य’ वाचून दाखवलं.
यावर उपाय काय? काही लोक म्हणतात की, आयपीएल बंदच करा. या उपायाने नव्याच समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आज फिक्सिंग, बेटिंग होते म्हणून आपण आयपीएल बंद करू, उद्या सिनेमात ‘अंडरवर्ल्ड’चा पसा आहे म्हणून सिनेमे काढण्यावर बंदी घालू, राजकारणात भ्रष्टाचार आहे म्हणून राजकारण ‘फॉलो’ करायचं सोडून देऊ, पण मग या देशातल्या काम नसलेल्या कोटय़वधी आणि जास्त पसा असलेल्या लाखो बेकार बांधवांनी करायचं तरी काय? याहीपेक्षा भीषण प्रश्न म्हणजे असं झाल्यावर मग कराचीत (का अजून कुठे) बसलेल्या त्या दाऊदने आपल्या काळ्या चष्म्यातून टीव्हीवर पाहायचं तरी काय, मोठय़ा प्रमाणावर फोफावलेल्या टी.व्ही. पत्रकारांनी कुणाला आणि कशावर सवाल विचारायचे? म्हणून आयपीएल बंद पडू नये या व्यापक जनहिताच्या कारणास्तव आणि संबंधितांचे या वर्षी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ‘राष्ट्रीय आपत्ती राहत कोशा’तून मदत जारी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.
– अभिषेक अनिल वाघमारे, खंडाळा ( सातारा)

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Navneet Ranas campaign office destroyed due to gusty winds
वादळवारं सुटलं गो… सोसाट्याच्‍या वाऱ्यामुळे नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय जमीनदोस्त

‘आवडती साडेसाती’ संपली; नव्या ‘सव्वासाती’त  सैगलची वेळ हुकली..
आवर्जून ‘रेडिओ सिलोन’ ऐकणाऱ्या हिंदी चित्रपट संगीत- रसिकांचा वर्ग पूर्वी फार मोठा होता, आता इंटरनेट- यूटय़ूब आणि एफएम वगैरेच्या जमान्यात ‘रेडिओ सिलोन’ ( किंवा एसएलबीसी)चे अप्रूप कमी झाले असले तरी अद्यापही कमी प्रमाणात का होईना, लोक रेडिओ सिलोन ऐकतात.. इतकेच नव्हे तर रेडिओ सिलोनवर त्या-त्या दिवशी ऐकलेली गाणी इंटरनेटच्या तंत्रामुळे काही रसिक दररोज ‘यूटय़ूब’वर अपलोड करतात आणि मग बाकीच्यांना हवी तेव्हा ही गाणी ऐकता येतात.. भारतच नव्हे तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ आणि अरब देशांतही ऐकला जाणारा ‘रेडिओ सिलोन’ भारतीय कार्यक्रमांना महत्त्व देत नाही अशी तक्रार नोव्हेबर २०११ मध्ये एसएलबीसीचे उच्चाधिकारी हडसन भारतात आले असता येथील श्रोत्यांनी केली, परंतु भारतीय म्हणून हिंदी कार्यक्रम देण्याऐवजी त्यांनी सकाळी सात ते साडेसात या वेळात तमिळ कार्यक्रम वाढवले! तेव्हापासूनच हिंदी चित्रपटगीत रसिकांना एसएलबीसी पूर्वीसारखे महत्त्व का देत नाही, अशी शंका आली होती. ताज्या बदलाने तर विरसच केला.
अगदी परवापर्यंत- ३१ मे २०१३ पर्यंत सकाळी साडेसात ते आठ या वेळेत जो ‘पुरानी फिल्मोंका संगीत’ कार्यक्रम लागत असे, त्यात समारोपाचे गाणे कुंदनलाल सैगल यांचेच असणार, हा शिरस्ता तब्बल ६३ वर्षे न चुकता सुरू राहिला होता. हा कार्यक्रम साडेसातला सुरू होई म्हणून अनेक रसिकांनी त्याला ‘आवडती साडेसाती’  असे नावही ठेवले होते!
आता मात्र हे बदलले आहे.. १ जून २०१३ पासून मात्र नवे बदल लागू झाले. ‘रेडिओ सिलोन’ आजही आपल्याकडे शॉर्टवेव्ह २५ बँडवरच लागतो, १ जून पासून तर तो अधिक स्पष्टही ऐकू येतो, परंतु आता या एसएलबीसीने एकंदर हिंदी गीतांच्या कार्यक्रमांची वेळ फक्त एक तासावर आणली आहे. याचा परिणाम सकाळच्या कार्यक्रमावर होऊन, ‘साडेसाती’चा कार्यक्रम आता ७.१५ ते ४.४५ असा अर्धाच तास असतो.
हे सारे बदल ठीक, पण ‘पुरानी फिल्मोंका संगीत’ संपताना लागणारे सैगलचे गाणे? त्याचीही वेळ बदलावी? सैगलचे सूर आठ वाजल्याची वर्दी देईनासे झाले आहेत आणि त्याऐवजी पावणेआठलाच आटोपणाऱ्या कार्यक्रमात हे गाणे ७.४० ला लागते. अशाने दिवसाची लय चुकतेच!
भारतीय संगीतरसिकांनी या साऱ्याच बदलांना विरोध करण्यासाठी http://www.slbc.lk  या वेबसाइटवर जाऊन त्यांच्या चेअरमनसह अधिकाऱ्यांवर विनंती-पत्रांचा भडिमार करायला हवा. अशा संघटित विनंतीपत्रांनी तरी काही फरक पडेल!
– प्रवीण चव्हाण, नवीन पनवेल</strong>

मोदी नसले, तर भाजप जिंकेल का?
‘मोदींची षट्पदी’ हा ‘अन्वयार्थ’ (७ जून) भाजपमधील सद्यस्थितीचे नेमके वर्णन करतो. भाजप आणि संघामधील मूखंडांमध्ये ना मोदींचे कर्तृत्व आहे, ना मोदींविरोधांत ठाम उभे राहण्याचे सामथ्र्य. त्यामुळे उरतो तो केवळ मोदींबद्दलचा जळफळाट! परंतु आता जर  या ढुढ्ढाचार्यानी मोदींच्या वाटचालीत खोडा घालण्याचा करंटेपणा असाच चालू ठेवला तर ‘इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा’ या न्यायाने सगळ्या मूर्खासकट भाजपचीही येत्या निवडणुकीच्या यज्ञात आहुती पडेल यात तिळमात्र शंका नाही.
काँग्रेसच्या विरोधात विजयाची शक्यता निर्माण करण्याचे कसब आजतरी फक्त मोदींच्या नेतृत्वात असल्याचे उघड वक्तव्य करून पर्रिकरांसारख्या सुजाण नेत्याने सद्यपरिस्थितीचे अचूक भान दाखवले. एवढेच नव्हे, तर भाजपने पक्षांतर्गत तेढ बाजूला सारून निवडणुकीच्या सारथ्याची धुरा कोणावर सोपवायची त्याचा अधिकृत निर्णय त्वरित घ्यावा, असेही सुचवले. भाजप नेतृत्वाच्या राजकीय परिपक्वतेची कसोटी पाहणारी ही घटका आहे.
– राजीव मुळ्ये, दादर (मुंबई)