दहावीचा ०७ जून २०१३ रोजी जाहीर झालेला निकाल गतवर्षीपेक्षा राज्यभरची टक्केवारी विचारात घेता यंदा दोन टक्के वाढून ८३.४८ टक्के इतका लागला. या उच्चांकी निकालाने शिक्षणक्षेत्रात एक ‘फिलगुड’ तयार झाले आहे. राज्यात दहावीच्या परीक्षेला यंदा प्रथमच बसलेल्या व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ही २ लाख ४७ हजार ७४८ एवढी आहे. म्हणजे यंदाचा ८३.४८ टक्के निकाल हा ‘नियमित परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा’ आहे.
या उलट पुनर्परीक्षार्थी २ लाख ३२ हजार ६१९ विद्यार्थ्यांपैकी ६८ हजार ६४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण फक्त २९.५१ टक्के एवढे आहे. प्रथमच (नियमित) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल ८३.४८ टक्के व पुनपरीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल २९.५१ टक्के आहे. यात ५४ टक्क्यांचा हा फरक शिक्षणक्षेत्रातील संवेदनशील व्यक्तींना विचार करायला लावणारा आहे.
पुनर्परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांचा निकाल हा सातत्याने १५ ते ३० टक्क्यांच्या दरम्यान असतो. तो वाढत का नाही? कारण त्या दहावी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नंतर उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन कोठेही मिळत नाही. पालकही आपला पाल्य उच्च शिक्षणाच्या उंबरठय़ावरच अपयशी ठरला म्हणून त्याला दूषणे देत असतात.
दहावीत तीन किंवा त्यापेक्षा कमी विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला ‘एटीकेटी’ प्रवेश घेण्याची सोय आहे. ज्या उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना अकरावीची तुकडी टिकविण्यासाठी विद्यार्थी संख्या कमी पडते हे महाविद्यालये ‘एटीकेटी’ धारक विद्यार्थ्यांना गोड बोलून अकरावीत प्रवेश देतात. सप्टेंबर महिन्यात ही कनिष्ठ महाविद्यालये शासनाकडून याविद्यार्थी संख्येवर आपली तुकडी व शिक्षक शाबत ठेवत संचमान्यता करून घेतात. पण त्या विद्यार्थ्यांना दहावीत राहिलेले विषय उत्तीर्ण होण्यासाठी त्या कनिष्ठ महाविद्यालयाकडून मार्गदर्शन मिळत नाही.
अकरावीला एटीकेटी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी नंतरच्या ऑक्टोबर व मार्चच्या दहावीच्या पुर्नपरीक्षेत उत्तीर्ण होऊन बारावी प्रवेशासाठी पात्र ठरतात? याची आकडेवारी शासनाकडे शोधूनही सापडत नाही. निरीक्षणानुसार अकरावीत ‘एटीकेटी’ प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी बारावी प्रवेशासाठी १८ ते २० टक्केच विद्यार्थी पात्र ठरतात. हे प्रमाणही त्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची उदासीनता दाखविणारे आहे. दहावीबाबत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्रेय घेण्यासाठी स्वत:हून पुढे येणाऱ्या शाळा मात्र आपल्याच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे टाळतात. शहरातील कोचिंग क्लासच्या बाजारातही अशा विद्यार्थ्यांसाठी क्लास शोधूनही सापडत नाही. ग्रामीण भागात अशी सोय दुर्मीळच आहे.
शासनाने दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी मोफत मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून द्यावी. त्या विद्यार्थ्यांची शाळा किंवा त्याने प्रवेश घेतलेल्या कनिष्ठ महाविद्यालयावर शासनाने तशी सक्ती करावी. नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल उंचावणे हे शाळांना बंधनकारक करावे, असे झाले तर उच्च शिक्षणाच्या उंबरठय़ावरच शिक्षणाच्या प्रवाहातून बाजूला पडणाऱ्या या विद्यार्थ्यांना परत प्रवाहात आणता येऊ शकते.
रुपेश चिं. मोरे,  कन्नड (औरंगाबाद)

न रंगलेली मुलाखत; अनाकलनीय स्वागत!  
सुधीर गाडगीळ यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या सोहळ्याचा वृत्तांत (‘आशाताईंनी घेतली मुलाखतकाराची मुलाखत’-  लोकसत्ता १० जून) वाचला. मी या कार्यक्रमाला हजर होतो. बातमीत म्हटल्याप्रमाणे हा समारंभ अजिबात ‘रंगतदार’ झाला नाही; हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. मुळात आशाताईंनी गाडगीळ यांना विचारलेले प्रश्न बुद्धीला फारसे चालना देणारे नव्हते. तुम्हाला कोणती गायिका आवडते, आवडता राजकीय नेता कोण, हे प्रश्न आशा भोसले आणि शरद पवार तिथे हजर असल्यामुळे गाडगीळ काय उत्तर देतात अशी उत्सुकता निर्माण करणारे असले तरी त्यांनी नेहमीचेच गुळमुळीत धोरण स्वीकारून कुणालाही दुखवायला नको अशी उत्तरे दिली. प्रकार अभिनव असला तरी त्यात जान नव्हती.
 दुसरा खटकणारा मुद्दा म्हणजे गाडगीळ यांनी आपल्या मनोगतात शरद पवार यांचे ‘स्वागत’ केले. खरे म्हणजे गाडगीळ हे पुरस्काराचे मानकरी आणि पवार मुख्य पाहुणे. स्वागत हे कार्यक्रमाचे संयोजक, यजमान करतात. गाडगीळ यांनी स्वागत केल्यामुळे ते पुण्यभूषण फौंडेशन आणि त्रिदल संस्थेचे अजूनही पदाधिकारी आहेत की काय, असे रसिकांना वाटू शकते .
सौमित्र राणे, पुणे</strong>

फाटाफूट हाच सर्वाचा इतिहास..
भाजपमधील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पदांचा राजीनामा दिल्याबरोबर जणू काहीतरी ‘न भूतो ना भविष्यति’ घडल्याप्रमाणे निरनिराळे पक्ष प्रतिक्रिया देत आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासात अनेकदा अशा घटना घडल्या आहेत.
 सगळ्यात जुन्या काँग्रेस पक्षाचाच इतिहास काय दर्शवितो? इंदिराजींना सदोबा पाटील, अतुल्य घोष, फार काय यशवंतराव चव्हाणांसारख्या ज्येष्ठ सदस्यांशी फारकत घ्यावी लागली होती.
 पुढेही आणीबाणीच्या नंतर शरद पवार पुलोदमध्ये गेले. पुन्हा त्यानीं सोनिया गांधी नकोत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सुरुवातीच्या प्रजासमाजवादी पक्षातून संयुक्त समाजवादी निर्माण झाला- त्याच्यातूनच पुढे लोकदल, संयुक्त लोकदल निर्माण झाले. कम्युनिस्ट पक्षाच्याही अनेक चिंध्या झाल्या. शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षातून बाहेर पडलेल्या मातब्बरांचा इतिहास तर ताजाच आहे.
 थोडक्यात फाटाफूट हाच आपल्या राजकीय पक्षांचा इतिहास आहे आणि तेच आपले भवितव्य आहे.
राजीव मुळ्ये, दादर (मुंबई).

भाजपने आता मागे फिरू नये..
‘ययाती आणि देवयानी’ हा अग्रलेख (११ जून) वाचला. पक्षात चाललेल्या घटनांशी असहमती दाखवण्याचे पक्षांतर्गत मार्ग सोडून भाजपचे जेष्ठ नेते अडवाणी यांनी, आपला राजीनामा सार्वजनिकरित्या व मीडियाच्या चच्रेचा विषय व्हावा अशा आततायीपणाने दिला. त्यांच्या राजीनामा पत्रातील सर्वच मुद्दे मोघम असून मी म्हणेन तसे पक्षाने चालावे या एकमेव हट्टीपणाचे हे चिन्ह दिसते. वयाच्या ८४व्या वर्षी जिथे अनेकांना घरचे लोक दाद देत नाहीत तेथे एक राष्ट्रीय पक्ष आपल्याच तालाने चालावा हा त्यांचा अट्टहास अनाठायी आहे.
आपल्याच पक्षातील नेत्यांची कार्यशैली त्यांना खटकत असेल तर फोरम त्यांना उपलब्ध आहे याचा त्यांना विसर पडला असावा. यापूर्वी त्यांच्या विचित्र वागण्याचा जाहीर निषेध उमा भारती यांनी भर बठकीत केला होता. नवीन पिढी पुढे येऊन पक्षाला नवसंजीवनी देत असताना व देशाला काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या घाणीतून भाजपच बाहेर काढू शकेल असे वातावरण निर्माण होत असताना आपल्याच नेत्यांना अपशकुन करायचा यामागे त्यांची सत्तालालसा दिसून येते.
भाजपने आता मागे फिरू नये. त्यांचा राजीनामा मंजूर करून जोमाने कामाला लागावे. एनडीएतील घटक पक्ष बरोबर येतील का याचा विचार निवडणुकीतील यशाने सुटेल; पण असे घरभेदी प्रथम दूर व्हायला हवेत, तरच भाजपला भवितव्य आहे.
पुरुषोत्तम तडवळकर, पुणे

नवी पिढी घडवावी..
रा. स्व. संघाच्या मुशीतून तयार झालेला, राष्ट्रभक्तीने प्रेरित, नि:स्वार्थी, सर्वसमावेशक कर्ता मोहरा आज नवीन पिढीसमोर हतबल होऊन राजीनामा देतो ही गोष्ट कदापिही स्वागतार्ह नव्हे. तरीही अडवाणीजींचे वय पाहता, उत्साह पाहता, कामे करण्याची क्षमता पाहता आता त्यांनी नवीन पिढीला भाजप व रा. स्व. संघाच्या दावणीला बांधून त्यांना राष्ट्रप्रेम, नि:स्वार्थ जनसेवा शिकवावी व उत्तम शिक्षण द्यावे. नव्या पिढीतील तरुणांच्या मन:स्थितीचे आकलन करून घेण्याची कला अडवाणी यांना नक्कीच अवगत आहे.
गोपाल द. संत, पुणे   

तरीही पिशव्या मागायला पुढे!
मुंबईतील रस्त्यांत तुंबलेल्या पाण्याची आणि अडकलेल्या वाहतुकीची वृत्तवाहिन्यांनी सोमवारी दिवसभर पुन:पुन्हा दाखवलेली दृश्ये आणि मंगळवारी वृत्तपत्रातल्या बातम्या यांच्यामुळे पावसाने उडवलेली दाणादाण घरी वा मुंबईबाहेर असलेल्यांनाही चांगलीच कळली. पालिका प्रशासनाच्या कामात काही त्रुटी राहिल्या हे निश्चित. पण आठ वर्षांपूर्वी २६ जुलला माजलेल्या हाहाकारानंतर मुंबईकरही पुरेसा शहाणा झालेला नाही. मिरच्या, कोथिंबिरीच्या दोन काडय़ा आणि एखादे लिंबू एवढय़ासाठी सुद्धा भाजीवाल्याकडून प्लास्टिक पिशवी मागताना माणसे जराही विचार करीत नाहीत. प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी नायलॉनची पिशवी छोटी घडी करून बॅगेत/ पर्समध्ये ठेवावी आणि घरी येताना त्यातून आवश्यक त्या वस्तू आणाव्यात इतकी किमान तत्परता दाखवली तरी परिस्थितीत खूपच फरक पडेल.
– राधा मराठे