आपण महत्त्वाचे आहोत, हे दाखविण्यासाठी किंवा आपले मोठेपण मिरविण्यासाठी सुरक्षेचा ताफा हा मोठेपणाचा ‘दागिना’ ठरू लागला, आणि सुरक्षेचा मोठा ओघ ‘वरच्या थरा’कडे वळू लागला.

समस्या आणि वेदनांचे कढ असह्य़ होत असताना पाठीवर फिरणाऱ्या एखाद्या हाताच्या प्रेमळ स्पर्शातदेखील दु:ख हलके करण्याची ताकद अनुभवता येते, याला ‘भावनिक आधार’ म्हणतात. परंतु भय, भूक, भ्रष्टाचार या समस्या सध्या व्यक्तीपासून समाजापर्यंत सर्वाभोवती घिरटय़ा घालत असल्याने भवतालचे सारे सैरभैर असल्यासारखे झाले आहे. या ‘त्रिदु:खा’च्या घेऱ्यातून सोडविणारी कोणतीच जादूची कांडी कोणाकडेही नाही. अशा वेळी, ‘हेही दिवस जातील’, या आशेचा एकमेव अंकुर फुलविण्यासाठी आणि जिवंत ठेवण्यासाठी जे काही खरेखोटे प्रयत्न आसपास दिसत आहेत, तो या भावनिक आधाराचाच प्रकार मानावा लागेल.
भयमुक्त, भूकमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त भारत हे तर स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षांतच सुरू झालेले एक प्रदीर्घ आणि अनंत असे स्वप्न आहे. अशा परिस्थितीत, निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणाऱ्यांना याच ‘स्वप्नाच्या पूर्तीचे स्वप्न’ दाखविण्याची अहमहमिका आणि भावनिक आधाराच्या अनुभवांची मालिकाही सुरू झाली. हे प्रयत्न बेगडी आहेत की खरेच त्यामागे मायेचा ओलावा आहे, हे पाहण्याचे बळदेखील न उरलेल्या समस्याग्रस्त मनांमध्ये, दिलाशाचा आपला वाटा आपल्या ताटात ओढून घेण्याची स्पर्धाही वाढू लागली.. असे काही होऊ लागले, की दिलाशाच्या खऱ्याखोटय़ा शब्दांच्या किंवा भावनिक आधाराच्या स्पर्धाही तीव्र होतात, आणि स्पर्धेच्या मैदानातील मातब्बरांना महत्त्व प्राप्त होते. ज्याच्या पोतडीतील स्वप्ने सुखाच्या बहुरंगी छटांनी बहरलेली, त्याच्याकडे साऱ्या नजरा एकवटून जातात. मग स्वप्ने घेऊन समस्याग्रस्तांसमोर जाणारा प्रत्येक जण आपापल्या पोतडीतील स्वप्नांना नवनवे रंग देऊन समस्याग्रस्तांना भुलविण्याच्या नाना वाटा शोधू लागतो, आणि सारा समाज स्वप्नांच्या दुनियेत हरवू लागतो.
भय , भूक आणि भ्रष्टाचाराबरोबरच इतरही असंख्य समस्या आणि संकटे समोर ठाकली, तरी त्याची तमा वाटेनाशी होते, आणि स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारा तोच आपला पोशिंदा आहे, असे वाटू लागते. साऱ्या भावनांचे बळ त्याच्या पाठीशी उभे करण्यासाठी जणू मने संमोहित होऊ लागतात. कारण, त्याच्या पोतडीत ‘लाख दुखों की दवा’ आहे, ही भावनाच समस्याग्रस्त मनांना सुखावणारी असते. कधी कधी व्यक्ती, कुटुंब आणि समाजदेखील अशा भावनांच्या आहारी जातो, आणि ‘भावनिक आधारा’तून ‘भावनांचे राजकारण’ कधी सुरू होते, तेच लक्षात येत नाही. ‘सामूहिक भावनां’वर पूर्ण कब्जा मिळविल्याची खात्री झाली, की त्या पोतडय़ांमधून भावनिक आधाराच्या सरी आणखीनच जोमाने कोसळू लागतात.
अलीकडे असे वारंवार अनुभवाला येऊ लागले आहे. असुरक्षिततेच्या भयाण जाणिवांनी भयभीत झालेल्या मनांवर ‘सुरक्षा योजनां’चा निव्वळ भावनिक आधाराचा मारादेखील पुरेसा ठरतो, अशा खात्रीची मुळे भरभक्कमपणे रुजली, तेव्हापासून असंख्य सुरक्षा योजनांच्या केवळ घोषणादेखील अशा मनांवर दिलाशाची फुकाची फुंकर मारू लागल्या. व्यक्तीसुरक्षा, जननी सुरक्षा, बालसुरक्षा, रस्ता सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा, महिला सुरक्षा अशा असंख्य सुरक्षा योजनांचा पाऊस या पोतडय़ांमधून पडू लागला, आणि स्वप्नांच्या सौदागरांचे महत्त्व वाढले. ‘सारा समाज समान आहे, पण काही जण अधिक समान आहेत’, हे वास्तव नकळतपणे स्वीकारले गेले आणि या ‘अधिक समानां’च्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला. त्यांच्या सुरक्षेतच आपली सुरक्षा आश्वस्त होणार आहे, ही भावना रुजविण्याचे बेमालूम प्रयत्न वाढू लागले, आणि ‘व्यक्तिसुरक्षे’च्या नव्या पैलूचा जन्म झाला. सामान्यांचे भय आणि समानतेच्या पातळीवर सामान्यांच्या पातळीपेक्षा उंचावर असलेल्यांचे भय यांतील अंतर वाढू लागले, आणि समानतेच्या वरच्या पातळीवरील समाजाच्या सुरक्षेला साहजिकच महत्त्व प्राप्त झाले. ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’, ही आपल्या इतिहासाची शिकवण आहे. ती वर्तमानापर्यंत पोहोचताना, त्यामागील भावनांचे रंग फिकट होणे साहजिकच होते. त्यागाच्या भावनेपोटी लाखांच्या पोशिंद्याकरिता प्राण देण्याची तयारी असलेल्या लाखांची फौज इतिहासाच्या पानापानावरून वर्तमानापर्यंत पोहोचली, पण वर्तमानकाळाच्या ओघात आता हा प्रवाहदेखील उलटा फिरू लागला आहे. लाखांच्या पोशिंद्याला जगविण्यासाठी लाखांचा बळी गेला तरी चालेल अशी भावना जणू बळावत चालली.. सुरक्षेच्या संकल्पनादेखील बदलू लागल्या. आपण महत्त्वाचे आहोत, हे दाखविण्यासाठी किंवा आपले मोठेपण मिरविण्यासाठी मागेपुढे असणारा सुरक्षेचा ताफा हा मोठेपणाचा ‘दागिना’ ठरू लागला, आणि सामान्यांच्या सुरक्षेचा मोठा ओघ समानतेच्या पातळीवरील ‘वरच्या थरा’कडे वळू लागला. सामान्यांपेक्षा या थरातील समाजाची सुरक्षेची गरज वाढू लागली, आणि त्याची अधिकृत- अनधिकृतही- यादी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वाढू लागली..
या ‘अस्वस्थ वर्तमाना’ला भावनिकतेचेही असंख्य पैलू आहेत.. उत्तर प्रदेशात, सुरक्षेची गरज असलेल्या अधिकृत व्यक्तींच्या पलीकडील सुमारे साडेआठशे व्यक्तींना अनधिकृत सुरक्षेचे कवच बहाल करण्यात आले, आणि त्या सुरक्षा कवचात वावरणाऱ्या पावणेदोनशे व्यक्तींना सरकारी खर्चाने सुरक्षा पुरविण्यात आली. साडेसहाशे व्यक्ती आपल्या पुढेमागे सुरक्षा रक्षकांचा पहारा मिरविण्यासाठी पैसे मोजू लागल्या. त्यासाठी सरकारी तिजोरीतून कोटय़वधींची रक्कम खर्च होऊ लागली, आणि फुकटात हा दागिना मिरविणाऱ्यांची संख्यादेखील वाढू लागली. सुरक्षेचे हे लोण उत्तर प्रदेशापुरते सीमित राहिलेले नाही. स्वत:ला ‘लाखांचे पोशिंदे’ समजणारे अनेक जण अगदी सहजपणे आसपास आढळू लागले आहेत. समानतेच्या खालच्या स्तरातील कुणाच्या पाठीवर फिरणारा आधाराचा हात या पोशिंद्यांचा असल्याने त्यांच्या जिवाचे मोल सामान्यांच्या जिवापेक्षा मोठे आहे, हे वास्तव जणू सामाजिक वर्तमानाने आपल्या गळी बळेबळेच उतरवून घेतले आहे.
सुरक्षेचा हा ‘दागिना’ मिरविण्यासाठी हाती संपत्ती तरी हवी, किंवा सत्ता तरी हवी. ते नसेल, तर बाहुबलाच्या जोरावरही या दागिन्याने मढवून घेता येते. एकदा हा दागिना हाती आला, की समानतेच्या वरच्या स्तरावरील ‘अतिमहत्त्व’ प्राप्त होते, आणि समस्या आणि वेदनांनी विव्हळणाऱ्यांच्या मनावर फुंकर मारण्याचा अधिकारदेखील प्राप्त करून घेता येतो. सुरक्षा व्यवस्था ही व्यक्तीच्या वेगळेपणाची नवी ओळख प्रस्थापित झाली, की भय, भूक आणि भ्रष्टाचारमुक्तीच्या प्रदीर्घ काळापासूनच्या स्वप्नपूर्तीचे स्वप्न विकणाऱ्यांच्या स्पर्धेत सहभागी होण्याची पात्रताही सहजपणे साधता येते.. मग, ज्याच्या पोतडीतील स्वप्नांचे रंग अधिक बहारदार, त्याच्याकडे संमोहित मनांचा ओढा वाढणार हे साहजिकच ठरते.. एकदा या सौदागरांची सुरक्षा सुनिश्चित झाली, की नव्या सुरक्षा योजनांच्या स्वप्नांचा पाऊसदेखील समस्याग्रस्त मनांना पुरेसा ठरू लागतो. भावनिक आधाराची गरज असलेल्यांना यापेक्षा आणखी काय हवे?