बाळंभटाचं श्रीमहाराजांनी कौतुक केलं आणि ‘सौदा’ ठरला. बरेच दिवस चार आण्याचा गांजा बाळंभटाकडे पोहोचविला जाई. तोही ठरल्याप्रमाणे नाम घेई. गोंदवल्यातील त्या वास्तव्यात त्याला महाराजांच्या थोरवीची हळूहळू कल्पना येत होती, पण गांजाची थोरवी काही मनातून ओसरत नव्हती. मग एक दिवस महाराजांनी नेम धरला! बाळंभटाला गांजा पाठवायला ते ‘विसरले’. ठरलेली वेळ टळू लागली तसं बाळंभटाचं मन अस्वस्थ होऊ लागलं. श्रीमहाराजांनाच जाब विचारावा, या विचारानं ते तरातरा मंदिरात आले. महाराज तिथे काही लोकांशी मनुष्यजन्माच्या दुर्लभ संधीबाबत, जीवनातील सुख-दुखाबाबत आणि शाश्वत समाधानाबाबत बोलत होते. महाराजांचे प्रेमानं ओथंबलेले ते शब्द आणि त्यातील आपुलकी यामुळे बाळंभटही आपण कशाला इथे आलो आहोत हे विसरून दंग झाले होते. तोच महाराजांनी त्यांच्याकडे लक्ष गेल्याचं दाखवलं आणि एकदम उठून म्हणाले, ‘‘अरेरे! बाळंभट आज तुमचा गांजा राहिला. काय लोक आहेत पहा, एक काम लक्षात ठेवून करीत नाहीत. असू द्या. आता मीच गांजा घेऊन येतो.’’ एवढं बोलून बाजारातून गांजा आणण्याकरिता एक पिशवी उचलून महाराज निघाले. आपल्यासारख्या क्षुद्र माणसाचं क्षुद्र व्यसन पुरविण्यासाठी साक्षात महाराज निघाले आहेत, हे पाहून बाळंभटाचं हृदय पिळवटलं. तसेच धावत स्फुंदत त्यांनी महाराजांच्या पायाला मिठी घातली आणि म्हणाले, ‘‘महाराज, मला या व्यसनातून सोडवा!’’ बाळंभटाच्या या कथेचा सांधा जुळवून घेत आपण प्रपंच आणि परमार्थ या आपल्या चिंतनाच्या दुसऱ्या आणि प्रदीर्घ टप्प्याकडे वळत आहोत. दुनियेच्या ओढीचा गांजा ओढण्याचं व्यसन जडलेले आपण सर्वच बाळंभट आहोत! श्रीमहाराज आपलं भौतिक सांभाळत असले तरच नाम घेण्यात आपलं मन थोडं तरी लागतं. भौतिकात काही कमीजास्त झालं तर मग नामही मनासारखं होत नाही! तेव्हा आपण खरंतर नामासाठी किंवा महाराजांसाठी जगत नाही. आपण दुनियेच्या ओढीसाठीच जगू पाहातो. त्या ओढीत खंड पडू नये, विघ्न येऊ नये म्हणून नामाचा आणि महाराजांचा आधार आपल्याला हवा असतो. बाळंभटामध्ये पालट घडविण्यासाठी प्रथम त्याला गांजा पुरविण्याची हमी द्यावी लागली. मगच तो नाम घेत गेला. सहवासानं महाराजांची थोरवी आणि व्यसनाची हीनता त्याला उमगली. तेव्हा प्रथम ज्याला गांजाचंच व्यसन आहे त्याला ‘तू गांजा सोडलास तरच मी काय ते सांगेन’, हे सांगून उपयोग नसतो. ‘तुझा गांजा मी पुरवीन, माझ्या सांगण्याप्रमाणे तूही वाग,’ ही योजनाच गुंतवणूकदाराला आकर्षित करते. अगदी त्याचप्रमाणे भौतिकाच्या, प्रपंचाच्या ओढीच्या गांजाचं अनंत जन्मं व्यसन जडलेल्या आम्हाला महाराज सांगतात, प्रपंचही करा पण परमार्थही करा. इतकंच नव्हे तर ‘‘ज्याला प्रपंच नाही करता आला। त्याचा परमार्थ ढिला पडला।।’’ असंही ते सांगतात तेव्हा आम्ही मनातून सुखावतो आणि मग श्रीमहाराजांना काय सांगायचं आहे, ते थोडं थोडं ऐकू लागतो! आपल्या चिंतनाचा दुसरा टप्पा इथेच सुरू होत आहे.