विजय प्र. दिवाण diwan.sarvodaya@gmail.com

विनोबा भावे यांनी स्थापलेल्या ‘सर्वोदय समाजा’ने सोमवारी, १४  मार्च रोजी  ७५ व्या वर्षांत पदार्पण केले. त्या निमित्ताने, सर्वोदयाचा विचार संस्थेपलीकडला कसा आणि तो जिवंत कसा राहील, याचे हे स्मरण..

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, गांधीजींच्या इच्छेनुसार सेवाग्राम येथे रचनात्मक व विधायक कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्याचे ठरले. २ फेब्रुवारी १९४८ रोजी गांधीजी दिल्लीहून बैठकीसाठी निघणार होते; पण ३० जानेवारीला त्यांची हत्या झाली. बदलत्या परिस्थितीत अशा बैठकीची आवश्यकता अधिक तीव्रतेने भासू लागल्याने, १३ ते १५ मार्च १९४८ रोजी सेवाग्राम येथे विधायक कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. संमेलनास विनोबा, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी, जयप्रकाश नारायण, शंकरराव देव इत्यादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते.

देशाच्या बिकट परिस्थितीत एक विनोबाच मार्गदर्शन करू शकतील असा विश्वास असल्याने उपस्थितांच्या अपेक्षा व नजरा विनोबांवर खिळल्या होत्या. संमेलनात गांधी-विचार मानणाऱ्यांचे संघटन करण्याचे ठरले. विनोबांनी ‘सर्वोदय समाज’ हे नाव निश्चित केले गेले.

गांधीजींना जाऊन दीड महिनाही झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर हे संमेलन होत होते. ज्या विचारसरणीने गांधीजींचा खून केला, त्याचा उल्लेख होणे स्वाभाविकच होते. विनोबा आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘आर.एस.एस. संघटना अगदी फॅसिस्ट पद्धतीची आहे. असत्य हे त्यांचे टेक्निक आणि त्यांच्या फिलॉसॉफीचा भाग आहे. आर.एस.एस. जमात फक्त दंगाधोपा करणारी, उपद्रववाद्यांची जमात नाही, तर ती फॅसिस्ट फिलॉसॉफरांची जमात आहे.’’

पंडित नेहरूही आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘स्वातंत्र्याला धोका बाहेरून नसून आतून आहे. हिंसेचे वारे असेच चालू राहिले तर राष्ट्र छिन्नभिन्न होईल. विनोबांप्रमाणे मीदेखील हेच मानतो की, आमच्या साध्याप्रमाणे साधनही शुद्ध असले पाहिजे.’’

विनोबांना संघटना उभी करायची नव्हती. संघटना म्हटली की त्यात सुसूत्र नियोजन असते. नियोजनात अंमलबजावणी आली. अंमलबजावणीत नियंत्रण व नियंत्रणात सत्ता येतेच. सत्तेतून असत्य आणि हिंसेला चंचुप्रवेश मिळतो. विनोबांना हिंसा आणि असत्याचा थोडाही शिरकाव नको होता व म्हणूनच विनोबांनी अिहसक समाजरचनेसाठी बंदिस्त संघटनेऐवजी मोकळय़ा ‘सर्वोदय समाजा’ची स्थापना केली.

विनोबांनी सर्वोदय समाजाचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की, ‘‘सर्वोदय समाज हा सह-विचाराचे, सह-चिंतनाचे, तत्त्व-संकीर्तनाचे आणि नामजपाचे साधन व्हावे. जो विचार साऱ्या विश्वात पसरायचा असतो तो सदेह असत नाही, विदेहच असतो. म्हणून सर्वोदय विचारासाठी आम्ही देह (संघटन) बनवीत नाही तर विश्वव्यापी ज्ञान-प्रचारासाठी एक विदेही रचना करीत आहोत.’’

विनोबांचा सर्व भर अिहसा, सत्य व साधनशुद्धीवर होता. विनोबांसाठी ‘सर्वोदय’ हा मंत्र आहे. त्यांनी लिहिले, ‘जेथे एक मंत्र संपतो तेथे परमेश्वर दुसरा मंत्र देतो आणि मग समाजाचे कार्य सुरू राहते. अशा प्रकारे मंत्राचा अवतार होतो. मंत्रांचा अवतार हाच वास्तविक अवतार आहे. ‘स्वराज्य’ या मंत्राची पूर्तता होताच गांधीजींनी दुसरा मंत्र दिला, तो मंत्र आहे ‘सर्वोदय’! गांधीजींनी आम्हाला जो ‘सर्वोदय’ मंत्र दिला आहे त्याची पूर्ती आपल्याला करावयाची आहे.’

राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनीही पुढे लिहिले, ‘सर्वोदय समाज संघटनेच्या रूपात काम करणार नाही, ना त्याचा काही निश्चित कार्यक्रम राहील. तरीदेखील त्याला मानणारे कुठे ना कुठे रचनात्मक कार्य करीत राहतील; परंतु कोणीही कार्यकर्ता सर्वोदय समाजातर्फे व सर्वोदय समाजाच्या नावाने कार्य करणार नाही.’

सर्वोदय समाजाची रचना ‘विदेही’ असल्याने, त्यात सदस्यत्वाच्या अटी, सदस्यत्वाचा अर्ज इ. नाही. ज्याला सर्वोदयाचा विचार पटला आणि त्या विचाराने चालण्याचा जो प्रयत्न करू इच्छितो, तो सर्वोदय समाजाचा सदस्य आहे हे गृहीत धरले गेले. सर्वोदय समाजाचे कार्यालय असेल व अस्थायी ‘सर्वोदय समाज समिती’ स्थापन करून त्याद्वारे दरवर्षी संमेलन आयोजित केले जाईल असे ठरले. इतका पारिवारिक पद्धतीचा ‘सर्वोदय समाज’ स्थापन केला गेला.

सर्वोदय विचारांचा पाया एकादश-व्रत आहे. शासनमुक्त, शोषणरहित, वर्गविहीन, अिहसक समाजरचना हे सर्वोदयाचे अंतिम ध्येय आहे. सर्वाच्या उदयात माझा उदय आहे. माझे व समाजाचे हित एक आहे. कोणाही व्यक्तीचे वा समाजाचे हित दुसऱ्या व्यक्ती व समाजाच्या खऱ्या हिताच्या विरोधात असू शकत नाही. असा अत्यंत उदात्त विचार सर्वोदयाच्या मुळाशी आहे. ‘सर्वोदय’ शब्दाचा अर्थ ‘अंत्योदय’ शब्दापेक्षा व्यापक आहे. अंत्योदय शब्दात इतर सगळय़ांचा उदय झाला आहे असे सूचित होते. वास्तविकता तशी नाही. श्रीमंतांचे पतन झाले आहे. हे पतन नैतिक आणि आध्यात्मिक आहे. धनिकांचे अतिरिक्त धन शोषण अर्थात असत्य आणि हिंसेने मिळविलेले आहे. श्रीमंतांचे पतन झाले आहे आणि गरिबांचे उत्थान कधीही झालेले नाही. म्हणून श्रीमंत आणि गरिबांचा उद्धार व उदय आवश्यक आहे.

सर्वोदय समाजाची स्थापना होताच पंडित नेहरू यांच्या सांगण्यावरून विनोबांनी दिल्ली, बिकानेर, पंजाब, हैदराबादला येथे निर्वासितांमध्ये काम केले. आता विनोबांच्या पायाला िभगरी लागली होती. सर्वोदयच्या स्थापनेनंतर विनोबा सर्वोदय-विचार सांगत भारतभर फिरत होते. १९५१ नंतर तर त्यांची १३ वर्षे भूदान पदयात्रा चालली. या काळात विनोबांनी कार्यकर्त्यांना अनेक कृती कार्यक्रम दिले. भूदान, ग्रामदान, शांतिसेना, आचार्यकुल, लोकनीती, सर्वोदयपात्र इत्यादी उपक्रमांद्वारे तसेच चार आश्रम स्थापन करून त्यांनी सर्वोदय विचार मूर्त स्वरूपात आणला. यामुळे हजारो कार्यकर्त्यांनी सर्वोदयाला जीवनदान दिले. अनेक कार्यकर्त्यांनी वेगवेगळय़ा संस्था स्थापन केल्या व सर्वोदय विचार अधिकाधिक समाजाभिमुख केला.

विनोबांच्या सर्व कार्यात पंडित नेहरूंचे सहकार्य मिळत राहिले. नेहरू व विनोबांचे विचार एकमेकास परस्परपूरक होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच जवाहरलाल नेहरू यांनी बहुपक्षीय लोकशाही, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, संमिश्र अर्थव्यवस्था व अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण या पायावर नव्याने काँग्रेसची उभारणी केली; तर सर्वोदयाने प्रत्यक्ष राजकारणात सहभागी न होता, पक्षातीत राहून सेवेद्वारे अिहसक समाजरचनेचे कार्य हाती घेतले. विनोबा व पंडित नेहरू या दोघांचे एकमेकांच्या सहकार्याने राष्ट्रबांधणी करण्याचे परस्परपूरक धोरण होते. नेहरूंच्या नंतर हे धोरण इंदिराजींनीही पुढे सुरू ठेवले. मात्र १९७७ नंतर आणीबाणीच्या प्रश्नावरून सर्वोदय व काँग्रेस यांच्यातील अंतर वाढू लागले.

सर्वोदय समाजाच्या स्थापनेच्या वेळीच गांधी-विचाराने कार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे एकीकरण करून ‘सर्व सेवा संघ’ या संस्थेची निर्मिती करण्यात आली होती. संमेलनासाठी तात्पुरती ‘सर्वोदय समाज समिती’ स्थापन करून त्यातर्फे सर्वोदय संमेलन आयोजित करण्यात येत असे. मात्र काही वर्षांनंतरच ‘सर्व सेवा संघ’ या संस्थेने, सर्वोदय समाज समिती अनधिकृत विसर्जित करून सर्वोदय समाजाच्या संमेलनाची जबाबदारी घेतली. त्या वेळी श्रीमन्ननारायण यांनी प्रखर विरोधही केला; पण या विरोधाला न जुमानता सर्व सेवा संघाचे नेतेच सर्वोदय समाजाचे अध्यक्ष नियुक्त करू लागले. व त्यांनी सर्वोदय समाजाची स्वायत्तता काढून घेऊन सर्वोदय समाजाला नामधारी केले व सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली.

सर्व सेवा संघाची हीच नेतेमंडळी पुढे १९७७ साली, आणीबाणीच्या काळात विनोबांच्या विचारापासून फारकत घेत जयप्रकाशजींच्या आंदोलनात उतरली. त्याबरोबर विनोबांनी, ११ सप्टेंबर १९७५ पासून सर्व सेवा संघाला देत असलेले आपले उपवासदान देणे बंद केले व सर्व सेवा संघाचा नैतिक पािठबा काढून घेतला.

आणीबाणीच्या काळात जेलमध्ये आर.एस.एस.च्या संपर्कात आल्याने सर्व सेवा संघाची ही मंडळी आर.एस.एस.च्या प्रभावाखाली आली. पुढे तर ठाकुरदास बंग, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, आचार्य राममूर्ती, आर. के. पाटील, देवेंद्र गुप्ता इ. सर्वोदयाची नेतेमंडळी नागपूरला आर.एस.एस.च्या कार्यालयात बाळासाहेब देवरस, मा. गो. वैद्य यांना भेटली. या बैठकीत सर्वोदय व आर.एस.एस. यांनी एकत्र काम करण्याचे व त्यासाठी १७ मार्च १९७९ रोजी सेवाग्राम येथे संयुक्त बैठक घेण्याचेही ठरले; पण काही कारणाने ही बैठक होऊ शकली नाही.

याच नेतेमंडळींच्या पठडीत तयार झालेल्या व ‘आर.एस.एस. जर फॅसिस्ट असेल तर मीही फॅसिस्ट आहे,’ असे म्हणणाऱ्या जयप्रकाशजींच्या संपूर्ण क्रांतीच्या विचाराने प्रभावित असलेल्यांच्या हातात आज ‘सर्व सेवा संघ’ व सेवाग्राम आश्रमही आहे. सर्वोदय समाजाच्या स्थापनेच्या वेळी विनोबांनी ‘आर.एस.एस. ही फॅसिस्ट फिलॉसॉफरांची जमात आहे’ असा इशारा दिला असतानाही, कार्यकर्त्यांचा विरोध असूनही, हे सर्वोदयी नेते बिनदिक्कत, आर.एस.एस.च्या दसरा मेळाव्यात रेशीमबागमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून गेले, शिवसेनेच्या पदयात्रेत सहभागी झाले, संस्थेची जागा आर.एस.एस.च्या भागवतांच्या शिबिराला दिली गेली. मोदी सरकारच्या कमिटीवर ही मंडळी पदाधिकारीही झाली. आज सर्व सेवा संघातही आपसात भांडणे सुरू असून दोन गट दोन गटांची भांडणे थेट उच्च न्यायालयापर्यंत गेली आहेत.

तथाकथित सर्वोदयी नेते जरी मार्गभ्रष्ट व तत्त्वच्युत झाले असले तरी असंख्य कार्यकर्ते सर्व सेवा संघापासून अलिप्त राहून विनोबांच्या विचारानुसार सर्वोदयाचे कार्य करीत आहेत. नई तालीम विचारानुसार शाळा, जातिअंतासाठी स्वच्छता व मृत गुरांचे शवच्छेदन, नशाबंदी, वाचनालये, आचार्यकुल, खादीनिर्मिती, आश्रम इ.द्वारे कार्यकर्ते कार्यरत आहेत. खरा ‘सर्वोदय समाज’ अशाच विनोबांच्या कार्यकर्त्यांमुळे आज टिकून आहे व सर्वोदय समाज आपला अमृत महोत्सव साजरा करीत शताब्दीकडे वाटचाल करीत आहे. लेखक ‘सर्वोदया’चे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत.