गीताचे तालातील मात्रांशी संधान बांधत केलेले गायन म्हणजे ‘डागरबानी’. ही शैली डागर यांनी जगभर लोकप्रिय झाली. त्यांनी त्या शैलीतील सूत्र अतिशय कलात्मकतेने मांडण्याचा प्रयत्न केला.
जगातल्या अनेक दीर्घ परंपरा असणाऱ्या संस्कृतींमध्ये संगीताचे स्थान कायमच अनन्यसाधारण राहिले आहे. स्वरांचा साक्षात्कार हा संस्कृतीचा पहिलावहिला श्वास होता. माणसाला जग समजून घेताना आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा जो शोध लागत होता, त्यातूनच संस्कृती तयार होत होती. शब्दांच्या शोधापूर्वी माणसाला जेव्हा आवाजाचा पोत समजू लागला आणि स्वरांची जाणीव होऊ लागली, तेव्हा संगीताच्या स्थापनेलाच प्रारंभ होत होता. हे नेमके कधी झाले, कसे झाले, कुणी केले, या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरितच राहणार यात शंका नाही. परंतु अशा एका दीर्घ परंपरेचे पाईक असण्याचे भाग्य आपल्या वाटय़ाला आले आहे, याबद्दल तरी भारतात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात समाधानाची भावना असायला हवी. नारदमुनींची एकतारी कशी होती आणि कृष्णाच्या बासरीतून किती स्वर निघू शकत होते आणि ते कोणते स्वर होते, याची अधिकृत माहिती मिळणे जसे दुरापास्त आहे, तसेच संगीतनिर्माणाच्या प्रक्रियेत प्रबंध आणि नंतरच्या धृपद या गायनशैलीतील प्रगल्भ अवस्थेतील रूपाची माहिती मिळणे अवघड आहे. या शैलीचे निष्ठावान पाईक असलेले उस्ताद फरिदुद्दीन डागर यांनी भारतीय संगीत परंपरेतील धृपदाचे अंग जाणीवपूर्वक जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला. ही गायकी टिकून राहण्यासाठी अतिशय कष्ट घेतले. त्यांचे याच आठवडय़ात झालेले निधन भारतीय संगीत रसिकांना चटका लावून जाणारे आहे.
गायन हा माणसाच्या मनातल्या अमूर्त भावनांचा आविष्कार होता. अमूर्तता हेच स्वरांचे लक्षण होते, त्या काळात त्या स्वरांच्या आकारांमधून काही सांगण्याचा, व्यक्त करण्याचा प्रयत्न माणसाने केला. त्या प्रयत्नांतून भारतीय उपखंडातील कलावंतांनी जाणीवपूर्वक आणि अभ्यासाने प्रबंध गायकी निर्माण केली. स्वरांची स्थाने पक्की करताना, त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध जोडत स्वरांची आकृती तयार करण्याची कलात्मकता त्या वेळच्या कलावंतांनी आत्मसात केली होती. प्रबंध गायकीच्या आविष्कारपद्धतीबाबत पुरेशी स्पष्टता येईल, अशी माहिती उपलब्ध होणारी साधने आपल्यापाशी नाहीत. मात्र, ग्वाल्हेरचा राजा मान याच्या काळात, पंधराव्या शतकात धृपद गानपद्धतीचा उगम झाला, असे मानण्यात येते. हरिदासस्वामी या त्या काळातील ख्यातनाम कलावंताकडून तानसेन याने धृपदगायनाचे धडे घेतले. भारतीय संगीतात तानसेन हा मैलाचा दगड ठरला, कारण त्याने ही गायकी लोकप्रिय केली आणि तिला अभिजातता प्राप्त करून दिली. धृपदियांच्या गानशैली विकसित होत असताना गौडारी, खंडारी, डागुरी आणि नोहारी अशा चार गायकींच्या ‘बानी’ प्रसिद्ध पावल्या. त्यातली डागुरी शैली मोहिउद्दीन आणि फरिदुद्दीन या डागर घराण्यातील बंधूंनी जिवंत ठेवण्यात यश मिळवले. गीताचे तालातील मात्रांशी संधान बांधत केलेले गायन म्हणजे ही शैली, असे म्हटले जाते. डागरबंधूंची ‘डागरबानी’ ही जगभर लोकप्रिय झाली, कारण त्यांनी त्या शैलीतील सूत्र अतिशय कलात्मकतेने मांडण्याचा प्रयत्न केला. फरिदुद्दीन डागर यांनी गायनास सुरुवात केली तेव्हा राजेशाही संपली होती आणि लोकशाहीची पहाट होत होती. वडील उस्ताद झियाउद्दीन डागर हे उदयपूरच्या राजदरबारातील गायक होते आणि त्यांनीच फरिदुद्दीन यांना गायन आणि वीणावादनाचे धडे दिले. वडीलबंधू मोहिउद्दीन यांनीही त्यांना संगीताचे शिक्षण दिले. डागर घराण्यातील विसाव्या पिढीचे प्रतिनिधी असलेल्या या दोन्ही बंधूंनी धृपदाची ही शैली जपण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले.
संगीतात काळानुरूप होणाऱ्या बदलांमुळे धृपद गायकीला पर्याय उभा राहणे स्वाभाविक होते. ख्याल गायकीचा आरंभ होत असताना धृपदातील मूळ सोडू न देता, अधिक खुमासदारीने गायन सादर करण्याची ही कला लोकप्रिय होण्यास अवधी लागला. ख्याल गायकीत आजही ज्यांच्या बंदिशी आवर्जून गायल्या जातात ते सदारंग आणि अदारंग हे उत्तम धृपदिये होते. त्यांच्या बंदिशी त्यांचे शिष्य गात असत. ते स्वत: मात्र धृपदच गात असत, अशी नोंद सापडते. ख्याल गायकी लोकप्रिय होऊ लागल्यानंतर धृपद शैली मागे पडणे स्वाभाविक होते. सुमारे तीनशे वर्षे भारतात या शैलीने आपले अधिराज्य गाजवले. या काळात धृपद आणि ख्याल गायकीत शब्दांचे महत्त्व बदलले. धृपदातील कवने आणि ख्यालातील बंदिशी यामध्ये सांगीतिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचे बदल झाले. तालाशी होणारे खेळ कमी झाले आणि शब्दांच्या बरोबरीने होणाऱ्या खेळात स्वरांचे प्राबल्य वाढले. केवळ स्वरांच्या आधारे कलाकृती निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा पुढचा भाग म्हणजे शब्दांचे स्वरांना चिकटणे होते. शब्द आणि स्वर यांचा हा शुभसंकर अनेक अर्थानी फार महत्त्वाचा ठरला, कारण त्यानंतरचा सारा काळ आपण स्वर आणि शब्द यांच्या मिश्रणातच गुंतून राहिलो. या विश्वाच्या निर्मितीचे गूढ न उकललेल्या कलावंताला हे जग निर्माण करणारा कुणी जगन्नियंता आहे, अशी खात्री वाटत राहिल्याने त्याची पूजा बांधण्यानेच आपले जगणे सुखकर होईल, असा विश्वास त्या काळातील माणसाला वाटत असला पाहिजे. धृपदातील कवने आणि त्यांची स्वरातील मांडणी यामध्ये एक निश्चित असा विचार होता. प्रत्येक स्वराचा अन्य स्वराशी असलेला संबंध शोधण्याच्या या प्रक्रियेत कलाकाराने एक सुस्पष्ट असा आकृतिबंध निर्माण केला. त्याचे कायदे आणि नियम केले आणि त्याला सौंदर्याचे कोंदणही दिले.
जगभर धृपदाचा प्रसार करणाऱ्या उस्ताद फरिदुद्दीन डागर यांनी ऑस्ट्रियामध्ये राहून ते काम केले. नंतर मध्य प्रदेशातील भोपाळ येथे ‘भारत भवन’ ही सांस्कृतिक संस्था उभी राहिल्यानंतर ते तेथे गुरू म्हणून रुजू झाले. आपली शिष्यपरंपरा निर्माण करण्यात फरिदुद्दीन यांचे भोपाळमधील पंचवीस वर्षांचे वास्तव्य खूपच उपयोगी ठरले. धृपद शैलीचे भारतात पुनरुत्थान करण्यात त्यांचा वाटा खरोखरीच मोलाचा होता. संगीताच्या या दीर्घ परंपरेत धृपद परंपरेला असलेले महत्त्व गेल्या काही दशकांमध्ये नाहीसे होत चालले असून ते आता संग्रहालयात दाखल होण्याच्या वाटेवर आहे. संगीताच्या बाबतीत असलेली एक मोठी अडचण अशी की ते वस्तुरूप नाही. ते दृश्यरूपही नाही. ते नेणिवेच्याच पातळीवर आहे. ते मनाला केवळ आनंद देत नाही, तर त्याला नवनिर्मितीसाठी उद्युक्तही करते. अशारीर अशा अपूर्व आनंदासाठी भारतीय परंपरेत केवळ संगीतालाच स्थान आहे. ते स्थान भारतीय उपखंडावर काहीशे वर्षे राज्य केलेल्या मुस्लीम संस्कृतीतही तसेच अबाधित राहिले. त्यामुळेच तर धृपदाची ही परंपरा खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचे श्रेय डागर घराण्याला जाते. डागर घराण्याने गेली पाच शतके या संगीतपरंपरेला स्वत:शी इतके घट्ट बांधून घेतले की त्यानंतरच्या काळात अभिजात संगीतात झालेल्या स्थित्यंतराचा त्यांच्यावर कोणताच परिणाम झाला नाही. दीर्घकाळ, संथ लयीत, प्रत्येक स्वराशी लडिवाळपणे खेळत, प्रत्येक शब्दाशी फुगडी खेळत संगीताची निर्मिती करणाऱ्या डागर घराण्याने एके काळी भारतीय संगीतावरच राज्य केले होते, हे विसरता येणार नाही.  फरिदुद्दीन डागर यांनी हेच कार्य पुढे सुरू ठेवले. त्यांच्या निधनाने धृपद परंपरेतील एक तेजस्वी तारा निखळून पडला आहे.