गाडी वेगानं पळत होती. दिवस गर्दीचे नव्हते. त्यात हा वातानुकूलित डबा. त्यामुळे चौघा मित्रांचा गट सुखावलाच होता. चौघांची परिस्थिती, जडणघडण, वृत्ती, स्वभाव तसे भिन्न भिन्न, पण मैत्र पक्कं होतं. चौघांनी ठरवलं होतं, नेहमीच्या धबडग्यातून पंधरा-वीस दिवस स्वत:साठी काढायचे. सुदूर प्रांतात तीर्थयात्रेला जायचं. ही यात्राही होती वेगळीच. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची आवड चौघांनाही होतीच, पण साधनमार्गाबद्दल मतभिन्नता होती. अर्थात दुसऱ्याच्या मताचाही आदर करायचा आणि अनाग्रही पण ज्ञानसंग्राही वृत्तीने  संवाद साधायचा, यावर चौघांचे एकमत असल्यामुळे मतं जुळोत न जुळोत, चौघांची मने जुळत होती. या यात्रेच्या आखणीतही त्याचंच प्रतिबिंब पडलं होतं. प्रवासात आणि यात्रेच्या ठिकाणी आपापल्या परीनं आणि पद्धतीनं उपासना करायची, मौनाचा अभ्यास करायचा, एकत्रित चिंतन व चर्चा करायची. मन आणि बुद्धीला या खाद्यानं पुष्ट करायचं, असं चौघांनी ठरवलं होतं. त्यामुळे या यात्रेला निश्चित अशी दिशा होती. गाडीनंही जणू त्या दिशेशी सांधा जुळवत रूळ बदलले. बाहेरचं मनोहारी दृश्य गडद काचेतून पाहात योगेंद्राची नजर डब्यात वळली. ज्ञानेंद्र, कर्मेद्र आणि हृदयेंद्र या आपल्या तीन मित्रांकडे त्यानं एक कटाक्ष टाकला. अलगद गप्पा सुरू झाल्या..
योगेंद्र – आपली सामूहिक चिंतनाची कल्पना मला फार आवडली. पण त्या चिंतनाला काही निश्चित आधार हवा ना? काही सूत्र हवं..
ज्ञानेंद्र – सूत्र असलं पाहिजे हे ठीक, पण आपण बरोबर ग्रंथ तरी कुठे घेतलेत? एखादा ग्रंथ असता तर थोडं थोडं वाचून चर्चा करणं सोपं झालं असतं.
कर्मेद्र – ग्रंथाचं ओझं हवं कशाला? माझ्याकडे लॅपटॉप आहे. हवे तेवढे ग्रंथ इंटरनेटवरून ऑनलाइन वाचता येतील.
योगेंद्र – अरे हो की! पण असं करू, भारंभार शब्द वाचून काय उपयोग? मोठा विस्तव करायला एक ठिणगी पुरी पडते. तसा चिंतनासाठीचा आधार ठिणगीएवढा पुरेल, त्यातून चिंतनाचा वणवा भडकेल.
हृदयेंद्र – आणि तो मनातल्या शंका-कुशंका, तर्क जाळून टाकेल!
ज्ञानेंद्र – किंवा अधिकच वाढवेलसुद्धा!
कर्मेद्र – पण ‘शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट’ असं काय आहे?
ज्ञानेंद्र – ‘स्वीट’ नको म्हणूस कारण सत्य ‘स्वीट’ असतंच असं नाही. शॉर्ट बट ग्रेट म्हण..
हृदयेंद्र – मी सुचवू का? आपण अभंग वाचू. थोडक्या शब्दांत किती ज्ञान भरलं असतं त्यात.
कर्मेद्र – कल्पना छान आहे, पण आपल्याला भासेल तोच अर्थ खरा असेल का? काहीजण उपहासानं म्हणतात की ज्ञानोबा, तुकोबांनी आपल्या अभंगाचा काय काय अर्थ लोक लावतात हे पाहिलं तर त्यांनाही आश्चर्य वाटेल..
हृदयेंद्र – काही का अर्थ निघेना.. चिंतन तर त्यांचंच होईल. आणि हा अर्थ आपल्यापुरता आहे. जगाला कोण सांगायला जाताय.
कर्मेद्र – ठीक. मग अभंग या शब्दापासूनच सुरुवात करू.
ज्ञानेंद्र – अरे सर्वानाच माहीत आहे, अभंग म्हणजे कधीही न भंगणारं.
हृदयेंद्र – संतांनी अभंगातून आपल्या आत्मिक धाराप्रवाहालाच वाट मोकळी करून दिली आहे. त्यात मनसोक्त डुंबू या.
कर्मेद्र – पण कोणता अभंग घेऊया?
योगेंद्र – अरे काल मोबाइलवर आपण ऐकला ना? तोच अभंग घेऊ..
ज्ञानेंद्र – एक लक्षात ठेवा. अभंगाचं गाणं होतं ना तेव्हा त्यात किंचित बदलही केला जातो. त्यामुळे आधी मूळ अभंग वाचू, मग हवंतर गाणं ऐकू.
हृदयेंद्र – हो बरोबर! पण योगा काल कोणता अभंग ऐकत होतास?
कर्मेद्र – ओ! तो.. पैल तो गे काऊ कोकताहे!! थांब लॅपटॉप सुरू करतो आणि मूळ अभंग शोधतो.. तोवर थोडा धीर धरा..
चौघांच्या नजरा लॅपटॉपवर खिळल्या. थोडी शोधाशोध केल्यावर अभंग गवसला. समाधानानं कर्मेद्रनं निश्चिंत सुस्कारा टाकला.
कर्मेद्र – ग्रेट! मिळाला ‘पैल तो गे काऊ’! आता वाचून दाखवतो हं..
योगेंद्र – नको! तुझं वाचणं म्हणजे संगणकीय निर्विकार उद्घोषणा. त्यापेक्षा हृदयेंद्रला वाचू दे.
कर्मेद्र – ठीक आहे.. एवढं जुनं मराठी मला तरी वाचता येईल का? शंकाच आहे. हृदु तूच वाच.अभंगावर थोडा वेळ नजर टाकत हृदयेंद्र म्हणाला, गाणं आणि मूळ अभंग यात किंचित फरक आहे. या वाक्यानं तिघांचे कान अधिकच सजग झाले!