अनंत जन्मांच्या चक्रातून मनुष्य देहात जीव जन्मतो तेव्हा त्याच्या खांद्यावर अनंत अपूर्त इच्छा-वासनांच्या आणि अनंत प्रारब्ध कर्माच्या पोतडय़ा असतात. या जन्मात ते भोग आणि त्या इच्छा संपत नाहीतच, उलट त्या पोतडय़ांत नवनव्या कर्माची आणि इच्छांची भरच पडत जाते. नरहरी महाराज मात्र म्हणतात, माझी पोतडी सत्कर्मानीच भरून गेली आहे आणि ती कर्मेही निष्काम आहेत! हे परमेश्वरा ती तुझ्या चरणी अर्पण करण्यासाठी मी पैलथडी उतरलो आहे! पैलथडी उतरणाऱ्या नरहरी महाराजांची भावस्थिती जणू सर्वाच्या मन:चक्षूंसमोर उभी राहिली..
दादासाहेब – आपले अनेक जन्म अजाणताच वाया जात असतात. क्षणाक्षणानं आयुष्य ओसरतंय आणि दिवसेंदिवस हाती कमी अवधी उरत चाललाय, याची जाणीवच होत नाही. ‘काल असं झालं, परवा तसं झालं,’ अशा कालच्या आठवणींत आणि ‘उद्या अमुक करायचंय, परवा तमुक करायचंय’ किंवा ‘उद्या अमकं होईल ना, परवा तमकं झालं नाही तर काय करावं,’ अशा उद्याच्या चिंतेत प्रत्येक ‘आज’ उडूनच जात असतो.. नरहरी महाराजच एका अभंगात म्हणतात, ‘‘देह अवघा क्षणभंगुर। दिसे स्वप्नवत सार।। नरहरी म्हणे शेवटी। संगे न येई लंगोटी।।’’
हृदयेंद्र – वा! हा देह अवघा क्षणभंगुर आहे! मरणानंतर या देहातलं काहीच बरोबर येणार नाही. जसा हा देह तसेच या चराचरातले अनंत देह. मग ते माणसाचे असोत की पशुपक्ष्यांचे.. त्यांनाही मरण आहेच. या सृष्टीतील यच्चयावत वस्तूंनाही घट, झीज आणि नाश अर्थात नाहीसं होणं आहे.. तरी स्वप्नातला प्रसंग जसा त्या क्षणी अगदी खरा वाटावा, तसा हा सर्व अशाश्वताचा पसारा किती खरा भासतो! नरहरी महाराज म्हणतात, बाबा रे, साधी लंगोटीसुद्धा बरोबर नेता येणार नाही! मग साधी लंगोटही जर बरोबर नेता येत नाही, हे माहीत असूनही आपण किती पसारा वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी रक्ताचं पाणी करीत असतो.
दादासाहेब –  (सकल संत गाथेतील एका अभंगावर बोट ठेवत) नरहरी महाराजांचाच हा अभंग पहा.. ‘‘शरीराची होय माती। कोणी न येती सांगाती।। सारी अवघीं कामें खोटी। अंतीं जाणें मसणवटी।। गोत घरे टाकुन सारी। शेवटीं गांवाचे बाहेरी।। स्वजन आणि गणगोत। उपाय नाहीं हो चालत।। ऐसे स्वप्नवत असार। नरहरी जोडितसे कर।।’’
योगेंद्र – सारी अवघीं कामें खोटी। अंतीं जाणें मसणवटी!! किती खरं आहे.. दादासाहेब तुम्हीही म्हणालात ना? की, उद्या अमुक करायचंय, परवा तमुक करायचंय, याच चिंतेत ‘आज’ सरत असतो.. आज प्रत्येकजण धावतोय, प्रत्येकजण कामात आहे, क्षणभराचीही उसंत कुणाला नाही.. इकडे जायचंय-तिकडे जायचंय.. अरे! शेवटी खरं जायचंय ते स्मशानातच! आयुष्याची दोरी तुटेल तेव्हा कुठली कामं नि कसलं काय!
हृदयेंद्र – एकदा गुरुजींनी एकाला बोलावलं. तो म्हणाला, गुरुजी जरा महत्त्वाचं काम आहे. परवा आलं तर चालेल का? गुरुजी बरं म्हणाले. तो गेल्यावर म्हणाले, मृत्यू आला तर असं सांगता येईल का हो? की बाबारे, महत्त्वाचं काम आहे, दोन दिवसांनी ये! तेव्हा जावंच लागेल ना? इच्छा असो की नसो, जावंच लागेल. मग जर शेवटी हे सारं इथंच टाकून क्षणार्धात जायचंच आहे, तर आत्ताच मनानं ते का सोडत नाही? शरीरानं रहा की.. पण मन ऐलथडी नको, पैलथडी न्या!!
योगेंद्र – तेव्हा ‘सारी अवघीं कामें खोटी। अंतीं जाणें मसणवटी।।’ याचं स्मरण ठेवलं पाहिजे..
कर्मेद्र – इतका नकारात्मक विचार का? आपण मरणारच आहोत, यात शंका नाही, पण म्हणून जन्मापासून स्मशानाकडे डोळे लावून बसायचं का?
हृदयेंद्र – हा नकारात्मक विचार नाही, उलट वस्तुस्थितीचं भान आलं तर अधिक चांगलं जगता यावं, यासाठीचा हा सकारात्मकच विचार आहे.
कर्मेद्र – जीवन क्षणभंगुर आहे, सारं काही सोडून जायचंय, हे मनात घोटत राहणं, हा कसला सकारात्मक विचार?
हृदयेंद्र – उलट आपल्याला मिळालेला जन्म क्षणभंगूर आहे, हे ओळखून जे जगायचं ते अर्थपूर्ण झालं पाहिजे, यासाठीचा हा बोध आहे. मरणाचं स्मरण राखलं तर जगणं अर्थपूर्ण होईल. मग ‘देवा तुझा मी सोनार’ अभंगातल्या अखेरच्या चरणाप्रमाणे ‘नरहरी सोनार हरीचा दास। भजन करी रात्रंदिवस।।’ ही स्थिती होईल!
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhangdhara dream and reality
First published on: 01-06-2015 at 12:20 IST