हृदयेंद्रच्या बोलण्यानं कर्मेद्र अत्यंत अस्वस्थ झाला. त्यानं पुन्हा ठामपणे बोलायला सुरुवात केली..
कर्मेद्र – जीवनातल्या चढउतारांचं काहीच वाटेनासं झालं पाहिजे, हा किती मोठा घातक विचार आहे. का अपयशाचं दु:ख होऊ नये? का हानीचा धक्का बसू नये? श्रीमंत होण्यासाठी का झगडू नये? यशासाठी का लढू नये? जे आहे ते स्वीकारा, याच वृत्तीमुळे, जे आहे त्यातही भर घालता येऊ शकते, जे नाही तेही मिळवता येऊ शकतं, हेच संपूर्ण समाज विसरलाय. या आध्यात्मिक विचारांनी सगळ्या समाजाला निष्क्रिय केलंय. या समाजाला नुसतं आत्ममग्नतेत बुडवून संतांनी किती मोठी हानी केलीय.. परवाच ते वाचलं, ज्ञानेश्वरांनी परकीय आक्रमणाबाबत समाजाला सावध केलं नाही..
हृदयेंद्र – ठीक त्यांनी ते केलं नाही, मग हे लिहिणाऱ्यांनी कारगील युद्धाआधी समाजाला सावध केलं होतं का? आता पुढे कोणकोणती युद्ध होणार आहेत, याबाबत रकानेच्या रकाने लिहिलेत का? तुम्हीही सातआठशे वर्षांपूर्वी काय झालं आणि कोणी काय केलं नाही, हेच लिहिता ना? परचक्राला कसं तोंड द्यायचं ते पहायला राज्यव्यवस्था होती, गुप्तचर यंत्रणा होती, सैन्य होतं.. संत कशाकरता जगले, याबाबतच्या अज्ञानातून लोक अशी सवंग चर्चा करतात. हे म्हणजे हृदयशस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरनं रुग्णाची वाढलेली दाढी दिसूनही ती केली नाही, असं रडगाणं गाण्यासारखं आहे! अरे युद्ध नाही असा एकतरी कालखंड आहे का? युद्ध होतात आणि होतही राहतील, पण युद्धाचं बीज कशात असतं? माणसाची लालसा, माणसाची स्वार्थाध वृत्ती यातच असतं ना? अशा वृत्तीपायीच अनंत जन्मांपासून जे अधिक भीषण युद्ध माझ्या अंतरंगात सदोदित सुरू आहे ते थांबण्यासाठीच संत आले ना? दुनियेतला कोणताही इझम्, कोणतंही तत्त्वज्ञान शेवटी माणूसच हाताळतो आणि ते विकृत करून टाकतो. कारण दोष मुळाशीच असतो. मुळातला दोष दूर न करता नुसत्या फांद्यांवर उपचार करून काय लाभ? तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना? करा की प्रयत्न! संतांचं ऐकून लोकांनी प्रयत्न थांबवले थोडेच.. देहूत तुकोबा होते तेव्हाही कित्येकांचे वाडे होते, पेढय़ा होत्या.. त्यातल्या एकाचं तरी नाव आठवतं का हो? याचाच अर्थ तुम्ही कितीही व्यक्तिगत भरभराट करा, कितीही व्यक्तिगत उन्नती करा ते सारं तुमच्या बरोबर नष्ट होतं. जे समाजाकरता नि:स्वार्थ कार्य करतात किंवा व्यक्तिगत भरभराटीत समाजाला वाटेकरी बनवतात त्यांचं कार्य फार तर काही शतकं लक्षात रहातं.. पण जे निव्वळ जिवाच्या आत्महिताकरताच जगतात त्यांचं कार्य आणि नाव तर युगानुयुगं टिकून रहातं आणि तितकीच जिवंत प्रेरणा देत रहातं.. संतांचे अभंग म्हणूनच तर आजही जागं करतात.. भानावर आणतात.. जीवनाकडे नव्यानं पहायला शिकवतात.. जीवनातलं अपयश दूर करायचा प्रयत्न जो तो करतोच हो, पण त्या प्रयत्नांच्या वेळी त्याची मानसिक शक्ती तर टिकली पाहिजे ना? प्रत्यक्ष प्रयत्नांपेक्षा चिंता, काळजी आणि आशेपायीच ती शक्ती अधिक खर्ची होत असते. अशा माणसाला जेव्हा वाटतं, की प्रयत्न करणं माझ्या हातात आहे, फळ देणारा भगवंत आहे, तेव्हा तो किती निर्भयतेनं, किती चिंतारहित मनानं प्रयत्न करील! त्याची किती शक्ती वाचेल आणि प्रयत्नांनाच अधिक बळ येईल..  त्या प्रयत्नांनी जे साधेल त्यातही तो समाधानीच असेल आणि प्रयत्नरतही राहील. आज प्रयत्नांनंतरही जे मिळतं त्यात समाधान कुठे असतं? किती मिळालं म्हणजे पुरे, हे माहीत नसल्यानं कितीही मिळालं तरी माणसाला पुरेसं वाटत नाही. त्या अतृप्तीतूनच तो कधीच समाधानी होत नाही. त्या असमाधानावर संतांचा बोध हेच औषध आहे. त्यासाठी आधी त्यांचा निरोप तरी नीट ऐका! जाऊ दे.. या बोलण्यात वेळ घालवणं म्हणजेही नुसती निष्क्रियताच तर आहे! त्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीकडेच वळलं पाहिजे.. कर्मू तू भौतिक मिळवण्याच्या कृतीत अवश्य झोकून दे.. त्या धडपडीत दमलेल्या मनाला विश्रांती हवी असेल तर थोडं थांबून तुलाही हाच विचार करावा लागेल.. जो सतत धावत आहे त्याला आणखी जोरात धावून विश्रांती मिळणार नाही.. त्याला थोडं थांबावंच लागेल आणि असं थांबणं म्हणजे धावणंच खुंटणं नसतं! उलट अंतर्मुख होऊन जितकं खोल चिंतन होईल तितकं निर्थक धावणंच थांबेल!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhangdhara message of sants
First published on: 23-04-2015 at 12:52 IST