डोळे असूनही आपण खरं पाहात नाही आणि भ्रमाचं खापर मात्र दृष्टीवर फोडून मोकळे होतो, असं बुवा म्हणाले. त्यावर, माणसाला इंद्रियं ज्या हेतूसाठी मिळाली आहेत, त्या हेतूच्या पूर्तीसाठी त्यांचा वापर हा खरा वापर आहे, असं अचलानंद दादा म्हणाले..
बुवा – अगदी खरं.. बरं कबीरांनी किंवा सर्वच संतांनी त्या त्या इंद्रियांनी काय करायचं ते जे सांगितलंय ना, त्यालाही गूढार्थ आहे बरं का! डोळ्यांनी जगाचं खरं स्वरूप पाहायचं आहे, हातांनी दान म्हणजे काय? तर हातांनी अशी कर्म करायची आहेत ज्यानं अहंचं दान होईल, पायांनी तीर्थाटन करायचं म्हणजे काय? तर सद्गुरुंच्या चरणांत सर्व तीर्थ सामावली आहेत.. त्या सद्गुरुंच्या पावलावर पाऊल.. म्हणजेच त्यांच्या मार्गानं जाणं हेच खरं तीर्थाटन आहे, कानांनी जे जे काही ऐकलं जातं त्यातलं सारतत्त्व ऐकणं हा कानांचा खरा लाभ आहे, मुखानं जे शाश्वत आहे त्याचाच उच्चार हा मुखाचा खरा लाभ आहे..
अचलदादा – बुवा तुम्हाला माहीत असेलच, जशी माणसाला लाभलेली इंद्रियं ही परमात्म्याच्या भक्तीसाठी आहेत ना? तसंच साक्षात भगवंतही आपल्या ‘इंद्रियां’चा वापर भक्ताच्या भक्तीसाठी कसा करतो, हे माउलींनी सांगितलं आहे..
बुवा – हो हो!! ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाच्या अखेरीस फार बहारदार ओव्या आहेत.. मूळ श्लोक काय आहे? ‘‘तुल्यन्दिास्तुतिमौनी संतुष्टो येन केनचित्। अनिकेत: स्थिरमति: भक्तिमान् मे प्रियो नर:।।’’ म्हणजे निंदा व स्तुती समान मानणारा, मोनी, जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणारा, अनिकेत म्हणजे कोठेही आश्रय धरून न राहणारा, स्थिरबुद्धी असलेला जो भक्त आहे तो मला फार प्रिय आहे.. आता या एवढय़ा श्लोकाच्या टीकेत हा भक्त भगवंताला प्रिय आहे म्हणजे काय, ते माउलींनी सांगितलंय.. वा हृदू ‘ज्ञानेश्वरी’च काढलीस.. छान.. अचलानंदजी वाचा बरं त्या ओव्या..
अचलदादा – बुवा माउलींनी श्लोकातल्या प्रत्येक शब्दाचंही विवरण विस्तारपूर्वक केलंच आहे, पण भक्तिमान हा जो शब्द आहे ना, त्या एका शब्दालाच एक ओवी दिलीय.. मग याहीवरी पार्था। माझां भजनीं आस्था। तरी तयातें मी माथा। मुकुट करीं।।
बुवा – (डोळे पाणावले आहेत..) हा भक्त नव्हे, माझ्या माथ्यावरचा मुकुट आहे मुकुट!!
अचलदादा – या भक्ताचा देव कसा अंकित असतो ते सांगताना म्हणतात.. तयाचिया गुणांची लेणीं। लेववूं अपुलिये वाणी। तयाची कीर्ति श्रवणीं। आम्ही लेऊं।।
बुवा – त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आमच्या वाणीला लेववू.. म्हणजे मुखानं भक्ताचं गुणवर्णन करू.. श्रवणांनी त्याचीच कीर्ती ऐकू..
अचलदादा – तो पाहावा हे डोहळे। म्हणोनि अचक्षूसी मज डोळे। हातींचेनि लीलाकमळें। पुजूं तयातें।।
बुवा – काय सुरेख आहे पाहा.. त्याला पाहण्याचे डोहाळे लागलेत देवाला.. म्हणून अचक्षू म्हणजे दृष्टीरहित असूनही त्यानं डोळे धारण केल्येत.. मग आमच्या हातचा मळ असलेल्या लीलांनी आम्ही त्याची पूज्यता वाढवतो! मग काय सांगतात? दोंवरी दोनी। भुजा आलों घेउनि। आलिंगावयालागुनी। तयाचें आंग।। म्हणजे भक्ताला आलिंगन देण्यासाठी दोन्ही हात मोकळे राहावेत यासाठी चतुर्भुज झालो! पुढे?
अचलदादा – तया संगाचेनि सुरवाडें। मज विदेहा देह धरणें घडे। किंबहुना आवडे। निरुपमु।। म्हणजे त्याच्या संगाच्या आवडीसाठी विदेही असूनही मी देह धारण केला..
बुवा – तेव्हा माणसानं जसा आपल्या इंद्रियांचा उपयोग भगवंतावरील भक्ती वाढविण्यासाठी केला पाहिजे, तसाच भगवंतही भक्तासाठी कसा इंद्रियतत्पर असतो, पाहिलंत ना? तर चोखामेळा महाराज या इंद्रियांपैकी एका डोळ्याचा आधार घेत आपला डोळा उघडू पाहातात! काय म्हणतात ते? डोळियाचा देखणा पाहतां दिठी। डोळाच निघाला देखण्या पोटी।।
हृदयेंद्र – बुवा, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून सांगा हं..
बुवा – हो बरं.. पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात काय म्हटलंय? डोळियाचा देखणा पाहतां दिठी! सोप्या मराठीत सांगायचं तर ‘डोळियाचा देखणा’ म्हणजे ‘डोळ्यांनी पाहणारा’ जो आहे तो ‘पाहतां दिठी’ म्हणजे दृष्टीला दिसताच!!
योगेंद्र – वा! डोळ्यांनी पाहणारा दृष्टीला दिसताच!!
चैतन्य प्रेम