दिल्लीतून तिने दिलेला लढा आणि तिची झुंज हे समाज बदलण्यासाठी असल्याचा संदेश अमेरिकेतील पुरस्कारातून पुन्हा एकदा पोहोचवण्याची संधी तिला मिळाली, याबद्दल लक्ष्मी अगरवाल ही कार्यकर्ती अभिनंदनास पात्र ठरते. अमेरिकी परराष्ट्र खात्याने २००७ पासून सुरू केलेला, ‘इंटरनॅशल विमेन ऑफ करेज अवॉर्ड’ दरवर्षी कधी सात-आठ, तर कधी दहा जणींना दिला जातो, त्यातील यंदाच्या दहा जणींपैकी लक्ष्मी ही एक. त्या दहाही जणी महिलांसाठी काम करणाऱ्या. कुणी न्यायाधीश म्हणून तर कुणी स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून किंवा अनेकींनी कार्यकर्त्यां म्हणून महिलांची स्थिती सुधारून समाज बदलण्याचे केलेले प्रयत्न लक्षणीय आहेत. पण लक्ष्मी या सर्वापेक्षाही विशेष.. कारण स्वत: ‘अत्याचाराची बळी’ ठरूनही तिने गप्प न बसता लढा दिला आणि एका सामाजिक समस्येकडे तिच्या देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष वेधले.
दिल्लीच्या गरीब कुटुंबातील लक्ष्मीला तिच्या मैत्रिणीच्या भावाने (वय ३२) मागणी घातली, तेव्हा तिचे वय होते १६ सुरू. तिचा नकार मिळाल्यावर त्याने अॅसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप केला.. ही घटना २२ एप्रिल २००५ सालची. तेव्हापासून वयाच्या पंचविशीपर्यंत तिने फक्त अॅसिडहल्ल्याशी झुंज दिली. स्वत:चा चेहरा कसा वितळत होता आणि त्यावर चार शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, याच्या कटू आठवणी लक्ष्मीकडे आहेत; पण त्याहीपेक्षा हे घडवणाऱ्यांना शिक्षा व्हावी, यासाठी तिने केलेले प्रयत्न तिला महत्त्वाचे वाटतात. तिची ती मैत्रीण- तिचा भाऊ आणि या कामी मदत करणारा त्याचा मित्र या तिघांनाही शिक्षा झाल्यावर स्वस्थ न बसता २००६ सालीच तिने जनहित याचिकेद्वारे अॅसिडहल्ला पीडितांसाठी विशेष कायदे असावेत, अंगावर अॅसिड फेकण्याचा उल्लेख असलेले कलम सध्याच्या फौजदारी कायद्यात आणि दंडसंहितेत असावे यासाठी आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, अशा मागण्या न्यायपीठापुढे मांडल्या. अखेर चक्रे फिरली, मार्च २०१३ मध्ये केंद्र सरकारने असा कायदा (यात अॅसिडहल्ल्याखेरीज वस्त्रहरण, पाठलाग आणि सार्वजनिक अपमान यांचाही समावेश होता.) आणला! ‘पीडितांना आर्थिक भरपाई मिळण्याची व्यवस्था सरकारने करावी’ हीदेखील लक्ष्मीची मागणी होती, ती मान्य झालेली नाही.
याहीनंतर, गेले सुमारे वर्षभर ती ‘स्टॉप अॅसिड अॅटॅक्स’ या संस्थेसह काम करते आहे. हेच काम म्हणजेच आपले जगणे, हे तिने ठरवून टाकले आहे. आचारीकाम करणारे वडील २००१२ मध्ये गेले, भाऊ छातीच्या असाध्य रोगाने दुखणाईत, आई वृद्ध असे असतानाही घरदार पणाला लावून लक्ष्मीने लढा दिला.. तोच आता तिला पुढील कार्याची दिशा दाखवत आहे. पुरस्कार मिळतच राहतील, पण ती ‘भारतीय स्त्री-संघर्षांचा चेहरा’ अगोदरच ठरली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2014 रोजी प्रकाशित
लक्ष्मी अगरवाल
दिल्लीतून तिने दिलेला लढा आणि तिची झुंज हे समाज बदलण्यासाठी असल्याचा संदेश अमेरिकेतील पुरस्कारातून पुन्हा एकदा पोहोचवण्याची संधी तिला मिळाली,

First published on: 07-03-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acid attack survivor laxmi