‘अद्वय’ ही दृष्टी होय, तर ‘भागवत धर्म’ म्हणजे अद्वयदृष्टीशी संलग्न अशी व्यावहारिक जीवनरीत. अद्वयाची जीवनदृष्टी आणि भागवत धर्माचे तत्त्वचिंतन केवळ परस्परांशी सुसंवादी आहे इतकेच नव्हे, तर त्याही पुढे जाऊन ते परस्पराश्रयी ठरते. अद्वयाची जीवनदृष्टी भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या जीवनविषयक तत्त्वज्ञानावर तोललेली आहे. तर भागवत धर्मप्रवर्तित जीवनरीत अंगी मुरवलेली व्यक्ती लोकव्यवहारात वर्तते-वावरते अद्वयदृष्टी धारण करून. व्यष्टी आणि समष्टी यांचे एकत्व स्पष्ट करते अद्वयदृष्टी, तर व्यष्टी व समष्टीच्या परस्पर नात्याचा पोत मंडित होतो भागवत धर्माच्या तत्त्वज्ञानाद्वारे. अद्वयदृष्टी व भागवत धर्माचे तत्त्वज्ञान यांना जोडणारा दुवा म्हणजे नामचिंतनाचे साधन. श्रीमद्भागवतामध्ये विदित नवविध भक्तीपैकी नामस्मरणरूपी तिसऱ्या भक्तीची सर्वोच्चता सर्वदूर सर्वमान्य व सर्वस्वीकृत झालेली दिसते त्यामागील रहस्य हेच. बाह््य कर्माला आंतरशुद्धीच्या विकर्माची जोड लाभावी यासाठी नामचिंतनाचे साधन अवलंबण्याचा आग्रह संतपरंपरा प्रकर्षाने मांडत राहते, त्यास तितकेच सबळ कारण आहे. नामचिंतनाद्वारे वृत्तीचा पालट शक्य बनतो, अशी निरपवाद, नि:संदेह ग्वाही देणारी- ‘‘सप्रेम सद्भावें संपूर्ण। नित्य करितां नामस्मरण। वृत्ति पालटती आपण। तेंही लक्षण ऐक राया।’’ ही ‘एकनाथी भागवत’च्या दुसऱ्या अध्यायातील ओवी या संदर्भात मननीय ठरते. नामस्मरणरूपी विकर्माला नाथांनी या ठिकाणी आवर्जून जोडलेल्या ‘सप्रेम सद्भावे’ या दोन विशेषणांचे आवाहन भिडण्यासाठी तितकीच तरल संवेदनशीलता असावयास हवी. असे भावप्रेमाने भारित नामचिंतन अविरत होत राहिले की त्याची होणारी परिणती, ‘‘नामासरिसाच हरी। रिघे हृदयामाझारीं। तेणें धाकें अभ्यंतरीं। हों लागे पुरी हृदयशुद्धी।’’ अशा स्वच्छ, स्पष्ट शब्दांत विदित करतात नाथराय. हे सगळेच मोठे विलक्षण आहे. परमतत्त्वाने एकदा का अंतरंगात ठाण मांडले, की दोन गोष्टी आपसूकच साकारतात. तुकोबांचे शब्द उसने घ्यायचे तर, ‘‘आंत हरि बाहेर हरि। हरिनें घरीं कोंडिलें।’’ अशी अवस्था झालेल्या उपासकाच्या ठायी व्यष्टी आणि समष्टीच्या सामरस्याची अनुभूती चिरस्थायी बनते. अद्वयाचे अंजन दृष्टीला लेवविले जाते आणि जगाबरोबरील त्याच्या नात्याचा पोतही साहजिकच पालटतो. दुसरे म्हणजे, विकर्माच्या प्रभावाने अंत:करण विशुद्ध बनण्याच्या प्रक्रियेदरम्यान ‘स्व’चा संपूर्ण विलय विनासायास घडून येतो. ‘स्व’च्या पृथक अस्तित्वाची जाणीव ठायीच्या ठायीच विरली की अ-कर्तेपणाचा भाव हृदयात सहज स्थिरावतो. निष्कामता चिरस्थायी बनते. हातून घडणारे प्रत्येक कर्म, मग स्वाभाविकपणेच अ-कर्तात्म भावनेने साकारते. कर्माच्या मुळाशी असणारी कर्तेपणाची ऊर्मीच एकदा का मावळली, की हातून घडणारे प्रत्येक कर्म स्वरूपत:च निष्काम बनते. अशा निष्काम कर्मरत जीवनपद्धतीलाच ‘भागवत धर्म’ असे संबोधतात नाथराय! ‘‘हेतुक अथवा अहेतुक। वैदिक लौकिक स्वाभाविक। भगवंती अर्पे सकळिक। या नांव देख ‘भागवत धर्म’।’’ ही नाथांची ओवी म्हणजे त्याच आंतरिक अवस्थेचा प्रगट हुंकार. ‘उद्यापासून मी निष्काम कर्मयोग आचरणार’ अशी घोषणा केल्याने निष्काम कर्माचरण साधत नसते. प्रेमभावाने कंठी जिरवलेल्या अविरत नामसाधनेचा तो असतो सहज परिपाक. ‘निष्काम कर्म’ हा संकल्प नसून ती परिणती होय, हेच भागवत धर्माचे सारभूत हृद्गत! – अभय टिळक

agtilak@gmail.com

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये