भागवत धर्माने प्रवर्तित केलेले भक्तितत्त्व जसे समूहप्रधान आहे तसे आणि तितकेच ते गतिमानही आहे. ‘‘कां फेडित पाप ताप। पोखित तीरींचे पादप। समुद्रा जाय आप। गंगेचें जैसें।’’ या ‘ज्ञानदेवी’च्या १६व्या अध्यायातील ओवीमध्ये त्या वास्तवाचे सम्यक प्रतिबिंब उमटलेले आपल्याला आढळून येते. रत्नाकराशी समरस होण्यासाठी आवेगाने निघालेली पुण्यसलिला गंगा वाटेवरील जीवमात्रांचे पाप-ताप हरण करत असतानाच तिच्या उभय काठांवरील वृक्षांना जीवनदान देत जाते, तसा ‘अद्रोह’ हा दैवी गुण अंगी मुरलेला पुरुष या विश्वामध्ये राहात असतो, असे ज्ञानदेवांचे या ओवीतील कथन. पंढरीची पायवारी म्हणजे ‘अद्रोह’ या दैवी संपदेने परिपूर्ण अशा विठ्ठलप्रेमिकांची मांदियाळीच जणू! ज्ञानदेवांची अलंकापुरी हे योगपीठ, तर पंढरीशाची पंढरी महायोगपीठ होय. योगपीठापासून महायोगपीठापर्यंत भक्तिगंगेचा गतिमान प्रवाह वारीच्या रूपाने अनादी काळापासून अक्षुण्णपणे वाहतोच आहे. समूहप्रधान, गतिमान व लोकाभिमुख असणारे हे भक्तितत्त्व अचल अथवा स्थिर नाही, तर ते प्रवाही आणि चल आहे. पंढरीची पायवारी म्हणजे तशा चलभक्तीचे प्रगट वर्णन. किंबहुना ज्ञानदेवांनीच विश्वात्मकाकडे मागितलेल्या ‘पसायदाना’चा व्यक्त आविष्कार म्हणजे पंढरीची पायवारी! विश्वातील जीवमात्रांच्या बुद्धीला प्रसंगावशात लगडणारे वाकडेपण झटकून जावे, यासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ जगावर मंगलाचा वर्षाव अनवरत करत राहो, हे ज्ञानदेवांचे मागणे हा तर ‘पसायदाना’चा गाभाच! स्वार्थ आणि त्या स्वार्थापायी बुद्धीला लागणारे वाकडे वळण, हा तर जीवमात्रांच्या जगण्याचा स्वाभाविक अविभाज्य घटकच. प्रत्येक सजीवाची व्यंकटी सरळमार्गाला सन्मुख बनविणे हे एकट्यादुकट्या ईश्वरनिष्ठाच्या आवाक्याबाहेरचे काम. त्यासाठी हवा समाजाभिमुख ईश्वरनिष्ठांचा मेळा! परंतु तेवढ्यानेही भागत नाही. विश्वावर मंगळाचा वर्षाव करण्यासाठी प्रेरित झालेले समाजमनस्क एके ठायीच मठ अथवा आश्रम बांधून राहिले तर त्याचा काय फायदा? ईश्वरनिष्ठांची मांदियाळी गतिमान, प्रवाही असावी ती त्यासाठीच. ज्येष्ठ वद्य अष्टमीस पंढरीकडे प्रस्थान ठेवतात ज्ञानदेव. शिवपीठात उगम पावून विष्णुपदाकडे गतिमान होणारा भक्तिगंगेचा हा प्रवाह समूर्त साकार बनवतो केवळ ज्ञानदेवांचे नव्हे, तर अखिल संत सारस्वताचे हृदगत् असणारे ‘पसायदान’! फिरत्या कल्पतरूंची आरव म्हणजे बाग, सचेतन चिंतामणीचे गान, मुखाने अमृतमय वाणीचा वर्षाव करणारा सागर ही ज्ञानदेवांनी ‘पसायदान’मध्ये ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीसाठी योजिलेली यच्चयावत रूपके स्पष्ट सूचन घडवितात ते समूहप्रधान, प्रवाही, चल भक्तीच्या रहस्याचे. पंढरीच्या पायवारीसाठी ‘विठ्ठलयात्रा’ असा मोठा अन्वर्थक शब्द योजतात ज्ञानदेव. ‘विवेकसागर’ असे मोठे गोड संबोधन आमच्या जनाबाई वाहतात माऊली ज्ञानदेवांना, तर ‘ज्ञानसागर’ असे विशेषण ज्ञानदेव बहाल करतात विठुरायाला. विवेकसागरात उगम असलेली वारीरूप गंगा वाटेवरील गावांमध्ये नांदणाऱ्या भक्तितत्त्वास जागवत दरवर्षी ज्ञानसागराशी एकरूप होते. ‘‘माझे जिवींची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी।’’ असा संकल्प उच्चारत, निरामय सुखाची गुढी पंढरीस घेऊन जाण्यासाठी वैष्णवांच्या मेळ्यासह प्रस्थान ठेवत आहेत अलंकापुरीमधून ज्ञानदेव आज! – अभय टिळक
agtilak@gmail.com
