‘अभंग’ व ‘ओवी’ या दोन अस्सल देशी छंदांत विचारविश्वाची अभिव्यक्ती घडवून आणल्यामुळे ज्ञानोबा-तुकोबादी विभूतींना आपण ‘संतकवी’ असे संबोधतो. मात्र, ‘कवित्व’ वा ‘कविता’ या संज्ञेत काव्याच्या आदिबंधाच्या पलीकडे आणखी काही तरी विशाल, अमेय, निखळ, निरालंब असे या परंपरेला अभिप्रेत आहे, याचे सूचन विशेषत:  तुकोबांची अनेक वचने  घडवतात. या शक्यतेचे आद्य उच्चारण घडवतात एकनाथमहाराज. वाचेद्वारे व्यक्त होणारे विचारविश्व काव्याचे रंगरूप लेवून साकार होत असले तरी त्यामुळेच केवळ त्याला ‘कविता’ म्हणता येत नाही, असे नाथांचे एक मोठे मार्मिक प्रतिपादन होय. वाचा सत्यत्वें सोवळी । येर कविता ओंवळी असे त्यांचे एक विलक्षण आशयगर्भ वचन त्या वास्तवाची साक्ष पुरवते. काव्यामध्येदेखील ‘सोवळी’ आणि ‘ओवळी’ असा जो सूक्ष्म भेद नाथ  निर्देशित करतात तो मोठा चिंतनीय आहे. शब्दरूपाने वाचेमधून प्रगटलेल्या ज्या वचनांना सत्याचा स्पर्श झालेला आहे तेच खरे निखळ काव्य, तीच ‘सोवळी’ कविता, असे नाथ म्हणतात. जे काव्य सत्याच्या अनुभूतीपासून वंचित आहे ते, वरकरणी कवितेच्या पेहरावामध्ये अवतरलेले असले तरी, ‘ओवळे’ गणावे, असा निरपवाद निवाडा नाथ करतात. या अ-साधारण वर्गीकरणाद्वारे नाथांना नेमके काय सुचवायचे आहे त्याचा गाभा अचूक उमगला तर, सत्यासाठी माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचे ते नव्हे या तुकोक्तीमध्ये सामावलेली सघन-सखोल अर्थवत्ता आपल्याला प्रतीत व्हावी. माझ्या मुखावाटे उमटणाऱ्या शब्दांना सत्याच्या अनुभवाचा परीसस्पर्श घडलेला असावा आणि/ किंवा तो तसा घडलेला असेल ना हीच माझी मुख्य विवंचना होय, असे तुकोबा म्हणतात तेव्हा, ‘कविता’ या संकल्पनेच्या ठायी अभिप्रेत असणाऱ्या पावित्र्याचे जतन करण्याचे किती तीव्र भान त्यांच्या ठायी जागरूक होते, याची कल्पना येते. ताटीचे ज्ञानदेवांनी दडपून घेतलेले दार उघडावे अशी विनंती कळकळून करत असताना, ज्ञानदेवांच्या निमित्ताने मुक्ताई संतत्वाची लखलखीत कसोटी सिद्ध करतात तसेच जणू काही नाथ आणि तुकोबा या ठिकाणी करत आहेत. सत्याच्या अनुभूतीने पावित्र्याला प्राप्त झालेली कविता प्रसवणे हा स्वत:ला ‘कवी’ म्हणवून घेणाऱ्याने जपावयाचा वसा होय, हेच जणू त्यांना अधोरेखित करावयाचे आहे. कवीने आणि पर्यायाने साहित्यिकाने सत्याचा शोध, त्याची अनुभूती आणि गवसलेल्या सत्याचेच आविष्करण त्याच्या साहित्यप्रकाराद्वारे घडवत राहणे ही साहित्यसेवकाची आद्य जबाबदारी ठरते, हा तुकोबांचा निखळ सांगावा होय. इथे ‘सत्य’ या संकल्पनेने नाथांना आणि तुकोबांना केवळ पारलौकिक अंतिम सत्यच काय ते अभिप्रेत आहे, असा सोयीचा अर्थ लावून आपली सुटका करू न घेणे हा निव्वळ अप्रामाणिकपणाच ठरेल. सत्य आह्मां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी असे खणखणीतपणे निरपवाद सांगणारा तुकोबांसारखा अंतर्बाह्य पारदर्शक लोकोत्तर, ‘परमार्थात एक आणि लौकिक व्यवहारात दुसरेच,’ असा दुटप्पी व्यवहार करीत असेल असे मानणे हीदेखील आपली घोर आत्मवंचनाच ठरेल. लोकव्यवहारात अनुभवास येणारा असत्याचा बडिवार उघडा पाडताना कोणाचाही मुलाहिजा मी राखणार नाही, असे, नाहीं भीड भार । तुका ह्मणे साना थोर इतक्या आक्रमक शब्दांत सुनावणारे तुकोबा त्यांच्या काळातील साहित्यविश्वाला पचले नव्हतेच आणि आजची तर बातच नको! – अभय टिळक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expression of abhang and ovi ideology akp
First published on: 06-05-2021 at 00:06 IST