जीवनव्यवहार, मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो, त्याला किमान शिस्त आणि मूल्यचौकट हवीच.  ज्ञानव्यवहारासारख्या पवित्रतम गणल्या जाणाऱ्या क्षेत्रात तर याचे भान अधिकच संवेदनशीलतेने जपणे अगत्याचे ठरते. कीर्तनासारख्या मुक्त ज्ञानपीठासंदर्भात, म्हणूनच, किमान आवश्यक अशा मूल्य-मर्यादांचा आग्रह भागवतधर्म परंपरेने जपावा हे साहजिकच. अद्वयबोधाचे सारगम्य आकळलेल्या सुजाणांच्या लेखी भक्ती आणि ज्ञान यांत पूर्ण सामरस्यच नांदत असते. हें समस्तही श्रीवासुदेवो। ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो। म्हणोनि भक्तांमाजीं रावो। आणि ज्ञानिया तोचि हे ज्ञानदेवांचे कथन पुष्टी करते त्याच जीवनदृष्टीची. त्यांमुळे, भक्तीशास्त्रातील उपासनाविधी असणाऱ्या कीर्तनाला नामदेवरायांनी ज्ञानदीप प्रज्ज्वलित करण्याचे माध्यम गणावे आणि त्या ज्ञानदीपामधील वातीवर अविवेकाची काजळी जमू लागली तर त्यांपायी मंदावू पाहणारा विवेकदीप पुनश्च एकवार उजळण्यासाठी ‘ज्ञानेश्वरी’सारखे धर्मकीर्तन ज्ञानदेवांनी मांडावे, हे तर्कशुद्धच शाबीत होते. कीर्तनाद्वारे अध्यात्मशास्त्र प्रगट होते की ऐहिक लोकव्यवहार निरामय बनविणारे जीवनसूत्र हा मुद्दाच इथे अ-प्रस्तुत ठरतो कारण, मुदलात ऐहिक जीवन आणि पारलौकिक हित या दोहोंत भेद मानणे हेच अद्वयदर्शनाला मंजूर नाही. त्यांमुळे, महाविद्यालयातील अभ्यासवर्गामध्ये प्रविष्ट होत असताना विद्यार्थ्याने त्याचे अंतर्मन जसे व जितके ज्ञानसन्मुख बनविणे आवश्यक आहे तशीच आंतरिक मशागत कीर्तनासाठी सादर होतानाही आवश्यक ठरते. कारण, व्यक्तिजीवन उन्नत बनविणे हेच या दोन्ही ज्ञानव्यवहारांचे अंतिम व सर्वोच्च उद्दिष्ट होय. व्हावें कथेसी सादर। मन करूनियां स्थिर असा उपदेश माउली जनाबाई करतात त्याचे कारण हेच होय. ज्ञानाचे आदानप्रदान विशुद्ध पर्यावरणामध्ये होण्याच्या दृष्टीने काही मर्यादांचे पालन अनिवार्य ठरते. कीर्तनाद्वारे घडणारे ज्ञानदान, त्यासाठीच, राउळामंदिरांमध्ये साकारावे अशी अपेक्षा जपली जाते. ज्ञानग्रहणासाठी आवश्यक मन:स्थिती श्रोत्यांच्या ठायी उत्पन्न होण्यास मंदिरपरिसरातील भावपूर्ण भवताल पूरक-उपकारक ठरतो. उभ्या बाजारात कथा। हे तों नावडे पंढरिनाथा असे तुकोबा बजावतात त्यासाठीच.  बाजारात कीर्तन मांडले की यथावकाश कीर्तनाचा बाजार मांडला जाण्याची अवनत परिस्थिती उद्भवण्यास वेळ लागणार नाही, हे तुकोबांसारखे मनोव्यवहारतज्ज्ञ पुरेपूर जाणून होते. शाळा-महाविद्यालयांतील शिक्षण असो अथवा कीर्तनाद्वारे घडणारे समाजशिक्षण असो, लोकमानस संस्कारित करणे हाच उभय उपक्रमांचा समान हेतू. मनोभूमीतील अनिष्ट अंशाचे उच्चाटन आणि इष्ट-सात्त्विक प्रवृत्तींचे रोपण-संगोपन हे ‘संस्कारा’मध्ये अध्याहृत गाभातत्त्व. त्यासाठी कीर्तनकारासारखा लोकशिक्षक नि:स्पृहच असावयास हवा. जेथें कीर्तन करावें। तेथें अन्न न सेवावें। तटावृषभासी दाणा। तृण मागों नये जाणा इतकी काटेकोर आचारसंहिता तुकोबा कीर्तनकारांसाठी नमूद करतात ते उगीच नाही. कीर्तनातून होणाऱ्या वैचारिक संक्रमणालादेखील, काही एक मर्यादा हवी ती याचसाठी, यांबाबत दक्ष आहेत नाथराय. भक्तिज्ञानाविरहित गोष्टीं इतरा न कराव्या । प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या अशी कीर्तनादरम्यानच्या विवरण-विवेचनाला अत्यावश्यक अशी मूल्यचौकट घालून देणाऱ्या नाथांची आठवण तरी आज आपल्याला आहे का?

– अभय टिळक

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

agtilak@gmail.com