अभय टिळक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवमान, अवहेलना, उपेक्षा, तिरस्कार यांचे आणि केवळ यांचेच दान समकालीन लोकव्यवहाराने झोळीमध्ये घालूनही उद्वेगाचा, अभिशापाचा एकही उद्गार ज्ञानदेवांच्या वाणीलेखणीद्वारे कोठेही उमटू नये, याचा आपल्याला सतत व उदंड विस्मय वाटत राहतो. अपरिमित लोकापवाद पचवायला विशाल मन व त्याहीपेक्षा अनंत पटींनी कणखर अशी पचनशक्ती लागते. त्या सगळ्या सोसण्याचा एका अनामिक क्षणी कडेलोट झाल्यावर मात्र ज्ञानदेवांनी पर्णकुटीचे दार आतून दडपून घेत स्वत:ला कोंडून घेतले. समजा, नसतेच उघडले ज्ञानदेवांनी ताटीचे दार तर काय झाले असते.. कल्पनाही नाही करवत. तुकोबांचे स्वप्नोपदिष्ट शिष्य निळोबा पिंपळनेरकरांनी, ‘ज्ञानदीप्तिकळा’ अशा यथार्थ शब्दकळेने ज्यांचे वर्णन केलेले आहे त्या मुक्ताबाईंचे आपल्यावर किती अनंत उपकार आहेत, याची जाणीव इथे होते. क्षोभाने अंत:करणाचा दाह झालेल्या ज्ञानदेवांना परोपरीने विनवून ताटीचा दरवाजा उघडण्यास मुक्ताईंनी त्यांना भाग पाडले. आदिगुरू भगवान शंकरांपासून परंपरेने आपल्यापर्यंत चालत आलेले शांभवाद्वयाचे बोधसंचित धारण करणाऱ्या थोरल्या भावाकडून त्या बोधाशी विसंगत वर्तन घडावे, ही जाणीवच जणू मुक्ताईंना अस्वस्थ करून सोडते. विश्वातील अणुरेणू हे ज्या परमशिवाचे विलसन आहे तिथे कोणाच्या तरी वागण्याबद्दल आपल्याला राग यावा, याचेच मुक्ताईंना नवल वाटते. आपण रागावतो ‘दुसऱ्या’वर. मुळात, एकच शिवतत्त्व अंतर्बाह्य़ नांदत असेल तर ‘आप’ व ‘पर’ हा भाव वा भावना अप्रस्तुतच ठरते. अद्वयाचे हे भान जर मनोबुद्धीमध्ये स्थिर झालेले असेल तर मग रागवायचे कोणी, कोणावर व कशासाठी, असा प्रश्न मुक्ताबाई ताटीच्या बाहेर उभ्या राहून ज्ञानदेवांना विचारतात. आपणच आपल्यावर रागवावे याला वस्तुत: काही अर्थ आहे का, असा बिनतोड मुद्दा, मुक्ताई- ‘‘अहों क्रोधें यावें कोठें। अवघें आपण निघोटें।’’ अशा शब्दांत उपस्थित करतात. ‘संपूर्ण’, ‘परिपूर्ण’ हे ‘निघोट’ या शब्दाचे दोन अर्थ. परमशिव आपणच संपूर्ण विश्वरूपाने परिपूर्ण विलसत असेल, तर ‘क्रोध’ या भावनेचा उगमच असंभव ठरतो. प्रत्येक अस्तित्वामध्ये अंतर्बाह्य़ शिवतत्त्वच विराजमान असेल, तर आपण स्वत: आणि बाहेरचे जग यांत वस्तुत: काहीच फरक नाही. ‘‘आंत हरि बाहेर हरि। हरिनें घरीं कोंडिलें।’’ असा आपला अनुभव सांगणारे तुकोबा अद्वयभावातच विराजमान आहेत. वाणीमधून अद्वयाचे सिद्धान्तन व्यक्त करायचे आणि लौकिकातील व्यवहार मात्र द्वैताने कलंकित राखायचा, हे विसंगतच नाही का, असे विचारत ज्ञानदेवांना अंतर्मुख होण्यास मुक्ताई प्रवृत्त करतात. अद्वयाच्या तात्त्विक भूमिकेमध्ये स्थित राहूनच जगण्याचे ब्रीद बांधलेले असल्यामुळे आपला व्यवहारही त्याच्याशी सुसंगत राखण्याची जबाबदारी आता टाळता-सोडता येणार नाही, असे ज्ञानदेवांना- ‘‘ब्रीद बांधिलें चरणीं। नवें दावितां करणी।’’ अशा सडेतोड भाषेत मुक्ताई ऐकवतात. भवतालचा लोकव्यवहार कसाही असला तरी अद्वयाचे मूल्यसंचित अंगीकारलेल्यांच्या वर्तनाचा पोत कसा असला पाहिजे, हेच ज्ञानदेवांच्या निमित्ताने मुक्ताबाई तुम्हाआम्हाला सुचवताहेत. आपल्या अंत:करणातील कलह शमले की बाह्य़ जगातील युद्धे टाळण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरजच उरणार नाही, असे म्हणणारे कृष्णमूर्ती तरी यापेक्षा वेगळे काय सांगतात?

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh article abn 97
First published on: 29-01-2021 at 00:05 IST